२०१२ च्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला सुवर्णपदक मिळवून देणारा ऑस्कर पिस्टोरियस तब्बल ११ वर्षांनी तुरुंगाबाहेर आला आहे. आपल्या राहत्या घरात प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पची त्याने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्या घटनेपासून तो तुरुंगातच होता. ‘ब्लेड रनर’ या नावाने क्रीडा जगतात ऑस्कर पिस्टोरियसची ओळख आहे. त्याने क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी कौतुकास्पद असली तरी तो शीघ्रकोपी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
त्यातूनच त्याने आपल्या प्रेयसीची हत्या केली. आरोप सिद्ध झाल्यापासून दि. ५ जानेवारीपर्यंत ऑस्कर तुरुंगातच होता. सुटका झाल्यानंतर हे वृत्त दोन दिवसांनी म्हणजेच दि. ७ जानेवारी रोजी माध्यमांना कळले. त्यानंतर जगभरातील माध्यमांनी त्याच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसह त्याने संतप्त अवस्थेत प्रेयसीची केलेली हत्या आणि तब्बल ११ वर्षे तुरुंगात घालविले आदींचा आढावा घेतला. या संदर्भात प्रत्यक्ष ऑस्कर माध्यमांपासून लांबच आहे.
सुवर्णपदक विजेता पॅराऑलिंम्पिकचा क्रीडापटू ज्याला या क्षेत्राने ओळख मिळवून दिली. त्या ऑस्कर पिस्टोरियसला दोन्ही पाय नाहीत, तो कृत्रिम पायांच्या मदतीने धावतो. या क्षेत्रात झालेल्या विविध स्पर्धांत त्याने लक्षणीय यशही संपादन केले आहे. ऐन उमेदीच्या काळात असतानाच हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात रवानगी झाल्यामुळे त्याची कारकिर्द संपुष्टात आली आहे. त्यातूनच त्यास नैराश्यही आले आहे.
सुवर्णपदक विजेत्या ऑस्करला प्रसिद्धी पैसा आणि नावलौकिकही मिळाला. प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प सोबत तो आयुष्याची वाटचाल करत होता, तर रिव्हा ही भावी आयुष्याच्या स्वप्नात व्यस्त असताना दि. १४ फेब्रुवारी, २०१३ व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच ऑस्करने भल्या पहाटे घरातच असलेल्या स्वच्छता गृहातून बाहेर येताना रिव्हाची गोळ्या झाडून हत्या केली. त्याने केलेले हे कृत्य संतापाच्या भरात केल्याचे न्यायालयाने नोंदविले आहे. त्यामुळेच तुरुंगातून सुटका करण्यापूर्वी न्यायालयाने त्याला लैंगिक हिंसाचाराबाबत जनजागृती करणार्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागेल.
राग नियंत्रणात राहावा, यासाठी त्याला वेगेवगळ्या उपचार पद्धती सुरू ठेवाव्या लागतील या अटींसह पॅरोल मंजूर केला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ऑस्कर प्रिटोरिया येथे राहण्याची शक्यता त्याच्या हितचिंतकांनी व्यक्त केली आहे. राग नियंत्रणात ठेवण्यात ऑस्करला अपयश येत असल्यामुळेच मित्र स्नेही आणि आप्तेष्ट त्याच्यापासून लांबच राहत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याचे पुढील आयुष्य कसे असेल आणि कुणासोबत असेल याबाबत कुणालाही कसलाही तर्क काढता येत नाही.
वास्तविक दोन्ही पाय नसलेला ऑस्कर कार्बन-फायबरच्या कृत्रिम पायांच्या मदतीने वेगात धावतो. त्याने त्यासाठी विशेष शैली विकसित केली आहे. त्यामुळे त्याला ‘ब्लेड रनर’ म्हणून संपूर्ण जगात ओळख मिळाली. मात्र, त्याने केलेल्या प्रेयसीच्या हत्येमुळे त्यास १३ वर्षे आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली त्याचबरोबर त्याच्या यशाचा वेग आणि आलेखालाही पूर्णविराम मिळाला. शिक्षेच्या कालावधीत त्याची सुधारक केंद्रात रवानगी करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेत जे लोक गंभीर गुन्हे करतात ते किमान अर्धी शिक्षा भोगल्यानंतर पॅरोलसाठी पात्र ठरतात. त्यानुसार मार्च २०२३ मध्ये ऑस्करने पॅरोलसाठी केलेला अर्ज दि. २४ नोव्हेंबर, २०२३ मध्ये मंजूर झाला. त्यानंतर विविध प्रक्रिया पूर्ण केल्यावर शुक्रवार, दि. ५ जानेवारी रोजी ऑस्करची सशर्त सुटका करण्यात आली आहे. तसे पाहिले, तर ऑस्करची शिक्षा २०२९ मध्ये संपणार आहे.
मात्र, तुरुंगात त्याचे वर्तन चांगले होते. तसेच त्यास ठेवण्यात आलेल्या सामुदायिक सुधारणा प्रणालीत त्याने नियम, अटी आणि शर्ती यांचे व्यवस्थित पालन करत आपल्यात बदल घडवून घेतला. त्यामुळेच त्यास पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. स्वभावावर नियंत्रण नसल्यामुळे एखादा क्रीडापटू अशाप्रकारे हत्येच्या आरोपात तुरुंगात गेल्यामुळे त्याची संपूर्ण कारकिर्द संपुष्टात आल्याची ही दुर्मीळ घटना म्हणता येईल. वय वर्षे अवघे ३८ असलेल्या ऑस्करचे भविष्य काय आहे, शिक्षा पूर्ण झाल्यावर तो नेमका काय करणार आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता त्याच्यासह त्याच्या चाहत्यांनाही असून. ऑस्करच्या जीवनातील शोकांतिका सुपंष्टात येण्याची आशादायक चिन्हे त्याच्या चाहत्यांना आहेत.
मदन बडगुजर