'एक देश एक निवडणूक' हे होता कामा नये : उद्धव ठाकरे
17-Dec-2024
Total Views | 77
नागपूर : (Uddhav Thackeray) केंद्रातील मोदी सरकारने 'एक देश, एक निवडणूक' या विधेयकाला गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. त्यानंतर मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी 'एक देश एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले असून त्यावर मतदान घेण्यात येणार आहे. 'एक देश एक निवडणूक' विधेयकाला लोकसभेत काँग्रेस सहीत इंडी आघाडीने विरोध दर्शवल्याचे समोर आले आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद झाली. एक देश एक निवडणूक याबद्दल त्यांनाही प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट मत मांडत विरोध दर्शवला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
अदानींचा मुद्दा असो किंवा देशातले आणखी काही महत्वाचे विषय असोत, त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हा विषय आणला जात आहे. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयुक्त हे देखील निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत. नियुक्ती करुन नेमण्यात आलेले निवडणूक आयुक्त जर आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. निवडणूक आयुक्तसुद्धा निवडून आला पाहिजे. तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे. त्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक हे होता कामा नये, अशी ठाम भूमिका उबाठाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली. या ( विधानसभा) निवडणुकीत राज्यात जे झालं ते महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही, आणि हे पटलेलं नसताना त्यांच्या डोक्यावर अशा पद्धतीने निवडणुका लादू शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.