मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाकडून लोकलच्या वेळेत काहीसा बदल करण्यात आला असून यापूर्वी पहाटे ५.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधून सुटणारी पहिली जलद लोकल दि. १० ऑगस्ट पासून पहाटे ४.३५ वाजता सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ४.१९ वाजता पहिली कसारा लोकल सुटते. मात्र पहिली जलद लोकल ही कल्याणकरिता पहाटे ५.२० वाजता सुटते. परंतु ही वातानुकूलित अर्थात एसी लोकल असल्यामुळे प्रवाशांना ५.४६ च्या कर्जत जलद लोकलसाठी थांबावे लागत होते.
याच पार्श्वभूमीवर आता पहाटे ४.२४ ची सीएसएमटी स्थानकातून खोपोली करिता धावणारी धीमी लोकल गुरुवारपासून ४.३५ वाजता जलद लोकल म्हणून धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही लोकल भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर थांबणार असून कल्याण ते खोपोलीदरम्यान सर्व स्थानकावर ही लोकल थांबणार असल्याचीही माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
खोपोली जलद लोकलचे वेळापत्रक
सीएसएमटी - ४.३५, भायखळा - ४.४२, दादर -४.४८, कुर्ला -४.५७, घाटकोपर - ५.०२, ठाणे - ५.२०, डोंबिवली - ५.३७, कल्याण - ५.५१ (कल्याण ते खोपोली दरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार).