थरकाप उडवणारा कुर्ला बेस्ट बस अपघात! भरधाव वेगात रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडले

७ जणांचा मृत्यू तर ४९ जणांची प्रकृती गंभीर

    10-Dec-2024
Total Views | 145

KURLA
मुंबई :  (Kurla Best Bus Accident) मुंबईतील कुर्ला येथे सोमवार दि. ९ डिसेंबर रोजी रात्री भरधाव वेगात बेस्ट बसने आठ ते दहा वाहने आणि पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून ४९ लोक गंभीर जखमी झाले असून त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
 
कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरील आंबेडकर नगर येथे हा भीषण अपघात झाला. ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीच्या दिशेने जात होती. घटनेतील आरोपी बसचालक संजय मोरे सोमवारी पहिल्यांदाच बस चालवत होते, असे सांगण्यात येत आहे. १ डिसेंबर रोजीच ते बेस्टमध्ये कंत्राटी चालक म्हणून भरती झाले होते.
 
कुर्ल्यातील शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार दिलीप लांडे यांनी रात्री घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या अपघाताची प्राथमिक माहिती दिली. आमदार दिलीप लांडे म्हणाले, "कुर्ला स्थानकातून निघालेल्या बसचे ब्रेक निकामी झाल्याचे समजताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. घाबरुन ब्रेक दाबण्याऐवजी चालकाने एक्सलेटर दाबल्याने बसचा वेग वाढला. त्याच भरधाव वेगात बसने रस्त्यावरील वाहनांना तसेच पादचाऱ्यांना धडक दिली", असे त्यांनी सांगितले.
 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा थरार
 
अपघाताच्या वेळी उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी झैद अहमद यांनी सांगितले की, ते रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी घरातून निघाले होते.बस वेगाने हलत असल्याचे त्यांनी पाहिले. झैद यांनी तेथे धाव घेतली आणि पाहिले की बेस्ट बसने पादचारी, एक ऑटो रिक्षा आणि तीन कारसह अनेक वाहनांना धडक दिली होती. त्यांना काही मृतदेहही दिसले. यानंतर त्यांनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुटका करून त्यांना भाभा रुग्णालयात नेले. त्यांच्या मित्रांनीही जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121