चुलीआधी ‘मशाल’ पेटवा!

    05-Mar-2024   
Total Views |
Uddhav Thackeray group
 
मागे नाही का, जड मनाने मुख्यमंत्रिपद सोडल्यावर, मी बंगल्यातून मोठी काळी पेटी बाहेर काढली होती. त्या काळ्या पेटीत काय असेल, असे अनेकांना वाटले होते. काय म्हणता, माझ्या लाल रंगाच्या त्या पर्सबाबत लोकांना उत्सुकता आहे? त्यात काय असेल, असा सगळ्यांना प्रश्न पडलाय? जाऊ दे, मी काय म्हणतोय? आमच्यासोबत समाजवादी येतात, मुस्लीम येतात. पण, आम्हाला भाजपचं हिंदुत्व मान्य नाही. आमचं हिंदुत्व चूल पेटवणार आहे. काय म्हणता, आता चूल पेटवायची गरज नाही. मोदीकृपेने ’उज्ज्वला योजने’अंतर्गत खेड्यापाड्यात गॅस आलेत. असू देत, गरिबीचे उदाहरण दिले की, भाषणाला वजन येते ना? बाकी आता वजन म्हणून टिकून राहण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. मी नेहमी लोकांना सांगतो, माझ्याकडे त्यांना देण्यासारखे काही नाही. काय म्हणता, मग लाल पर्स देऊ? नाही. मी आधीही फेसबुकवर भाषण द्यायचो. आताही भाषण देतो. भाषण देऊन रेशन मिळत नसते, असे का म्हणता? अहो! ‘कोथळा’, ‘खंजीर’, ‘वाघनख’ असे म्हणत किती तरी दशके आम्ही काय नाय केले? लोकं होती ना ताब्यात? हं! पण गेले ते दिन गेले? तर काय म्हणत होतो की, आम्हाला भाजपचे हिंदुत्व मान्य नाही. भाजपचे हिंदुत्व कोणते, हे विचारू नका. आम्ही अयोध्येला राम मंदिरातही गेलेलो नाही. समजले का? तसेही थोरामोठ्यांचा आदर्श अंगी बाणवायलाच हवा ना? गांधी परिवार, पवार परिवार अयोध्येत राममंदिर प्राणप्रतिष्ठेला गेले का? मग मी कसे जाणार? काय म्हणता, मी त्यांचे ऐकतो; कारण ते दोन्ही घराणे ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे माझ्या जीवनाचे सूत्र जगतात. सत्तेत आपले घरचे लेकरंबाळं कशी येतील, हेच ते बघत असतात. हं! माझ्या लक्षात आलेच नव्हते. याचा अर्थ ते लोक माझी कॉपी करत असतात. मी आहेच ग्रेट! आता माझीच महती मी काय सांगू? सगळ्यांना माहिती आहे, पुनःपुन्हा काय बोलावं? कमळवाल्या देवेंद्र फडणवीसांना काय नि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय, देशकारण करण्यासाठी कष्ट करावे लागतात, नियोजन करावे लागते. किती काम करावे लागते. पण, मी फक्त फेसबुकवर लाईव्ह येऊन, अडीच वर्षं महाराष्ट्र गाजवला होता. मुद्दा पुन्हा भाजपचं हिंदुत्व वेगळं आहे. आमचे हिंदुत्व लोकांच्या चुली पेटवणार आहे. काय म्हणता, चूल पेटवण्याआधी आमची ‘मशाल’ पेटते का बघू?


बटाट्याशी नाते संपत नाही...


'जय श्रीराम म्हणा आणि उपाशी मरा’ अशी मुक्ताफळे नुकतीच मध्य प्रदेशमधील ’भारत जोडो न्याय यात्रे’मध्ये राहुल गांधी यांनी उधळली. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या, प्रभू श्रीरामचंद्रांबाबत असली विधानं कोणत्याही कारणाने का होईना, राहुल गांधी कसे करू शकतात? म्हणे, त्यांना म्हणायचे होते की, लोक ’जय श्रीराम’ म्हणत, दिवसभर मोबाईलवर गर्क असतात आणि त्यामुळे ते कामधंदे करत नाहीत आणि पैसे मिळवत नसल्याने त्यांना उपाशी राहावे लागते. पण, हे खरे आहे का? तर अजिबात नाही. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा झाला आणि अयोध्या तसेच लगतच्या परिसराचे भाग्य उजळले. धार्मिक, पर्यटन, सामाजिक सर्वच अनुषंगाने केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे, तर देशभरात आर्थिक उलाढालीमध्ये तेजी आली. पण, हे सगळे राहुल गांधी यांना माहीत असण्याचे कारण नाही. कारण, अयोध्येमध्ये अठरापगड जातीचा हिंदू वर्ण-वर्ग-प्रांत-भाषा भेद विसरून, केवळ राममय झाला होता. देशाचे पहिल्या क्रमांकाचे उद्योगपती, अभिनेते, राजकारणी समोर खुर्चीवर बसले होते आणि मंदिराच्या गर्भागृहात मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त वनवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे १५ दाम्पत्ये होती. या अशा समरस वातावरणात राहुल गांधी यांना हा अगला हा पिछडा म्हणत, जातिभेद करता आला नाही. त्यामुळे आता काय करायचे, या गोंधळात ते आहेत. ‘र’ म्हणजे ‘राम’ आणि ‘र’ म्हणजे ‘राहुल’ही अशी अतिशयोक्ती करणारे काँग्रेसचे नेते आणि त्यांचे सर्वेसर्वा राहुल गांधी! त्यांना रामाबद्दल कधीतरी प्रेम वाटणे शक्य आहे का? त्यामुळे देशात रामनामाचा एकच भक्ती उल्हास सुरू असताना, राहुल गांधी यांना कसेसेच वाटू शकते. असो. याच यात्रेत मध्य प्रदेशातील युवकांना राहुल गांधी यांच्यासमोर ’जय श्रीराम’, ‘मोदी मोदी’ असे नारे लावले. राहुल गांधी तिरमिरीत त्यांना भेटायला गेले, तेव्हा या लोकांनी राहुल गांधी यांच्या हातात बटाटे दिले. का? तर राहुल गांधी यांचा सुप्रसिद्ध शोध ‘आलू से सोना बनाना!’ आता यावर काही लोकांचे म्हणणे की, रामनामाचा द्वेष करणार्‍यांच्या डोक्यात आधीच बटाटे असताना, त्यांना आणखीन हातात बटाटे का दिले, तर राहुल आणि बटाटे यांचे नाते संपता संपत नाही...

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.