अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज देशव्यापी आंदोलन (ABVP Protest all over India) करून संदेशखाली येथील महिलाच्या न्यायासाठी मागणी केली आहे. तसेच प.बंगाल सरकार विरोधातही तीव्र आंदोलन केल्याचे दिसत आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे झालेल्या महिला अत्याचाराविरोधात देशभरातील युवा आक्रमक झाला आहे. संदेशखालीतील पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी मोठ्या संख्येने तो रस्त्यावर उतरला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंगळवार, दि. ५ मार्च रोजी देशव्यापी आंदोलन होत असून युवावर्गाने या आंदोलनांत मोठा सहभाग घेत असल्याचे अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांनी सांगितले.
ते म्हणाले की,"दुर्गा मातेची, कालिका मातेची उपासना करणे, तिची पूजा करणे ही पश्चिम बंगालची परंपरा आहे. येथील प्रत्येक महिलेकडे देवीसमान पाहिले जाते. असे असूनही संदेशखालीमध्ये मात्र टीएमसीच्या गुंडांकडून होणारे अत्याचार आणि त्यांना असलेल्या ममतादीदी सरकारचा पाठींबा यामुळे येथील महिला व मुली असुरक्षित आहेत. याप्रकरणी युवावर्ग तीव्र आक्रोषात आज रस्त्यावर उतरून महिलांसाठी न्याय मागताना दिसत आहे."
देशव्यापी आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले, "पश्चिम बंगालमधील यापूर्वीचे डाव्या विचारसरणीचे सरकार आणि सध्याचे ममता बॅनर्जी यांचे सरकार यांच्यामुळे जिहादींचे मनसुबे अवकाशाला भिडले आहेत. या जिहादींद्वारे प.बंगालमधील हिंदू परिवारांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे आताची वेळ ही प्रतिकार करण्याची असल्याने अभाविपने प. बंगालमधील महिलांच्या सन्मानासाठी, सुरक्षेसाठी आणि त्यांच्या स्वाभिमानासाठी देशभरात निषेधार्थ आंदोलन करण्याचे ठरवले आहे."
ममतादीदी आणि प.बंगाल सरकारविरोधात देशभरातील युवावर्ग रस्त्यावर उतरला असून संदेशखाली प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त करत आहे. त्यामुळे अभाविपचे हे देशव्यापी आंदोलन ममतादीदींना भारी पडणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.