
मुंबई, दि.१ : एप्रिलमध्ये मुंबईतील ११ हजार १६० घरांची विक्री झाली. या घरविक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून १०११ कोटी रुपये महसूल मिळाला. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये मुंबईतील घरविक्रीत घट झाली आहे. मार्चमध्ये १४ हजार १५४ घरांची विक्री झाली होती आणि यातून ११२२ कोटी रुपये महसूल मिळाला होता. मार्चमध्ये संपुष्टात आलेले आर्थिक वर्ष आणि १ एप्रिलपासून लागू झालेले रेडीरेकनरचे नवीन दर यामुळे दरवर्षी मार्चमध्ये घर विक्रीत वाढ होते. त्यानुसार मार्च २०२४ मध्ये १४ हजार १५४ घरांची विक्री झाली होती.
मार्च २०२१ मध्ये १७ हजार ७२८ घरे विकली गेली होती. तर मार्च २०२२ मध्ये १६ हजार ७२६ घरांची विक्री झाली होती आणि यातून ११६० कोटी रुपये महसूल मिळाला होता. २०२२, २०२१ च्या तुलनेत २०२४ मध्ये घरांच्या विक्रीत काहीशी घट झाली आहे. मात्र असे असले तरी २०२४ मधील ही आतापर्यंतची सर्वाधिक घर विक्री आहे. जानेवारीत १० हजार ९९७, तर फेब्रुवारीत १२ हजार ५५ घरे विकली गेली होती. मार्चमध्ये मात्र यात वाढ होऊन घरविक्रीच्या संख्येने १४ हजारांचा पल्ला पार केला. पण आता एप्रिलमध्ये यात काहीशी घट झाली असून एप्रिलमध्ये ११ हजार ६० घरांची विक्री झाली आहे.