माझे पिलाभई...

    12-Aug-2023
Total Views | 140
Article On Madandas Devi

रा. स्व. संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अभाविपचे माजी संघटनमंत्री मदनदासजी देवी यांचे दि. २४ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मदनदासजींनी घडविलेले असंख्य कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी त्यांच्याप्रतीच्या भावना विविध माध्यमांतून व्यक्तही केल्या. देशाच्या कानाकोपर्‍यात श्रद्धांजली सभांमधून मदनदासजींना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्यानिमित्ताने मदनदासजींची लहान बहीण मंगल परीख यांनी त्यांच्या लाडक्या पिलाभईंच्या स्मृतींना दिलेला उजाळा...

दि. २४ जुलै रोजी पहाटे माझे पिलाभई म्हणजेच मदनदासदेवी यांचे वैकुंठ गमन झाल्याचा फोन आला आणि मला अतीव दुःख झाले. त्यांच्या लहानपणापासून आतापर्यंतच्या अनेक आठवणी एकाएकी दाटून आल्या. ते भावांमध्ये लहान असल्याने आम्ही त्यांना ’पिलाभई’ म्हणत असू. मी त्यांना एका दिवसासाठी बंगळुरूला हॉस्पिटलमध्ये भेटूनही आले होते. त्यांच्याजवळ बसून, त्यांचा हात हातात घेऊन आम्ही खूप गप्पाही मारल्या. त्यांना मी सोडून जाऊ नये, असे वाटत होते. पण, म्हणतात ना काही भावना शब्दात व्यक्त करता येत नाही, हेच खरे. दि. ९ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी माझे व्हिडिओ कॉलवर पिलाभईंशी बोलणे झाले आणि दि. २४ जुलैला त्यांची निधनवार्ता येऊन धडकली. खरं तर पिलाभईंविषयी अनेक मोठ्या नेत्यांनी तसेच वेगवेगळ्या संघटनेतील कार्यकर्त्यांनी खूप आठवणी सांगितल्या आहेत. पण, मी आज त्यांची लहान बहीण म्हणून त्यांचा लहानपणापासूनचा प्रवास उलगडणार आहे.

मदनदास देवी म्हणजेच आमचे पिलाभई यांचा जन्म दि. ९ जुलै १९४१ रोजी करमाळा येथे एका संपन्न गुजराती कुटुंबात झाला. पिलाभई आणि मी सर्वात लहान असल्याने आम्ही आईचे खूप लाडके होतो. ते लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांचे शालेय शिक्षण करमाळा येथे व पुढील शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी पुण्याच्या बीएमसीसी महाविद्यालयातून ‘बीकॉम’ आणि ’एमकॉम’चे शिक्षण घेतले. नंतर ते ’एलएलबी’ झाले. त्यात त्यांना सुवर्णपदकही मिळाले. तसेच, त्यांनी ‘सीए’चा अभ्यासही पूर्ण केला. पण, भरपूर पैसे कमवण्यापेक्षा राष्ट्रसेवा करणे, हे पिलाभईंनी त्यांचे आद्यकर्तव्य मानले आणि आपले जीवन राष्ट्राला समर्पित केले. त्यांना घरच्या संपत्तीत तसेच धंद्यात कधीही रस नव्हता. लहानपणापासून त्यांना केवळ समाजकार्याची आवड होती.

घरातूनच पिलाभईंना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू मिळाले. आमचे मोठे बंधू खुशालभाई यांच्याबरोबर ते लहानपणापासून शाखेत जायचे. पुण्यात गेल्यावर त्यांनी शिक्षणाबरोबर संघविचारांना वाहून घेतले. एक दिवस आईबरोबर गप्पा मारताना त्यांनी आईला सांगितले की, “मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे.” आई म्हणाली की, ’‘काय पाहिजे?” आमची आई खूप भोळी होती. तिला वाटले की पिलाभई काही तरी भौतिक गोष्ट मागेल. परंतु, पिलाभईंनी त्यांचे आयुष्य राष्ट्राला अर्पण करण्याचे आणि त्यासाठी आयुष्यभर लग्न न करण्याची परवानगी आईकडे मागितली. आमचे सर्वात मोठे बंधू जमनादास यांच्याकडे मुंबईला नेहमी जाणे असायचे. मोठ्या वहिनींनी आई नंतर पिलाभईंची अगदी आईप्रमाणेच काळजी घेतली. सुरुवातीच्या काळात त्यांचा आमच्याशी संपर्क कमी असायचा. कारण, संघटनेच्या कामामुळे त्यांना भारतभर फिरावे लागे. पण, दर महिन्याला ते खुशाली विचारायला पोस्टकार्ड मात्र आठवणीने पाठवायचे. राखीपौर्णिमेच्या आधी राखी पाठवण्यासाठी ते नेहमी जिथे असतील, तिथला पत्ता कळवायचे.

मागील काही वर्षांत राखीपौर्णिमेच्या वेळेस मात्र ते आवर्जून घरी यायचे. त्यांना माझ्या घरी राहिला आवडायचे. त्यांच्यासाठी आई नेहमी जे पदार्थ तयार करायची, ते मग मीही तयार करायचे. त्यांना डाल बाटी, कढी खिचडी विशेष आवडायचे. त्यामुळे माझ्या घरी आल्यावर पिलाभईंची या पदार्थांसाठी एक खास फर्माईश असायची. त्यांना वाचनाची विशेष आवड होती. टीव्हीवर ते बातम्या आणि ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका तर अगदी विशेष आवडीने बघायचे. पिलाभईंना प्रवासाचीही तितकीच आवड होती. नवनवीन लोकांना भेटणे त्यांना विशेष आवडायचे. ते म्हणायचे की, “यातूनच खूप शिकायला मिळते.” असे हे आमचे नेहमी शांतपणे बोलणारे पिलाभई अतिशय प्रेमळ आणि सुस्वभावी होते.

पिलाभईंनी ७१ वर्षं संघाचे काम बघितले. ते एक समर्पित कार्यकर्ता होते. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता, संघटन कौशल्य, समर्पित भावनेने काम करणे प्रखर राष्ट्रभक्ती आणि स्वदेशीचे पुरस्कर्ते हे त्यांचे गुण होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सहकार्यवाह,अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे पहिले संघटनमंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय निरीक्षक अशी अनेक सर्वोच्च पदे त्यांनी भूषवली. परंतु, इथवर पोहोचण्यासाठी ते अतिशय संघर्षमय जीवन जगले.

ते कधीही परिवारवादी नव्हते. ‘राष्ट्र प्रथम’ हाच त्यांचा प्रारंभीपासूनचा दृष्टिकोन. परिवारातील लोकांना ते नेहमी सांगत की, स्वकर्तृत्वावर पुढे जा. आपले राजकीय वजन वापरून नातेवाईकांचा आर्थिक फायदा होईल, असे त्यांचे कधीही वर्तन नव्हते. परिवारवादाविषयी त्यांना चीड होती. कारण, ‘राष्ट्रवाद’ त्यांच्या नसानसांत भिनला होता. परंतु, गरजू लोकांना ते नेहमीच मदत करायचे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमुळे अनेक नेत्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात पिलाभईंच्या पुढाकाराने झाली. परंतु, स्वतःविषयी त्यांनी कधीही मोठेपणा दाखवला नाही. आजही त्यांच्या निधनानंतर अनेक कार्यकर्ते, त्यांच्याशी संबंधित मंडळी मला भेटून त्यांनी केलेल्या मदतीबद्दल सांगतात. परंतु, त्या समाजकार्याचा,स्वतःच्या मोठेपणाचा उल्लेखही पिलाभई कधीच करत नसत. पिलाभई आम्हा कुटुंबीयांना वेळ देत नाहीत, म्हणून आमची तक्रार कायम असायची. पण, आता ते गेल्यावर कळलं की, संपूर्ण संघटनचं त्यांचे कुटुंब होते. खरं तर पिलाभईंविषयी लिहावे तेवढे शब्द कमीच आहेत. सर्व राजकीय नेते व कार्यकर्त्यांचे तसेच सर्व नागरिकांचे आपण केलेल्या सांत्वनाबद्दल आपले आभार...

मंगल परीख

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121