यांत्रिक स्वच्छता!

    03-Sep-2023
Total Views | 67
nashik-roads-cleaned-with-mechanical-brooms

नाशिकमध्ये पुढील महिन्यापासून शहरातील सर्व रस्ते स्वच्छ दिसणार आहेत. ३३ कोटींचे चार यांत्रिक झाडू इटलीहून याच महिन्यात नाशिकनगरीत दाखल होत आहेत. स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा खालवत जाणारा क्रमांक उंचावण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने यांत्रिक झाडू खरेदीसाठी पुढाकार घेतला, तो निर्णय योग्यच. यांत्रिक झाडू साडेतीन मीटर रुंद रस्त्यांवर ४० किमी याप्रमाणे स्वच्छता करण्यास सक्षम असल्याने दिवसाला १६० किमीचे प्रमुख मार्ग यामुळे चकाचक होणार आहे. विशेष म्हणजे या झाडूंद्वारे संकलित कचरा ठेकेदारामार्फतच खत प्रकल्पात पोहोचवला जाणार असल्याने, महापालिकेच्या घंटगाडीच्या खर्चात व वेळेतही बचतच होणार. स्वच्छ शहर स्पर्धेत पहिल्या दहा क्रमांकावर येण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजप पक्षाने यांत्रिक झाडू खरेदीचा निर्णय घेतला. प्रस्ताव महासभेवर मंजूरही झाला आणि आता अहमदाबाद येथील कंपनीशी यांत्रिक झाडू खरेदीसाठी संपर्क साधत महापालिकेच्या यांत्रिक विभागाने, यासाठी जलद कार्यवाही केल्याने सप्टेंबर अखेर यांत्रिक झाडू शहरातील स्वच्छतेसाठी उपलब्ध होणार आहेत. २०२७ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे. त्यासाठी नियोजनाचे काम आतापासूनच सुुरू आहेच. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर यांत्रिक झाडूद्वारे सफाई सुरू होणार असल्याने, त्याचा फायदा कुंभमेळ्यापूर्वीच शहर स्वच्छ ठेवण्यास व सिंहस्थातही होणार, हे नक्की! जग झपाट्याने बदलत असताना काळासोबत राहून महापालिकेलाही जलद आणि यांत्रिक अद्ययावत प्रणाली, यंत्रणांचा स्वीकार करणे, काळाची गरज ठरणार आहे. हे पाहता यांत्रिक झाडू खरेदीचा सत्ताधारी भाजपचा निर्णय स्तुत्यच. नाशिकची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अगदी पहाटेपासून रस्त्यांवर वाहनांची वर्दळ सुरू होते. यांत्रिक झाडू प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्ते रात्रीच स्वच्छ केले जाणार आहे. रात्रीचे आठ तास ही यंत्रणा काम करणार असल्याने कमी वर्दळीच्या वेळी शहरातील रस्ते चकाचक होणार असल्याने या दृष्टीनेही यांत्रिक झाडूची गरज आणि उपयुक्तता लक्षात यावी. शहरातील रस्ते सफाईचे कंत्राट खासगी ठेकेदारांना दिल्यानंतर त्यांनी काय केले, हे नाशिककरांनी वेळोवेळी पाहिले आहेच. त्या पार्श्वभूमीवर यांत्रिक झाडू खरेदीचा निर्णय स्तुत्यच!

क्रीडांगणाचे शुक्लकाष्ठ

नवीन नाशिक येथील ‘सिडको’ परिसरातील राजेसंभाजी स्टेडियम अद्ययावत करण्याचा ‘खेळ’ संपण्याचे नाव नाही. या स्टेडियमचा कायापालट करुन नवीन प्रशस्त आणि अद्ययावत स्टेडियम कॉम्पलेक्स साकारण्याचा निर्णय २०१८ मध्येे घेण्यात आला. त्यासाठी प्रारंभी सहा व त्यानंतर सुमारे तीन कोटींच्या वाढीव निधीची तरतूदही केली गेली. संकुलाच्या उभारणीसाठी कामाला प्रारंभही झाला. मात्र, आतापर्यंत स्टेडियमचे फक्त दीड कोटी रुपयांचे काम पूर्ण झाली आहेत. चार ठेकेदार बदलूनही उर्वरित काम होत नसल्याने माजी नगरसेविका किरण दराडे, त्यांचे पती बाळा दराडे यांनी, हे काम लवकर व्हावे, क्रीडांगणाचा वास्तुदोष मिटावा, यासाठी ‘बोकड’ बळी दिला. त्याविरोधात प्रसारमाध्यमांत प्रचंड टीका झाली. अर्थात, हा प्रकार समर्थनीय नव्हताच. तो अयोग्यच. मात्र, क्रीडांगणाचा प्रश्न अंधश्रद्धेकडे का जातोय, याची कारणमीमांसाही गरचेची! गेली अनेक वर्षं हे क्रीडा संकुल बांधून तयार आहे. त्याचा वापर होत नसल्याने त्याचे अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला, तो योग्यच. परंतु, गेली चार वर्षे स्टेडियमचे काम पुढे सरकत नसल्याने शहरातील खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडांगणाची केवळ प्रतीक्षाच करावी लागत आहे. माजी नगरसेविका किरण दराडे यांनी स्टेडियमचे काम पूर्ण व्हावे, यासाठी गेली चार वर्षं पाठपुरावा करत आहेत. खा. हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने क्रीडांगणासाठी सहा कोटींचा निधीही मिळाला, तरीही हे काम पूर्ण होऊ नये, हे गंभीरच! दरम्यान, प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याने, यासाठी प्रारंभी सहा कोटी नंतर वाढीव २.९३ कोटी मंजुरी मिळाली. आज याचा खर्च नऊ कोटींवर जाऊन पोहचला, ते केवळ यातील विलंबामुळेच. क्रीडांगणे ही केवळ खेळाचीच केंद्र नसतात, तर युवा वर्गाच्या उमद्या उर्मीला योग्य दिशा देणारी ठिकाणेही असतात. नाशिकचा क्रीडा इतिहास उज्ज्वलच. आजही अनेक गुणवाण खेळांडू नाशिकचे नाव देशात उज्ज्वल करत आहेत. येथील क्रीडा संस्कृतीला अधिक समृद्ध करत अधिकाधिक खेळाडू घडावेत. म्हणून क्रीडांगणे महत्त्वाचीच.असे असतानाही निधी मिळूनही क्रीडांगणाच्या अद्ययावतीकरणासाठी नाशिककर खेळाडूंना वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते, हे कशाचे द्योतक? नाशिक महापालिकेने आता स्टेडियमच्या कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बांधकामास प्रारंभ होईल, ही अपेक्षा.

निल कुलकर्णी 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121