नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत पायाभूत सुविधांचा वेगवान विकास करत आहे. याच श्रृंखलेत आता बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) लडाखमध्ये दौलत बेग ओल्डीपर्यंत (डिओबी) १३० किमीचा रस्ता बांधत असून हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे.
पूर्व लडाख परिसरात चीन सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने या सीमावर्ती भागामध्ये पायाभूत सुविधा आणि रस्तांची बांधणी सुरू केली आहे. याद्वारे सैनिक, शस्त्रे आणि अन्य रसद आघाडीवर पोहोचविणे सहजशक्य होणार आहे. बीआरओतर्फे बांधण्यात येणारा हा नवा रस्ता एलएसीच्या दुसऱ्या बाजूने सहज दृष्टीक्षेपात येत नसल्याने तो अतिशय सुरक्षित आहे. विद्यमान २५५ किमी लांबीच्या दरबुक – श्योक – डिओबी हा रस्ता एलएसीच्या जवळून जात असल्याने या रस्त्यावरून तुलनेने धोका अधिक होता. मात्र, आता या नव्या रस्त्यामुळे भारतीय सैन्याची स्थिती अधिक बळकट होणार आहे.
भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाच्या या रस्त्याच्या कामाला तीन वर्षांपूर्वी गती मिळाली होती. नुब्रा खोऱ्यातील सामोसा ते काराकोरम खिंडीजवळील डिओबीपर्यंतच्या १३० किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. हा अंतिम टप्पा अतिशय आव्हानात्मक असून यामध्ये बीआरओला श्योक या खडकाळ हिमनदी असलेल्या भागात रस्त्यासह पुलाचेही बांधकाम करायचे आहे. त्यासाठी बीआरओ ‘जीओसेल’ या तीन-आयामी पॉलिमरपासून बनविलेले विस्तारित पॅनेलचा वापर करत आहे. याद्वारे रस्ता स्थिर करणे आणि त्याची वहन क्षमता वाढविणे शक्य होणार आहे. नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग पूर्णपणे तयार होईल, असे बीआरओने सांगितले आहे.
बीआरओने पूर्ण केले ३०० प्रकल्प
बीआरओने गेल्या तीन वर्षांत ८ हजार कोटी रुपये खर्चून जवळपास ३०० महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केले आहेत. एकीकडे भारत आणि चीन चर्चा करत आहेत. त्याचवेळी बीआरओ लडाख क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांना पुढे नेत आहे. या प्रकल्पांमध्ये निमू-पदम-दारचा रस्ता, चुशूल-डुंगटी-फुचे-डेमचोक रस्ता आणि लिकरू-मिग ला-फुक्चे रस्ता यांचा समावेश आहे.