मल्लखांबातील ‘उदय’स्तंभ

    27-Jan-2024   
Total Views |
Article on Coach Uday Deshpande

मल्लखांब हा अस्सल महाराष्ट्री खेळ. समर्थ रामदासांनी त्याची रुजवात महाराष्ट्रात केली, असेही पुरावे आढळतात. संपूर्ण महाराष्ट्राला संघटित करणार्‍या आणि बलोपासनेतून तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणार्‍या या खेळाचा जगभरात प्रचार-प्रसार मात्र उदय देशपांडे यांनी केला. अशा या मल्लखांबचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक उदय देशपांडे यांना नुकताच भारत सरकारने ’पद्मश्री’ पुरस्कार जाहीर केला आहे. २०१९ साली राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार उदय देशपांडे यांनी जाहीर झाल्यानंतर, दै. ’मुंबई तरूण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी त्यांची मनोगाथा सांगितली होती. तेव्हा मुलाखतीत देशपांडे यांनी कथन केलेले त्यांच्या जीवनातील अनुभव आणि त्यांचे आजवरचे मल्लखांब क्षेत्रातील योगदान शब्दबद्ध करणारा हा लेख...

नारायण हनुमंत पेशाने अभियंता. ते भल्या पहाटे सकाळी उठून योगासने करत. उदय म्हणजे त्यांचा नातू. तेव्हा पहाटे उठून आजोबांसमोर बसून ते आजोबांप्रमाणे कसरती करायचा प्रयत्न करायचे. आजोबांनी त्यांचा ओढा जोखून, त्यांच्या आईला तेव्हाच सांगितले - ‘मुंबईत दादरला समर्थ व्यायामशाळा आहे. तिथे याला घेऊन जा. शरीरयष्टी लवचिक आहे, तेव्हा मल्लखांब करून लेक नाव काढील.’

उदय देशपांडे यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण दादरच्या किंग जॉर्जमध्ये, तर ‘एसएससी’पर्यंतचे शिक्षण माहीमच्या लोकमान्य विद्यामंदिरात झाले. काळाचौकीला राहत असल्याने, ते ट्रामने माहीमला जा-ये करीत असत. रसायन व वनस्पतीशास्त्र हे विषय घेऊन ते रुईया महाविद्यालयातून १९७३ मध्ये ’बीएस्सी’ झाले. १९६९ ते १९७५ या काळात योग, मल्लखांब, जिम्नॅस्टिक, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्ती इत्यादी स्पर्धांत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धक या नात्याने भाग घेऊन, त्यांनी अनेक सन्मान आपल्या नावावर केले. त्यांनी पतितांना सुखी करण्यासाठी सुद्धा मल्लखांबाचा माध्यम म्हणून वापर केला. वनवासी, मूकबधीर, मानसिक विकास न झालेले व दिव्यांगा सर्व ते मोफत मल्लखांब प्रशिक्षण देतात. ते म्हणतात की, “मी पहिल्यांदा जेव्हा अंध मुली पाहिल्या, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर भावच नव्हते. जगावे लागतेय म्हणून जगतोय, अशा चेहर्‍याने त्या माझ्या समोर उभ्या होत्या. त्यांना कशाचेही काही देणेघेणे उरले नव्हते. टीटॅनच्या आयुष्यात कदाचित काही उद्दिष्ट नसेल. मी त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि त्यांना काहीतरी मिळालं. त्यांचं असं. त्या आपलं म्हणू शकतील असं आणि त्या खुलल्या. हे पाहून मी थक्क झालो. आजतागायत मी त्या मुलींना मोफत शिकवतो.”

प्रल्हाद काळे हे त्यांचे गुरू. त्यांनीच खर्‍या अर्थाने उदय यांना मल्लखांबाचे बाळकडू पाजले. तालीम दिली. आखाड्यात कुस्ती खेळायला शिकवली. सात-आठ लहान मुलांसमवेत ते खेळत. मुलांच्या विरोधात ते एकटे, असा फड रंगायचा. कुस्तीसोबतच मल्लखांब, लाठीकाठी व जंबिया या सर्वांचे प्रशिक्षण काळे यांच्याकडून उदय यांनी घेतले. पुढे त्यांना मल्लखांबविषयी विशेष गोडी निर्माण झाली आणि स्पर्धेत सहभाग घ्यायला आवडू लागले. आपल्यासोबत इतरही मुलांना तयार करावे, या प्रेरणेने झपाटून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच मल्लखांबला समर्पित केले. त्याबद्दल सांगताना ते एक मजेशीर आठवण सांगतात. ते म्हणतात की, “मी रोज सकाळी ४ वाजता उठतो आणि ४.३०ला व्यायामशाळेत येतो. तेव्हापासून थेट रात्री १०.३० ते ११ वाजता घरी जातो. मला या माझ्या सरावाची इतकी सवय होऊन गेली आहे की, माझे लग्न होते तेव्हाही मला मल्लखांब चुकवायचा नव्हता. मी सकाळी उठलो, शाळेत गेलो. सर्व केलं आणि मग येऊन बोहल्यावर उभा राहिलो.”

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत जे संचलन होतं, त्यात मल्लखांब आणि रोप या नव्या खेळांना घेऊन येण्याचे श्रेय सर्वस्वी उदय यांना जाते. १९८२ पासून आजपर्यंत वेगवेगळ्या विद्यापीठांनी संचालित केलेल्या आंतरविद्यापीठीय मल्लखांब चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये उदय यांनी प्रशिक्षक व परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. देशातल्या बहुतेक सर्व राज्यांत मल्लखांब आणि त्याच्या तंत्राचा प्रसार करून त्याला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी, त्यांनी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. त्यांच्या हाताखाली शिकलेल्या कित्येक मुलामुलींनी मल्लखांब आणि व्यायामात अनेक पुरस्कार मिळवले आहेत. मल्लखांब, योग व व्यायामामध्ये राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणार्‍या मुलामुलींची संख्या जवळजवळ शतकाच्या आसपास पोहोचली आहे. यातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, १९७९ ते १९९० या अवधीत झालेल्या जवळपास सर्व राष्ट्रीय जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप्समध्ये खेळ किंवा स्पर्धा यांचे पंच म्हणून उदय यांनी निर्णायक भूमिका निभावली आहे. खर्‍या अर्थाने मल्लखांबला न्याय मिळून दिला, तर त्याचबरोबर या खेळाचे महत्त्वही इतरांना अधोरेखित करावयास भाग पडले. त्यांच्या मुलानेही या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. तालुका, जिल्हा, राज्य आणि पुढे राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मल्लखांब शिकवणारी प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली. ज्या शहरात केवळ दोन प्रशिक्षण केंद्रे होती, तिथे आज ११०च्या वर प्रशिक्षण केंद्रे आहेत.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक तरी केंद्र उभारायचे, हे स्वप्न त्यांचे आज सत्यात आले आहे. या सर्व केंद्रांना रजिस्टर करून, ’राज्य मल्लखांब संघटने’शी संलग्न केले. १९८७ मध्ये ते ’मल्लखांब फेडरेशन इंडिया’चे सेक्रेटरी झाले. त्यावेळी केवळ चार राज्यांमध्ये मल्लखांब होता. पुढे २९ राज्यांत स्वतंत्र मल्लखांब संघटना स्थापन झाल्या. फेडरेशनला त्या संलग्न झाल्या. अगदी पूर्वोत्तर राज्यातील सर्व प्रदेशांत देशपांडे यांच्या प्रयत्नाने मल्लखांब सुरू झाला. पुढे त्यांनी भारताच्या सीमेचेही उल्लंघन केले. सर्वप्रथम जपान त्यानंतर इंग्लंड अशा आजवर एकूण ३५हून अधिक देशांत त्यांनी जाऊन मल्लखांब सुरू केले आहेत. पुढे ’वैष्णव मल्लखांब फेडरेशन’ स्थापन झाले आणि या वैश्विक पातळीवर स्पर्धाही झाली. मराठी नाव जगभरात पोहोचवणारे असे हे एक अजून खास व्यक्तिमत्त्व. त्यांनी १९९८ मध्ये मल्लखांबाला ’इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन’ची मान्यता मिळवून दिली. २००२ साली ब्राझीलमध्ये आयोजित दुसर्‍या ’विश्वकप मल्लखांब चॅम्पियनशिप’चे मानद सचिव म्हणून उदय विश्वनाथ देशपांडे यांची नियुक्ती झाली होती. २००८ पर्यंत त्यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, डेन्मार्क, जर्मनी, जपान, कोरिया, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, झेकोस्लोवाकिया, स्पेन, मलेशिया इत्यादी देशांतल्या नागरिकांना भारतात मल्लखांबाचे व्यक्तिगत प्रशिक्षण दिले. युटा स्नायडर हे जर्मन गृहस्थ २००२ मध्ये भारतात आले असताना, मल्लखांबाकडे आकर्षित झाले. त्यातूनच उदयरावांनी ५० मुलांचे एक आठवड्याचे शिबीर म्युनिकमध्ये घेतले. तेथे मल्लखांबाची रुची वाढीस लागली आहे. आतापर्यंत त्यांच्या जर्मनीला पाच भेटी झाल्या आहेत. २००८ मध्ये त्यांनी श्री समर्थ व्यायाम मंदिराचा दहा जणांचा चमू म्युनिकला नेला होता.

काही पत्रकारांनी त्यांना सांगितले होते की, ”मल्लखांब करण्याने काय साध्य होणार? मल्लखांब केवळ इथवर मर्यादित आहे, जिम्नॅस्टिक करायला सुरुवात केली, तर आंतरराष्ट्रीय वलय असलेल्या एका स्पर्धेशी तुझा संबंध येईल.“ परंतु, मल्लखांब आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जायचे स्वप्न त्यांनी पहिले, ही मोठी गोष्ट आहे. आपल्या सर्वांसाठी!

मुलांना त्रास होतो. गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात जाऊन, वरच्या बाजूला झेप घेत, चढाई करायची असते. अंगठा आणि बाजूच्या बोटात दोर पकडायचा. दुखतं. मांडीत खांब पकडून वर जायचे. सोपे नसते, त्रास होतो. त्रास होतो म्हणून बरीच मुले रामराम ठोकतात. मग त्यांच्यासाठी सोप्या पद्धती त्यांनी शोधून काढल्या. मल्लखांबाच्या नियमित सरावाने केवळ हाता-पायांच्या स्नायूंनाच नव्हे, तर शरीरातील इतर अवयव आणि संस्था, पचन संस्था, श्वसन संस्था, चयापचय क्रिया यांना फायदा होतो. आरोग्याची गुरुकिल्ली आपण पाठीच्या कण्याला म्हणतो, त्याचे सर्वाधिक चलनवलन मल्लखांबावर होते, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. मधुमेह, रक्तदाब, डोकेदुखी, अर्धशिशी आणि निद्रानाश अशा अनेक समस्यांवरचा जालीम उतारा म्हणजे मल्लखांब! या मल्लखांबाला विश्वास जोडणारे, मल्लविद्येतील उदयस्तंभ म्हणजे उदय देशपांडे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.