संस्कृतच्या प्रचार, प्रसार तसेच व्यवहारातील पुनरूज्जीवनासाठी प्रयत्नरत असलेल्या ‘संस्कृतभारती’ संस्थेच्या ठाणे शाखेद्वारा संस्कृत अभ्यासक, संस्कृत शिक्षक तसेच संस्कृतप्रेमींसाठी पर्वणी ठरेल, असे एक दिवसाचे ‘ठाणे जिल्हा संस्कृत संमेलन’ आज रविवार, दि. २१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ‘संस्कृतभारती’च्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
संस्कृत भाषा सामान्य लोकांपर्यंत नेण्याचा ’संस्कृत भारती’च्या आंदोलनाची सुरुवात १९८१ मध्ये झाली. २४ वर्षांपूर्वी सुरू झालेले हे आंदोलन प्राथमिक स्तरावर एक प्रयोग होता. संस्कृतविषयी लोकांमध्ये काही भ्रम तसेच एक अंतर निर्माण झाले होते. संस्कृत कठीण आहे, सुरुवातीलाच व्याकरणाचा अभ्यास करणे, तो पण दीर्घकाळ करणे अपेक्षित आहे, संस्कृत ही तर प्राचीन भाषा आहे, तिचा आज वर्तमानकाळात काय उपयोग, त्यामुळे पोट थोडीच भरणार आहे यांसारखे भ्रम लोकांच्या मनात दृढ झाले होते. त्यांचे निवारण करण्यासाठी काय करायला हवे, हा यक्षप्रश्न होता.
प्रारंभी काही तरुणांनी विविध प्रयोग केले. सामान्यतः २४ वर्षे त्यांनी हे प्रयोग केले. जरी बंगळुरूमध्ये या कार्याचा आरंभ झाला असला, तरी प्रयोग देशभर विविध भागांत केले. महानगरात, नगरात, खेड्यांमध्ये, सेवावस्त्यांमध्ये तसेच सुशिक्षितांमध्ये, अशिक्षितांमध्ये सर्वत्र संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी या तरूण कार्यकर्त्यांनी प्रयोग केले. परिणामतः दहा दिवस प्रतिदिन दोन तासांचे शिबीर हा उपक्रम निश्चित झाला. केवळ दहा दिवसांत सामान्यतः व्यक्ती दिवसभरात जी वाक्ये बोलते, ती वाक्ये या शिबिरात शिकवली जातात. गाणी, कथा, खेळ या आधाराने सहजरित्या हे शिबीर चालवले जाते. विविध साधनांचा उपयोग तसेच अभिनयाद्वारे शिक्षक शिकवतात. कुठलीही व्यक्ती भाग घेऊ शकते. यामुळे लोकं आनंद अनुभवतात. हे शिबीर निःशुल्क असते. हे शिबिर सर्वत्र यशस्वी झाले आहे. संस्कृतविषयी लोकांचे जे भ्रम असतात, त्यांचेदेखील निराकरण होते.
१९९४ साली ’संस्कृतभारती’ या नावाने नोंदणी झाली. लोकांच्या प्रतिक्रियेमुळे उत्साह वाढला. दिल्ली, काशी, मुंबई या महानगरांमध्ये शिबिरांचे मोठे अभियान झाले. अनेक तरुणांनी शिबीर संचालनाचे प्रशिक्षण घेतले. त्यातील काही तरुणांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समयदान केले. संस्कृतच्या प्रसारासाठी माझ्या जीवनातील वर्ष किंवा दोन वर्ष देण्याचा तरुणांचा संकल्प हा काही शब्दांचा बुडबुडा नाही. काही जणांनी तर संपूर्ण आयुष्य यासाठी वाहून घेतले. त्यांच्या या समयदानाच्या यज्ञामुळेच संस्कृत संभाषण आंदोलन देशात सर्वत्र पसरल्या गेले. परंतु, केवळ आंदोलन पर्याप्त नव्हते. एखाद्या तरंगाप्रमाणे आंदोलन वाढते किंवा नष्ट होते. संस्कृत शिकणे, शिकवणे हे दीर्घकालीन कार्य आहे. समाजात अशा प्रकारे कार्य करण्यासाठी संघटनेची आवश्यकता असते. तरुणांना संस्कृत कार्यासाठी प्रेरित करणे, त्यांचे प्रशिक्षण, त्यांच्या नियमित बैठका, त्यांच्यासोबत व्यक्तिशः संवाद, त्यानिमित्ताने प्रवास, नियमित कार्यक्रम-उपक्रमांची साखळी, कार्याचे विभाजन, जबाबदारी निश्चित करणे, त्याची विचारणा, त्यांचे रक्षण ही सर्व कामे करावी लागतात. हे सर्व करण्यासाठी कष्ट तर पडणारच. त्याबरोबरच आर्थिक व्यवस्था करणेदेखील आवश्यक असते. हळूहळू हे सर्व विषय सुरू झाले.
आता हे कार्य देशातील चार हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये चालू झाले आहे. जगातील २७ देशांमध्ये ’संस्कृतभारती’चे कार्य चालू आहे. आर्थिक बाबीकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक राज्यात न्यास आहे. प्रबोधनवर्ग, प्रशिक्षणवर्ग, प्रगत प्रशिक्षणवर्ग असे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षणाचे टप्पे निश्चित केलेले आहेत. जिल्हास्तर, प्रांतस्तर आणि अखिल भारतीय स्तरांवर संमेलने होतात. संविधानाप्रमाणे निवडणुका होतात. कार्यकारिणी निश्चित होते. त्यांची अखिल भारतीय स्तरावर चार वेळा बैठका होतात. केलेल्या कार्याची समीक्षा करून, पुढील कार्याची योजना आखल्या जाते. त्याप्रमाणे त्याचे क्रियान्वयन केल्या जाते.
संस्कृतच्या शिक्षणासाठी जनअपेक्षेनुसार विविध उपक्रम सुरू केले आहेत. पत्रद्वारे शिक्षण ( चार परीक्षा, दोन वर्षे), गीता शिक्षण केंद्र (चार परीक्षा, दोन वर्षे), बालकेंद्र, शालाबाह्य सरल संस्कृत परीक्षा(चार परीक्षा, चार वर्षे), सुभाषितपठन, ’आन्तर्जालमाध्यमेन संस्कृतशिक्षणम्’ याप्रमाणे विविध उपक्रमांद्वारे लक्षावधी लोकांना ‘संस्कृतभारती’ संस्कृतचे शिक्षण देत आहे.
बहुविध पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अभ्यासासाठी तसेच विनोदासाठी देखील पुस्तके आहेत. ’सम्भाषणसन्देश:’ हे मासिक प्रकाशित होते. सर्व कुटुंबासाठी वाचनीय असलेली हे रंगीत मासिक संस्कृत क्षेत्रातील एक मानदंड झाले आहे.
samskritabharati.in हे संकेतस्थळ आपल्याकडून चालवले जाते. समाजमाध्यमांमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, व्हॉट्सअॅप या सर्व ठिकाणी आपली उपस्थिती Samskrita Bharati (samskrit bharati) या नावाने आहे.
या कार्याचा एकत्रित परिणाम म्हणजे लक्षावधी लोकं संस्कृत संभाषणशील झाले आहेत. हजारो घरे संस्कृतगृह झाली आहेत. काही गावांमधील तरूण स्वतःचे गाव संस्कृत गाव करण्याचा प्रयत्न कृत आहेत. संस्कृत मृत भाषा आहे, असे आता क्वचितच काही लोकं म्हणतात. संस्कृत कठीण आहे, हा भाव आता राहिला नाही. बर्याच गाड्यांमध्ये, दुकानांमध्ये संस्कृतमध्ये बोलणारी लोकं बघायला मिळताहेत. समाजमाध्यमांमध्ये संस्कृतमध्ये लेखन केलेले दिसत आहे. अभिनंदनाचे तसेच शुभेच्छांचे संदेश संस्कृतमध्ये पाठवणे, हा आता अभिमानाचा विषय झालेला दिसतो आहे. संस्कृतला भारतामध्ये पुन्हा एकदा सुप्रतिष्ठा प्राप्त होईल, याबद्दल लोकांचा आत्मविश्वास वाढलेला आहे.
संस्कृतसाठी हजारो कार्यकर्ते सध्या वेळ देत आहेत. पूर्णपणे सेवाभावाने ते कार्य करीत आहेत. तेच खरे तर ’संस्कृत भारती’चे बलस्थान आहेत. त्यांच्या बळावरच पुढील पायरी चढत, ’संस्कृतभारती’ स्वतःच्या लक्ष्याप्रति मार्गक्रमण करेल.
संस्कृतमध्ये उपलब्ध असलेले ज्ञानभांडार उघडून भारतीय ज्ञानविज्ञान परंपरा हस्तगत करणे आवश्यक आहे. ज्या आधाराने आपल्या पूर्वजांनी भारताला सुवर्णशाली राष्ट्र बनवले होते. वर्तमानकाळात विश्वात उपलब्ध ज्ञान कोणत्याही भाषेत असले, तरी ते आपण प्राप्त करुयात. अशा एकत्रित दोन्ही पद्धतीने देशातील सध्याच्या समस्यांचे निराकरण करून, भारताला सुखी संपन्न राष्ट्र बनवूया. भारतमातेचा एकही पुत्र, एकही कन्या पीडित, वंचित किंवा दुःखी होणार नाही असे भारताचे स्वरूप करणे, हे संस्कृत युवकांसमोरील आव्हान आहे, ते आपण स्वीकारुया.
शिरीषराव भेडसगावकर
(लेखक ‘संस्कृतभारती’चे अखिल भारतीय प्रचारप्रमुख आहेत.)
(अनुवाद : महेश परळकर)
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९७६९५४५७५८)