‘आरण्याक’, ‘चुक भूल द्यावी घ्यावी‘, ‘बटाट्याची चाळ’ ही गाजलेली नाटकं किंवा ‘चिमणराव’, ‘घरकुल’ या मालिका आणि ‘छक्के पंजे‘, ‘झपाटलेला’, ‘नारबाची वाडी’ असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट रसिकप्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणारे आणि अभिनय या आपल्या हौसेचा व्यवसाय करून, मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी आपल्या अभिनयाने समृद्ध करणारे ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त अभिनेते दिलीप प्रभावळकर... ‘इच्छामरण’ या विषयावर आधारित ‘आता वेळ झाली’ हा प्रभावळकर मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने दिलीप प्रभावळकर यांच्याशी साधलेला सुसंवाद...
जगणं नियोजित करू शकतो. मग मरण का नाही?
मराठी चित्रपटसृष्टीत निरनिराळे विषय-आशय अगदी लीलया हाताळले जातात. अशाच अनेक विषयांपैकी एक विषय म्हणजे इच्छामरण. विषय जरी गंभीर असला, तरी हलक्या-फुलक्या पद्धतीने त्या विषयाची मांडणी करत, संवेदनशीलता कुठेही जाणार नाही, याचे भान आता ’वेळ झाली’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी राखले आहे. चित्रपटाबद्दल बोलताना दिलीप प्रभावळकर म्हणाले की,“ ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे कथानक इच्छामरणावर आधारित आहे. या चित्रपटात सक्रिय इच्छामरणावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटात मी जी भूमिका साकारली आहे, ती काळाच्या पुढचा विचार करणार्या शशीधरची आहे. क्रांतिकारक विचारसरणीचा हा शशीधर असून, त्याचे एकच ध्येय आहे की, आनंदाने जगूया आणि आनंदाने मरुया. आपलं जगणं जर का आपण नियोजित करू शकतो, मग मरण का करू शकत नाही, असा थेट प्रश्न तो विचारणारा आहे.“
अभिनय क्षेत्रातील वाटचाल...
शैक्षणिकदृष्ट्या दिलीप प्रभावळकर हे विज्ञान विषयात पारंगत. परंतु, अभिनय क्षेत्राकडे ते ओघाओघाने वळले. अभिनय क्षेत्राची सुरुवात कशी झाली, हे सांगताना ते म्हणाले की, ”लहानपणापासून मला अभिनयाची आवड होतीच. पण, मनोरंजन क्षेत्रात मी माझं करिअर करेन, असं कधीच वाटलं नव्हतं. मी ’बीएससी’ केली, त्यानंतर ‘टाटा रिसर्च सेंटर’ला मी ‘एसएससी’ केलं, त्यानंतर ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’त डिप्लोमा केला, तर अशी शैक्षणिक पार्श्वभूमी असताना, माझं मन मात्र अभिनयाकडेच होतं. मनोरंजन क्षेत्रात माझ्या कुटुंबातील कोणतीच व्यक्ती कार्यरत नव्हती. त्यामुळे या क्षेत्रात कोणतंही पाठबळ नसताना मी आलो आणि नोकरी सांभाळून ‘चिमणराव’ ही मालिका, ‘एक डाव भूताचा’ चित्रपट आणि ‘सूर्याची पिल्ले‘ हे नाटक अशा मनोरंनाच्या तिन्ही माध्यमांत कामं केली. अशा पद्धतीने माझ्या हौसेचा व्यवसाय झाला आणि माझा संपूर्ण वेळ मी केवळ अभिनयाला आणि या मनोरंजन क्षेत्राला दिला.
माझ्यातल्या कलाकाराचा शोध रंगभूमीवर लागला. कलाकाराला रंगभूमी समृद्ध करते. याच विचारांना पुढे घेऊन जात नाटक म्हणजे माझ्यासाठी काय याची व्याख्या सांगताना दिलीप प्रभावळकर म्हणाले की, ”नाटकात काम करणं म्हणजे स्वतःला शोधणं आहे. एक कलाकार म्हणून ज्यावेळी तुम्ही रंगभूमीवर काम करता, त्यावेळी तुम्ही स्वतःला नव्याने गवसता आणि तुमच्यातील सुप्त गुण तुम्हालाच कळतात. त्यामुळे मी असं म्हणेन की, माझ्यातल्या कलाकाराचा शोध हा रंगभूमीवर लागला आणि विशेष म्हणजे, आतापर्यंत मी साकारलेली प्रत्येक भूमिका माझ्याआधी माझ्यात दिग्दर्शकांना दिसली. ‘अलबत्या गलबत्या’मधील चेटकी मी करू शकलो, ते दिग्दर्शक आणि लेखकांमुळे. ‘चौकट राजा’ ही भूमिका माझ्या वाटेला आयत्यावेळी आली. कारण, आधी अभिनेते परेश रावल ‘चौकट राजा’मधील नंदूची भूमिका करणार होते. पण, बदल झाल्यामुळे ‘चौकट राजा’ चित्रपटातील ती भूमिका मी साकारली. कायम साधी, भोळीभाबडी पात्र साकारत होतो; पण मी खलनायक साकारावा, ही दिग्दर्शक महेश कोठारे यांची कल्पना होती आणि त्यांच्यामुळेच ‘तात्या विंचू’ घडला. त्याव्यतिरिक्त ‘लगे रहो मुन्नाभाई’ या हिंदी चित्रपटातील महात्मा गांधी यांची भूमिका दिग्दर्शक राजू हिरानी यांना माझ्यात दिसली. त्यामुळे सांगायचं तात्पर्य काय? तर दिग्दर्शकांना माझ्यात ती पात्रं दिसल्यामुळे, आज मी इतक्या भूमिका साकारू शकलो आणि रंगभूमीवर वैविध्यपूर्ण भूमिका आधी करून पाहिल्या. त्यानंतर चित्रपटांत काम करताना आत्मविश्वास अधिक आला.”
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागूंचं ते पत्र मला ’राष्ट्रीय पुरस्कारा’इतकचं महत्त्वाचं!
मराठी रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक, नाट्यकर्मी यांनी कायम नवनवीन प्रयोग केले आणि ते प्रेक्षकांना आवडलेदेखील. असाच एक वेगळा प्रयोग दिलीप प्रभावळकर यांनी ’हसवाफसवी’ या नाटकाच्या माध्यमातून केला होता. ज्यात त्यांनी विभिन्न सहा पात्रं साकारली होती. या नाटकाचाच खास प्रसंग सांगताना ते म्हणाले की, “ ‘हसवाफसवी’ नाटक म्हणजे नाटक कसे लिहू नये, याचा एक आदर्श वस्तुपाठ होता. पण, माझ्यातल्या लेखकाने माझ्यातल्याच नटासाठी लिहिलेली की एक कलाकृती होती. मी एकाचवेळी दोन-तीन भूमिका करू शकतो, याची मला जाणीव झाली होती. त्यामुळे स्वतःलाच आव्हान देण्यासाठी, मी एकमेकांशी संबंध नसलेली सहा पात्रं लिहिली आणि अनपेक्षितपणे त्या नाटकाला यश मिळाले, त्याचे ७५० प्रयोग झाले. त्या नाटकाच्या एका प्रयोगाला डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, पु. ल. देशपांडे आले होते. सत्यजित दुबे तर त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन आले. पण, मला डॉ. लागू आल्यामुळे जरा भीती वाटत होती. मी विचार करत होतो की, लागूंसारख्या कलाकारांना हे विनोदी नाटक कसं वाटेल. पण, ते ’हसवाफसवी’ या माझ्या नाटकाच्या प्रेमात पडले आणि त्यांनी मला एक पत्र लिहिलं, त्यात त्यांनी लिहिलं होतं की, ‘हसवाफसवी’चा प्रयोग पाहणं म्हणजे अभिनयाचा वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासारखे आहे. त्यांच्या परवानगीने मी ते पत्र छापलं पण होतं.”
‘अनुदिनी’ या पुस्तकावरून ’श्रीयुत गंगाधर टिपरे’
‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेचा अनुभव सांगताना दिलीप प्रभावळकर म्हणाले की, ” ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या गाजलेल्या मालिकेबद्दल प्रेक्षकांनी ही मालिका कधी बंद करणार, हे विचारण्याऐवजी का बंद केली, हे विचारणं बरं, असा विचार करून मी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी विचारपूर्वक ही मालिका बंद केली. मुळात ’श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका मी लिहिलेल्या ‘अनुदिनी’ या पुस्तकावरून करण्यात आली. माझ्या पुस्तकात केदार शिंदे यांना मालिका दिसली आणि मग विचार करून मालिकेसाठीचे लिखाण गुरू ठाकूर यांनी केले. या मालिकेतील टिपरे कुटुंबाबद्दल बोलायचे झाल्यास, ती पात्रं म्हणजे आबा, शेखर, शामला, शिर्या आणि शलाका. ही पात्र मी माझ्या कल्पनेतून तयार केली होती आणि ती मालिका प्रेक्षकांना फार आवडली याचा आनंद आहे,” अशा भावना प्रभावळकर यांनी व्यक्त केल्या.