नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा पाऊस जसजसा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करू लागतो, त्याच प्रमाणात महाराष्ट्रातील विशेषतः राज्याच्या पश्चिम भागात वसलेल्या गडकोटांवर पावसाळी पर्यटनासाठी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागते. सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रतटाच्या शेजारी उभी असलेली डोंगररांग. या सह्याद्री पर्वतरांगेत असणार्या गडकोटांवर हौशींची गर्दी पावसामुळे वाढू लागली. पुणे जिल्हाही त्याला अपवाद नसून, शहरालगतचा सर्वांत प्रसिद्ध गड किंवा ज्या ठिकाणी पर्यटनासाठी सहजरित्या पोहोचता येते, अशा सिंहगडावर लोकांची आठवड्याच्या शेवटी गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. राज्य सरकारने घाटरस्ता उपलब्ध करून दिल्यापासून सिंहगडावर पर्यटकांची खासकरून पावसाळी पर्यटकांची जणू लाटच आली. ‘इतिहासाकडे आपण डोळसपणे बघितले पाहिजे. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही,’ या बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाक्यामुळे प्रेरित होत अनेक जण आपल्याला इतिहासावर आणि सह्याद्रीवर प्रेम करत त्याची भटकंती करताना दिसत असतात. मात्र, काही ’पावसाळी पर्यटकांच्या’ उपद्व्यापामुळे सह्याद्रीप्रेमींना नाहक त्रास भोगावा लागतो. सह्याद्री डोंगररांगेमधील गडकोटांवर पर्यटनासाठी जाताना आपल्या पूर्वजांनी म्हणजेच मराठ्यांनी 16व्या आणि 17व्या शतकांत अपार प्रयत्न करून, प्राणांची आहुती देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते आणि त्याच ठिकाणी आपण फक्त मज्जा म्हणून जात असू, तर त्यांनी 350-400 वर्षांपूर्वी केलेले महान कार्य आपण विसरलो आहोत काय, अशी शंका उपस्थित होऊ शकते. मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नास सर्वांत जास्त साथ कोणी दिली, तर ती सह्याद्रीनेच म्हणजेच गडकोटांनी. मुंबई, नाशिक आणि पुणे या शहरांमधून आसपासच्या गडकोटांवर गर्दी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यात आता मध्यम पातळीचा गडकोट म्हणून गणना होत असलेल्या सिंहगडावर रज्जू मार्ग (रोपवे) सुरू होणार असल्याने प्रशासनाने आणि पावसाळी पर्यटकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. मराठ्यांनी ‘मज्जा’ म्हणून गडकोट वसवले नव्हते, हे गडावर जाणार्या प्रत्येक पर्यटकाने अजिबात विसरता कामा नये.
इतिहासाचा विसर न व्हावा!
२१व्या शतकात माणसाच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल झाले. सर्वच क्षेत्रांत तीव्र झालेल्या स्पर्धेमुळे माणसाच्या आयुष्यात खूप अडचणी उद्भवल्या. अनेक जण तर नैराश्याच्या नंतर व्यसनांच्या आहारी जाताना आपल्याला दिसतात. माणसाच्या आयुष्यात नैराश्य येणं साहजिक असून, त्यावर मात करण्यासाठी लोकांनी व्यसनांच्या मागे न धावता मराठ्यांच्या इतिहासाचा आधार घेणे कधीही सोयीस्कर. गडकोटांवर फक्त ’मज्जा’ आणि सेल्फीसाठी गेल्यास नैराश्य कमी होण्यास मदत होणार नाही, तर त्या गडकोटांवर जाऊन मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास, त्या-त्या गडकोटांवरील इतिहास, भूगोल जाणून घेतल्यास, त्यातून प्रेरणा प्राप्त केली तर नैराश्याची निरसता काहीशी नक्कीच झटकता येईल. घरी मुलाचे म्हणजेच रायबाचे लग्न असूनही, कोंढाणा म्हणजेच सिंहगडावर जाऊन हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणार्या तानाजी मालुसरे यांच्या घरच्यांना नसेल का झाला त्रास? पण, म्हणून त्यांनी खचून न जाता महाराजांकडून प्रेरणा घेतलीच ना! फुलाजीप्रभू आणि बाजीप्रभू या बंधूंनी प्राणाची बाजी लावून शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावरुन विशाळगडावर सुखरूप पोहोचवले. तेव्हा त्यांच्या घरच्यांना दुःख झालेच असेल. परंतु, हार न मानता त्यांनी हिंदवी स्वराज्याची सेवा पुढे सुरूच ठेवली की. म्हणून इतिहासाकडे आपण फक्त ‘मज्जा’ म्हणून न बघता, ‘प्रेरणा’ म्हणून बघितल्यास आपणही तानाजी मालुसरे किंवा फुलाजीप्रभू, बाजीप्रभूंच्या परिवारासारखी कामगिरी करू शकतो. अर्थात, सध्याच्या काळात शत्रू तेवढ्या प्रमाणात घातक नसला तरी प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे अडचणी येत असतात आणि या अडचणीरूपी शत्रूवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उपाय हा मराठ्यांच्या शूर इतिहासाचा अभ्यास हा होय. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा!’ या सेनापती बापट यांच्या ओळी महाराष्ट्राचे किंबहुना या राज्यातील लोकांचे माहात्म्य विशद करतात. परंतु, याच महाराष्ट्रातील तरुणाई नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणादायी इतिहासाचा आधार न घेता व्यसनांचा आधार घेत आहे, हे बघून आपले ‘शूर’ पूर्वजदेखील चिंतित असतील एवढे नक्की!
अनीश कुलकर्णी