पंतप्रधानांना ‘लोकमान्यता’

    04-Aug-2023
Total Views | 58
Article On PM Narendra Modi Popularity

लोकमान्य टिळकांना जनतेने ‘लोकमान्य’ ही पदवी दिली होती. त्यांचे नेतृत्व जनमान्य ठरले होते. तशाच प्रकारे जगभरात देशाची मान अभिमानाने उंचावणारे, ‘आत्मनिर्भर भारता’चा नारा देऊन जनतेच्या मनात आत्मविश्वासाची निर्मिती करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्यता लाभली आहे,” अशा शब्दांत ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’चे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी पंतप्रधान मोदींचा गौरव केला होता. ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी लोकमान्यांना अभिप्रेत असलेल्या लोककल्याणकारी शासन आणि समर्थ भारताचे प्रतिबिंब पंतप्रधानांच्या कामात दिसत असल्याची बाब उद्धृत केली. डॉ. दीपक टिळक यांनी केलेले प्रस्ताविक आणि डॉ. रोहित टिळक यांनी करून दिलेला परिचय यांमधून मोदींचा प्रभाव व्यापक आहे, याचा अंदाज येत होता. सभागृहामध्ये मोदींच्या स्वागताला, पुरस्कार स्वीकारत असताना आणि भाषणातही ‘मोदी-मोदी’च्या घोषणा येतच होत्या. एकूणच या कार्यक्रमाचा माहोल मोदीमय झालेला होता. पुणेकर स्वागतासाठी रस्त्यावर दुतर्फा उभे होते. अनेकजण घरांच्या गच्चीमध्ये येऊन आतुरतेने वाट पाहत होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. या दोन्ही जुळ्या शहरांना मेट्रोची भेट मोदी यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकर व्यावसायिक, उद्योजक आणि चाकरमान्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. जवळपास चार हजार अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना ‘पंतप्रधान आवास योजने’मधून हक्काची घरे मिळाली आहेत. त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अशा अनेक लोककल्याणकारी योजना पुण्यात सध्या सुरू आहेत. पंतप्रधानांच्या स्नेहाचीदेखील पुणेकरांची अनुभूती घेतली. स्व. गिरीश बापट आणि भाजपचे नेते स्व. अरविंद लेले यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला ते विसरले नाहीत. या दोन्ही कुटुंबांसाठी त्यांनी आपल्या दौर्‍यात वेळ राखीव ठेवला होता. आस्थेवाईकपणे चौकशी करून वडिलकीच्या नात्याने सोबत असल्याचा दिलासा दिला. पुणे शहर मात्र मोदी यांच्या दौर्‍याने पुन्हा भारून गेले होते. भाजपसाठी तर मोदी यांचा दौरा नवचैतन्य देणारा आणि ‘महाविजय २०२४’ साठी शंखनाद करणारा ठरला.
शिक्षकांचा धर्मप्रचारकी प्रताप

पुण्यातील काही शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह विधाने करून मुस्लीम आणि ख्रिश्चन देवतांचे उदात्तीकरण करण्याचा नवा धर्मप्रचारकी खेळ शिक्षकांनी आरंभला आहे. जागरूक विद्यार्थ्यांमुळे हे प्रकार समोर येत असले, तरी अशा प्रकारच्या धर्मप्रचाराला हे शिक्षक धजावतातच कसे, असा प्रश्न आहे. असाच एक प्रकार कोल्हापूरमध्येही घडला होता. तळेगाव येथील आंबी गावात असलेल्या डी. वाय. पाटील महाविद्यालय व विद्यालयात अलेक्झांडर नावाच्या प्राचार्याने विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने ख्रिश्चन धर्माची ‘प्रेयर’ करून घेतल्याचे समोर आले होते. एवढेच नव्हे, तर मुलींच्या स्वच्छतागृहात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा बसविण्यात आला होता. मुलांनी पालकांकडे आणि पालकांनी संस्थेकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु, शाळा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पालकांच्या साहाय्याने प्राचार्याला बेदम चोप दिला होता. गुरुवारी अशाच प्रकारचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. हिंदू-देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत त्यांची मुस्लीम, ख्रिश्चन देवतांसोबत तुलना करून त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न एका शिक्षकाने केला आहे. अशोक ढोले असे, या विकृत शिक्षकाचे नाव आहे. तो सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बॉयसिस महाविद्यालयातील प्राध्यापक म्हणून काम करीत होता. त्याने हिंदू देवतांबद्दल गरळ ओकली. महाविद्यालयाकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नव्हती. जागरूक विद्यार्थ्यांनी त्याची चित्रफित काढून ती समाजमाध्यमांवर टाकल्यानंतर या विषयाला वाचा फुटली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केल्यानंतर त्याच्या विरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल झाला. पोलिसांनीदेखील त्यापूर्वी केवळ लेखी तक्रारी अर्जावर बोळवण केली होती. विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारी माहिती देऊन त्यांच्या मनात हिंदू धर्माबद्दलच र्घृणा निर्माण करण्याचे काम ही शिक्षक मंडळी करीत आहेत. शाळा-महाविद्यालय प्रशासनानेदेखील या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. असे शिक्षक शिक्षण संस्थांमध्ये काम करतातच कसे? त्यांच्यावर संस्थांचे लक्ष असणे आवश्यक आहे.

लक्ष्मण मोरे


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121