मुंबई : अनिल परब आणि उबाठाला उशिरा शहाणपण सुचलं आहे, असा टोला भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे, असं वक्तव्य उबाठा गटाचे नेते आणि मुंबई पदवीधर निवडणूकीचे उमेदवार अनिल परब यांनी केलं होतं. यावर आता दरेकरांनी प्रत्तुत्तर दिलं.
प्रविण दरेकर म्हणाले की, "अनिल परब आणि उबाठाला उशिरा शहाणपण सुचलेलं दिसतंय. २५ वर्ष मुंबईची सत्ता राबवत असताना मराठी माणसाचं काय हित साधलं, याचा लेखाजोखा आधी मांडा. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना अशासकीयच कशाला शासकीय ठराव मांडायचा, विधेयक आणायचं आणि निर्णय करायचा ना?"
"जर तुमच्या मनात ५०% जागा मराठी माणसाला द्याव्या असं असतं तर ते अडीच वर्षात का नाही केलं? आता अनिल परब विधानसभेचे उमेदवार आहेत. उद्या मध्यमवर्गीय मराठी माणसाचे, पदवीधराचे मत मिळावे यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. आम्ही मराठी माणसाच्या बाजूने आहोत. केवळ घरच काय भूमिपुत्रांना सगळ्या ठिकाणी प्राधान्य मिळायला हवं हा कायदा आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रात मराठी माणसाला प्राधान्य मिळण्यासाठी सगळ्यांची एकत्रित येऊन काम करायला हवं. भाजपसुद्धा या भुमिकेच्या सोबत आहे," असे ते म्हणाले.