कोरोना काळानंतर ओस पडलेली चित्रपटगृहे पुन्हा एकदा प्रेक्षकांनी तुडुंब भरली. त्यातच हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ‘बायोपिक’ अर्थात चरित्रपट आणि सत्य घटनेवर आधारित अर्थात वास्तववादी चित्रपटांचा भरणा प्रामुख्याने दिसून येतो. परंतु, सध्या वास्तव जीवनावर आधारित किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपट साकारायचे असतील, तर चित्रपटाच्या घोषणेपासून, ते चित्रपट प्रदर्शनापर्यंत, त्या चित्रपटाच्या लेखक, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार या सगळ्यांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याच विषयावर आधारित ‘संस्कार भारती’ने ‘सिनेटॉकिज’ हे चर्चासत्र नुकतेच मुंबईत आयोजित केले होते. यात कला दिग्दर्शक जयंत देशमुख, दिग्दर्शक सुरेश शर्मा आणि लेखक-दिग्दर्शक शंतनू रोडे यांनी सहभाग नोंदवला. त्यानिमित्ताने उलगडलेला या चर्चासूत्रातील सूर...
'बायोपिक’ किंवा सत्यघटनेवर आधारित चित्रपटांची कथा किंवा त्यांची मांडणी कितीही उत्तम असली, तरी या चित्रपटांनी ‘बॉक्स ऑफिस’वर कमाई केली नाही, असे बरेचदा दिसून येते. खरं तर एखादा चित्रपट आर्थिकदृष्ट्या आपटण्यामागे अनेक कारणे आहेत. यातील एक प्रमुख कारण म्हणजे, नवीन पिढीचा चित्रपटांकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन आणि त्याचा परिणाम चित्रपटांच्या आर्थिक गणितावर दिसून येतो. सध्याचा जमाना ‘बायोपिक’चा. याबद्दल बोलताना कला दिग्दर्शक जयंत देशमुख म्हणाले की, “आजच्या काळात ‘बायोपिक’ करण्याचा उद्देश काय आहे, हे आधी अधोरेखित करणे अत्यंत गरजेचे आहे. ‘बायोपिक’च्या माध्यमातून आपण अशी एक गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, जी त्यांना ठाऊक नाही. कारण, चित्रपट हे मनोरंजनासोबत दृष्टिकोनाचेही माध्यम आहे. त्यामुळे त्या ‘बायोपिक’मधून आपण प्रेक्षकांपर्यंत लेखक, दिग्दर्शक म्हणून कोणता दृष्टिकोन ठेवत आहोत, हेदेखील तितकेच गरजेचे असते.” ‘बायोपिक’मधून त्या व्यक्तीचे जीवन आपण उलगडत असतो. मात्र, त्यांचे अनुयायी असतील किंवा त्यांच्या विचारांवर चालणार्या व्यक्ती असतील, तर त्यांच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, याचाही विचार ‘बायोपिक’ साकारताना करावा लागतो. तसेच, आताच्या काळात ‘बायोपिक’ किंवा ऐतिहासिक पट साकारताना कोणाची गोष्ट किंवा कोणते पात्र आपण निवडत आहोत, हेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे देशमुख यांनी म्हटले.
संशोधन आणि चित्रपटाची रचना महत्त्वाची
एखादा ‘बायोपिक’ साकारण्याची जबाबदारी जितकी दिग्दर्शक किंवा कलाकारांची असते, त्याहून अधिक ते लेखकासाठी जोखमीचे काम असते. कारण, घडलेल्या सत्यघटनेला योग्य पद्धतीने मांडण्याचे काम आपल्या लिखाणातून कसे होईल, याचा भार लेखकाच्या माथी असतो. याबद्दल माहितीपट दिग्दर्शक आणि लेखक सुरेश शर्मा म्हणतात की, “आपल्याकडे ‘बायोपिक’ आणि ऐतिहासिक पटांचा इतिहास आहे. मात्र, आता जो ‘बायोपिक’चा काळ आला आहे, त्यात माध्यमं फार महत्त्वाची भूमिका बजावतात. कोणताही चित्रपट साकारताना दोन बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे, संशोधन आणि चित्रपटाची रचना. संशोधनाशिवाय कोणताही चित्रपट हा परिपूर्ण नसतो,” असे म्हणत शर्मा यांनी या दोन बाबींवर लक्ष वेधले. कोणतीही कथा मांडताना संशोधनच नसेल, तर आपली कलाकृती ही पूर्ण होऊ शकत नाही आणि परिणामी आपल्याला नकारात्मक प्रतिसादांचा सामना करावा लागेल. प्रेक्षक चित्रपटगृहात येऊन जर तो पाहात असतील, तर त्यांच्या वेळेचा सदुपयोग होणेदेखील तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे ‘बायोपिक’ असो किंवा वास्तविक जीवनावर आधारित चित्रपट असो, त्या चित्रपटाची रचना ही प्रेक्षकांनी खिळवून ठेवणारी हवी. काल्पनिक चित्रपटांमध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात. परंतु, ‘बायोपिक’, ऐतिहासिक पटांमध्ये वास्तवाशी छेडछाड केली जाऊ शकत नाही. त्यामुळे संशोधन आणि रचना फार महत्त्वाची आहे. ज्यावेळी इतिहासात डोकावणारे चित्रपट तयार केले जातात, त्यात काळ, पात्रांची रचना, संवाद फार महत्त्वाचे असतात आणि अलीकडच्या ऐतिहासिक पटात किंवा ‘बायोपिक’मध्ये त्यांची कमतरता नक्कीच भासते.
प्रेक्षकांची मानसिकता महत्त्वाची
वास्तविक घटना किंवा एखाद्या पात्रावर आधारित ‘बायोपिक’ साकारताना अनेकदा दिग्दर्शक किंवा लेखक अशा घटना किंवा पात्रांची निवड करतात, ज्यांच्यावर चित्रपट केल्यामुळे प्रेक्षकांना तो आवडेल आणि परिणामी त्याचा व्यवसायदेखील चांगला होईल. याबद्दल अधिक माहिती देत लेखक-दिग्दर्शक शंतनू रोडे म्हणाले की, ‘जर का इतिहासातील एक पात्र असेल, तर त्या व्यक्तिरेखेची वर्तमानकाळात पुनर्रचना केली जाते. लेखक म्हणून विचार करताना कागदोपत्री जरी पुरावे नसले, तरी त्यावेळी तिथे काय झाले असेल किंवा काय झाले असते, याचा विचार करुन तो प्रसंग लेखनातून उभा करण्याचे स्वातंत्र्य घेऊन ते कार्य पार पाडावे लागते. परंतु, हे स्वातंत्र्य घेत असताना कुठेही वास्तवाला धक्का लागणार नाही, याची खबरदारी मात्र घ्यावी लागते. त्यामुळे ऐतिहासिक, वास्तववादी किंवा‘बायोपिक’ साकारताना आपण दाखवत असलेली दृश्यात्मक घटना कुठेही खोटी वाटू नये, याची जबाबदारी लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांवर असते,” असे रोडे म्हणाले. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट तयार होतो, त्यावेळी समर्थक आणि विरोधक यांच्या विचारसरणीचा वेध घेत कथा बांधावी लागते. प्रेक्षकांची मानसिकता लक्षात वास्तववादी चित्रपटातून सत्यघटना मांडण्याचे आवाहन दिग्दर्शकांसमोर असते. तसेच, सत्यघटना, ‘बायोपिक’मध्ये मनोरंजन कितपत असावे आणि कथेत तथ्य किती असावे, याचे मोजमापदेखील अतिशय गरजेचे. जर का मनोरंजन अधिक झाले आणि सत्य घटना, ही मागे सरत गेली, तर त्याचा परिणाम हा फार चुकीचा घडू शकतो.
योग्य प्रसिद्धी माध्यमांची निवड गरजेची
सध्या समाजमाध्यमांमुळे चित्रपट समीक्षकांच्या समीक्षणाआधीच अमुक चरित्रपट किंवा ऐतिहासिकपट कसा होता, हे जगजाहीर केले जाते. त्यामुळे चित्रपट न पाहता वाचलेल्या किंवा व्हिडिओमधून पाहिलेल्या तथ्यांवर प्रेक्षक विश्वास ठेवतात आणि वास्तववादी चित्रपट व्यवसायाच्या आणि प्रसिद्धीच्या शर्यतीत मागे राहतात. सरतेशेवटी ज्या सत्य घटनेवर आधारित चित्रपट तयार केला जात आहे किंवा एखाद्या व्यक्तीवर ‘बायोपिक’ केला जात आहे, त्या व्यक्तीच्या जवळपास जाणार्या कलाकाराची निवड हीदेखील तितकीच महत्त्वाची. तसेच, त्या चित्रपटांची प्रसिद्धी कोणत्या माध्यमांवर किती केली जाते आणि तेथील प्रेक्षकांची किंवा नागरिकांची मानसिकता, त्या घटनेला घेऊन किंवा व्यक्तीला घेऊन काय आहे, याचा अभ्यासदेखील फार गरजेचा आहे. त्यामुळेच वास्तववादी आणि ‘बायोपिक’ किंवा ऐतिहासिक चित्रपट साकारताना संशोधन, रचना, सत्यता, योग्य प्रसिद्धी माध्यमांची निवड याचा सखोल अभ्यास करणे, अत्यंत आवश्यक आहे.