मुंबई : (CSMT Best Bus Accident) कुर्ला बेस्ट बस अपघात दुर्घटना ताजी असताना सीएसएमटी परिसरातील बेस्ट बस अपघातात आणखी एकाचा निष्पाप बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बेस्ट बस खाली चिरडल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. सीएसएमटी स्थानकाजवळ हा अपघात घडला असून जवळच्या रुगणालयात नेत असतानाच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
बस चालकाला अटक, दुचाकीस्वाराचा शोध अद्याप सुरु
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील मुंबई पोलीस झोन एक कार्यालयाजवळ एक अंदाजे ६० वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तीला आधी एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने ते रस्त्यावर पडले आणि मागून येणाऱ्या बेस्ट बसच्या चाकाखाली आले. याप्रकरणी मुंबईतील एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बस कुलाबा बस डेपोकडे जात होती. बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे. मृताची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. त्या दिशेने पोलिसांचे तपासकार्य सुरु आहे.