हगवणेंच्या वकीलाची सनद रद्द करा! अंजली दमानियांची मागणी

    29-May-2025
Total Views |
 
Anjali Damania
 
मुंबई : वकील विपुल दुशिंग जर घरगुती हिंसाचाराचे समर्थन करत असतील तर अशा वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबियाच्या वकीलांनी कोर्टात वैष्णवीच्या चात्रित्र्यावर संशय घेत अजब युक्तीवाद केला. यावर आता अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
 
आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत अंजली दमानिया म्हणाल्या की, "हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी काल कोर्टात जो युक्तीवाद केला ते ऐकून खूप खूप खूप संताप झाला. प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली, तर प्लास्टिकची छडी हत्यार आहे का, असे ते कोर्टात म्हणाले. त्यांनी वैष्णवीची बदनामी करायला सुरुवात केली. नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणे हा छळ आहे का, असे ते कोर्टात बोलले. असे विचारणाऱ्या या विद्वान वकिलांना घरगुती हिंसाचाराचे नियम माहीत आहेत का?" असा सवाल त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  "लांडग्याच्या पुढची औलाद..."; हगवणेंच्या वकिलाच्या युक्तीवादावर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
 
त्या पुढे म्हणाल्या की, "कायद्याच्या कलम ३ मध्ये घरगुती हिंसाचाराची व्याख्या व्यापक पद्धतीने केली आहे. ज्यामध्ये शारीरिक, मानसिक, शाब्दिक, भावनिक, लैंगिक आणि आर्थिक अत्याचार, हुंड्यासाठी छळ, पीडितेला किंवा तिच्याशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीला अत्याचार करण्याची धमकी देण्याचे कृत्य, हे समाविष्ट आहे. जर हे वकील विपुल दुशिंग घरगुती हिंसाचाराचे समर्थन करत असतील तर अशा वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे. पुणे बार असोसिएशनला हात जोडून विनंती की, या माणसाची सनद रद्द झाली पाहिजे," अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.