बँकिंग विश्वातील घडामोडी, त्यांचा आर्थिक धोरणावरील परिणाम, दैनंदिन कामकाज, आर्थिक सुबत्तेसाठी बँकिंग फंडाचे नियोजन, बेइमानांची हातचालाखी व त्या विरुद्ध लढताना नैतिकतेच्या मर्यादा न ओलांडणारा लेखक, हे सगळ पाहता यावर एक नक्कीच वास्तवदर्शी चित्रपट बनवला जाऊ शकतो. ‘गंगाजल’, ’कार्पोरेट’, ’पेज ३’ याचे बँकिंग कोलाज म्हणजे ‘रिफ्लेक्शन.’
भारतीय उपखंडात भारतीय संस्कृती, अर्थतंत्र व वैश्विक मूल्य यांचा संबंध प्राचीन काळापासून ध्रुव तार्यासारखा अढळ आहे, अगदी कधी न तुटणारे! आपल्या समाजात अगदी बोलीभाषेतसुद्धा एक वाक्य प्रचलित आहे, ते म्हणजे ’लक्ष्मी सरस्वती एकत्र नांदणे.’ खरंच हे पुस्तक वाचताना वेळोवेळी याचा प्रत्यय येतो. विकास प्रगती साधण्यासाठी नैतिकता अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच नैतिकतेच्या जोरावर कुठलाही देश खर्यादृष्टीने संपन्न होतो. नाण्याच्या दोन बाजूंमधील कुठली किनार निवडावी, हे ज्याने-त्याने आपापल्या परीने ठरवायचं आहे. पण, स्वयंचलित नैतिकतेचे देशातील सामाजिक राजकीय बँकिंग, व्यवस्थेत असलेली गुंतागुंत याचा परामर्श कसा साधावा, हे जाणून घ्यायचे असेल, तर हे पुस्तक वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. दक्षिण मुंबईतील महाविद्यालयीन मुलांपासून शहापूर तालुक्यातील किशोरवयीन मुलांपर्यंत सर्व समाजातील स्तरापर्यंत हे पुस्तक उपयुक्त आहे, यात तिळमात्र शंका नाही. सध्याचा काळात संवाद लोप पावला असताना पुस्तकच आपला खरा मित्र होऊ शकतो, असे मला मनापासून वाटते.
बँकिंग, उद्योजकता, समाजाची रचना याचा परस्पर संबंध कसा आहे, हे सोप्या भाषेत समजून घ्यायचे असल्यास लेखक नारायणन वाघूळ यांच्या जीवनातील अत्यंत वास्तविक किस्से मेजवानी ठरतात. हे आत्मकथन वाचताना समाजातील ’नारायणन’ नावाचा वास्तवातला ’सुपरहिरो’ मनात कोरला जातो. दक्षिण भारतातील एकत्र कुटुंब पद्धतीत जन्मलेल्या लेखकाचा संघर्ष ऐकतानाच व्यवस्थेशी लढायला आपल्या प्रमाणेच किंबहुना जुन्या काळातील लोकदेखील तयार होती. हे ऐकल्यावर एक वेगळाच उत्साह संचारतो. उच्च विद्याविभूषित नारायणन हा तरुण ’स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये उच्च पदावर नोकरी करत असताना वयाच्या ३८व्या वर्षी एका बँकेचे अध्यक्षपद भूषवतो. सुरुवातीला ’स्टेट बँक ऑफ इंडिया’, मग ’आयसीआयसीआय बँक’ यांच्या केंद्रस्थानी काम करताना वास्तविक जीवनातील संघर्ष माणसातील माणूसपण जीवंत असल्याची प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही.
भारतात एखाद्या प्रामाणिक, शिकलेल्या आणि देशाच्या उन्नतीसाठी कर्तव्यदक्ष मुलाला समाजातील वाईट प्रवृत्ती, भ्रष्टाचारात बरबटलेली नोकरशाही, राजकारणी, खाबुगिरी करणारे काही सरकारी बाबू यांच्याशी नैतिकतेसाठी पंगा घेताना अडचणींवर अडचणी येतात. एकीकडे नोकरी, दुसरीकडे नैतिकता यात काय तडजोड करावी आणि न तडजोड करता वाटचाल कशी असावी, यासाठी हे पुस्तक विशेषतः तरुण पिढीने नक्की वाचायला हवे. कर्ज मंजूर करण्यासाठी राजकारण्यांची कामात दखल हे नवीन नसले तरी पूर्वीही भ्रष्टाचार बिनबोभाट व्हायचा, याचा एक प्रसंग वाचताना खरंच सामान्य माणसाला काही किंमत उरली आहे का, हा प्रश्न पडतो. बँकिंग क्षेत्रातील उच्च पदाधिकार्यांवर दबाव बघता, सामान्य माणसांची या भ्रष्टाचाराच्या शृंखलेतून सुटका दुर्मीळ आहे, हे वास्तविक वाटतं.
राजकारण, पैसा, ताकद यांची नशा भारतातदेखील ’क्रोनी कॅपिटलिझम’ला जन्म देते. बर्याच सनदी अधिकार्यांपासून तृतीय श्रेणीतील कर्मचारी खाल्ल्याशिवाय काम करणार नसतील, तर पाच हजार वर्षांपासून भारतीय संस्कृती आणि सध्याचे आचारविचार यात तफावत आहे, हे लेखकाच्या काही प्रसंगांतून विशद होते. खासकरून पूर्वीच्या ‘लायसन्स राज’मधील बँकिंग सेवांचा विस्तार करण्यास अनेक अडचणी आल्या. काळानुसार सहकारी बँकांपासून डेव्हलपमेंट बँक, व्हेंचर कॅपिटल, आंतरराष्ट्रीय बँक, पब्लिक सेक्टर बँक ते खासगी बँक यांचा ५०च्या दशकांपासून ते आजपर्यंतच्या प्रवासाचे लेखकाने रेखाटन केले आहे. अगदी ‘प्रोजेक्ट फायनान्स’पासून कर्जवाटपातील ‘रेड टेप गव्हर्नन्स’, त्यातील त्रुटी, उपाय यांचे वर्णन भविष्य काय असावे, याची गुरूकिल्ली देत.
बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यापासून त्यांचे फायदे-तोटे, सत्तेचे केंद्रीकरण, विकेंद्रीकरण ते अगदी १९९१चा जागतिकीकरणानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचे चित्रण अगदी सोप्या भाषेत लेखकाने समजावून सांगितले आहे. राजकीय राजवट ते प्रशासकीय अधिकारी यांच्यात होणारा संवाद-विसंवाद, वार्तामिलाप, ताळमेळ हा घरच्या सारख्या संवादातून स्पष्ट केल्यामुळे यातून लेखकाने मानवी स्वभाव काटेकोरपणे उलगडला आहे. शैक्षणिक, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी असलेली वैचारिक बैठक आणि त्यासंबंधी अनेक मतमतांतरे ही यात सांगितली आहे. नेहरूंचा व्यावहारिक समाजवाद, ते उजव्या विचारसरणीच्या नेत्यांची उदारमतवादी अर्थव्यवस्थेसाठी लोकप्रिय निर्णयाचा दृष्टिकोन यातून विचारात घेतला गेला आहे. विद्यमान परिस्थिती अगदी व्यवसायी-धंदेवाईक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील गुंतागुंत ही कधी सुटेल, हा पत्ता लागत नाही, असा विचार वाचकांच्या मनातदेखील येऊ शकतो.
नारायणन वाघूळ यांनी अनेक वर्षं प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कामानंतर जेव्हा बँकिंग क्षेत्रातील निवृत्तीचा निर्णय घेतला, तेव्हा त्यामागचा विचार-दृष्टिकोन त्यांना प्रशासकीय मित्रांनी समजावण्याचा केलेला प्रयत्न मनात गंभीर प्रश्न निर्माण करतो. मनशक्ती साधक आध्यात्मिक शांतीसाठी लेखकाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह व योग्य असेलही; पण राजकीय, आर्थिक, सामाजिक, बँकिंग, शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करणारा कोणी ’सुपरमॅन’ कधी पुन्हा जन्माला येईल का? आणि समस्या कोण कशा सोडवेल, तर याचे उत्तर आहे. समाजाची नैतिक बांधणी आणि ती करण्यासाठी ’रिफ्लेकशन’ हे बाळकडू उपयोगी पडेल.
पुस्तकातील जपानी औद्योगिक शिष्टमंडळाचे विनोदी उदाहरण थोडसे मर्म जाणून घेण्यासाठी कामी येईल. जगात भ्रष्टाचारासकट प्रगती असाही मतप्रवाह आहे; पण अनेक देशांमध्येही भ्रष्टाचार होऊनदेखील विकासाची वृद्धी सांभाळली जाते. भारतातील भ्रष्टाचाराव्यतिरिक्तदेखील अपेक्षित असलेला विकासदर अजूनही आपल्याला का सांभाळता आला नाही, हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. यासाठी खरंच देशाची यंत्रणा उत्तरदायी ठरणार आहे.
‘पैसेसुद्धा कायद्याने खा,’ असा मतप्रवाह अलीकडे निर्माण झाला असताना, पुस्तकातील रेल्वेच्या टीसीचे उदाहरण नक्कीच आपल्याला जागवल्याशिवाय राहत नाही. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सामंजस्याने देश पुढे कसा जाईल, याचे प्रासंगिक लेखकाने नेमकेपणाने प्रसंगोप्रसंगी लिहिले आहे. भारतातील महागाईचा फटका, वाढती बेकारी, या गोष्टींचा वाढता प्रभाव, मागणी-पुरवठा सिद्धांताव्यतिरिक्त आर्थिक समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे व्यवहारातील ‘सेंटिंग’पेक्षा दर्जात्मक रेटिंग हा लेखकाचा दृष्टिकोन खूप उपयुक्त ठरेल; असा विश्वास वाटतो.
बँकिंग विश्वातील घडामोडी, त्यांचा आर्थिक धोरणावरील परिणाम, दैनंदिन कामकाज, आर्थिक सुबत्तेसाठी बँकिंग फंडाचे नियोजन, बेइमानांची हातचालाखी व त्या विरुद्ध लढताना नैतिकतेच्या मर्यादा न ओलांडणारा लेखक, हे सगळ पाहता यावर एक नक्कीच वास्तवदर्शी चित्रपट बनवला जाऊ शकतो. ‘गंगाजल’, ’कार्पोरेट’, ’पेज ३’ याचे बँकिंग कोलाज म्हणजे ‘रिफ्लेक्शन.’
आता या पुस्तकात काय खूप आवडले? - सामाजिक, आर्थिक राजकीय सांस्कृतिक पार्श्वभूमी समजावून सांगतानाच आर्थिक घडामोडींचा सहज उलगडा करण्याचा लेखकाचा हातखंडा, थेट मुद्द्याला हात घालण्याची पद्धत, राजकारण व बँकिंग क्षेत्रातील गुंतागुंतीचे प्रासंगिक संबंध सांगण्याची लेखकाची हातोटी कौतुकास्पद. शिवाय सोप्या संवादाच्या माध्यमातून प्रसंग सांगण्याची पद्धत. ६०चे दशक समजावून सांगतानाच भविष्यातील समस्यांची मांडणी. सर्वात महत्त्वाचे अलंकारित भाषेत शब्दांतर न करता विविध पातळ्यांवर दर्शवणारी व्यावहारिक वस्तुनिष्ठता.
काय हव होते? थोडेसे प्रसंग विस्तृतपणे कथन करता आले असते. वेगवेगळे किस्से सांगताना ते सलग नाहीत. इसवी सन, प्रसंग, घडामोडी या पुढेमागे आहेत; त्याला सलगता देता आली असती. कथा इतकी रंजक वाटते की, लेखकाच्या करिअरच्या काळाव्यतिरिक्त लेखकाची पार्श्वभूमी, बालपणीचे दिवस, उत्तरार्ध हे जाणून घेण्याची ओढ लागते, जी पुस्तकात फारशी प्रस्तुत करण्यात आली नाही. उत्कंठा शिगेला पोहोचली असताना विस्तार कथन नसल्याने कथेला मर्यादा येते.
शुल्लक त्रुटी वगळता एकंदर, हे पुस्तक वाचनीय, आकर्षक आहे. पण, त्यापलीकडे तरूणांना हे पुस्तक बँकिंग राजकीय, सामाजिक, आर्थिक घटनांचे वास्तविक दर्शनासाठी संप्रेरक ठरेल. महाविद्यालयातील मुलांसाठी ही, तर खरीखुरी मेजवानी आहे. एक दिवस ’पबजी’ खेळण्यापेक्षा हे पुस्तक हातात घ्या. हातात घेतल्यास सुरुवात ते शेवटपर्यंत वाचाल, ही खात्री.
पुस्तकाचे नाव : रिफ्लेक्शन
लेखक : नारायणन वाघूळ
प्रकाशक : पिरामल एंटरप्रायझेस लिमिडेट
पृष्ठसंख्या: १७४
मोहित सोमण