‘आयटी’ कंपन्यांसाठी देश-विदेशात काम केल्यानंतर आपण या समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून निवृत्तीनंतर पुण्यातील प्रशांत कुलकर्णी हे अवयवदानासंदर्भात जनजागृती करीत आहेत. त्यांच्याविषयी...
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला विविध आजारांनी ग्रासले असतानाच, काही कारणास्तव त्यांना अवयव प्रत्यारोपणाचीसुद्धा गरज निर्माण होऊ शकते. मात्र, आपल्या रुग्णाला अवयव कशाप्रकारे उपलब्ध होणार किंवा कोणती व्यक्ती अवयवदान करू शकते? त्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते? अशा रुग्णांची प्रतीक्षा यादी कोण, कुठे तयार करते? त्यासाठी नाव नोंदणी कशी करायची? असे अनंत प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना असतात. प्रत्येक अवयवानुसार प्रतीक्षायादीत नाव नोंदण्याची व अवयव उपलब्ध होण्यासाठीचे नियम कसे असतात, याची माहितीदेखील रुग्णांच्या नातेवाईकांना असणे महत्त्वाचे असते. रुग्णाच्या वैद्यकीय परिस्थितीनुसार अनेक निर्णय घ्यावे लागतात.
रुग्णाची सद्यस्थिती गंभीर असल्यास त्याला तत्काळ अवयव मिळणे महत्त्वाचे असते व त्यामुळे प्रतीक्षायादीनुसार अवयव मिळेल, म्हणून वाट पाहत बसल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत रुग्णाचे कोणते नातेवाईक किंवा इतर कोणी व्यक्ती जीवंतपणी कोणते अवयवदान करू शकते? भविष्यात अवयव दात्याला काही धोका आहे का? त्याचे आरोग्य पूर्ववत किती दिवसात होते? त्याला किती विश्रांतीची गरज असते? भविष्यात काही पथ्य पाळावी लागतात का? अशा शेकडो गुंतागुंतीच्या प्रश्नांमुळे रुग्णाचे नातेवाईक अक्षरशः हतबल होतात. त्यांना योग्य ती माहिती तसेच, प्रत्यारोपण होईपर्यंत आणि प्रत्यारोपणानंतरची काळजी कशी घ्यायची, अशी सर्व माहिती रुग्णाला, रुग्णाच्या नातेवाईकांना,अवयवदात्याला निःस्वार्थपणे देण्याचे कार्य प्रशांत कुलकर्णी अखंड करीत आहेत.
रुग्ण आणि नातेवाईक त्यांच्याशी एकदा जरी बोलले, तरी प्रशांत त्यांच्याच कुटुंबातील व्यक्ती होऊन जातात. या व्यतिरिक्त रुग्णाला शासकीय, आर्थिक मदत कशी व किती मिळू शकते, याचे मार्गदर्शनसुद्धा प्रशांत कुलकर्णी करतात. योग्य वेळी योग्य सल्ला मिळाल्यामुळे दानासाठी प्रेरित होऊन अनेक जणांनी अवयवदाता म्हणून नावनोंदणी केली आहे. प्रशांत कुलकर्णी यांनी अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचे काम सुरू करण्यापूर्वी अनेक ’आयटी’ कंपन्यांतर्फे देशविदेशात काम केले. वयाची पन्नाशी उलटल्यावर स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांच्या एका डॉक्टर मित्रांच्या सल्ल्याने त्यांनी ’ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर’चा कोर्स केला आणि २०१६ पासून अवयवदानाबाबतच्या जनजागृतीचे काम ते सातत्याने करीत आहेत. पुण्यातील एका नामांकित मोठ्या रुग्णालयात त्यांनी अवयवदानाबाबतचे समन्वयक म्हणून अहोरात्र मोफत सेवा देण्याचे काम पाच वर्षे केले.
अवयवदात्यामध्येसुद्धा दोन प्रकार असल्याचे स्पष्ट करीत प्रशांत कुलकर्णी सांगतात की, मेंदू मृत (ब्रेन डेड) आणि जीवंत माणसाचे अवयवदान असे दोन प्रकार आहेत. एखाद्या रुग्णाबद्दल माहिती मिळाल्यावर प्रशांत स्वतः तेथे जातात आणि रुग्णाच्या नातेवाईकांशी बोलून त्यांना सध्या अवयवदानाची आवश्यकता कशी आहे, याची माहिती आणि त्याची प्रक्रिया सांगून त्यांचे प्रबोधन करतात. मात्र, कोणालाही अवयवदानाबद्दल जबरदस्ती केली जात नसल्याचेही ते आवर्जून सांगतात. रुग्णालयांव्यतिरिक्त महाविद्यालयांत, निवृत्त बँक कर्मचारी संस्थांमध्ये, वृद्धाश्रमांमध्ये, सोसायट्यांमध्ये, वेगवेगळ्या सोशल ग्रुप्समध्ये ते आपले काम अतिशय उत्साहाने व स्वेच्छेने करीत आहेत.
आजच्या काळात अवयवदान करतानासुद्धा नेत्रदान, त्वचादानाची जास्त गरज असल्याची आणि त्याबाबत अधिकाधिक प्रबोधन होण्याची आवश्यकता असल्याचेही प्रशांत अधोरेखित करतात. एखाद्या व्यक्तीचे राहत्या घरी निधन झाल्याससुद्धा मृत व्यक्तीची त्वचा आणि नेत्रदान करण्यासाठी नक्की काय करावे, याची माहितीच नागरिकांना नसल्याचेही ते नमूद करतात. त्यामुळे या पेशींच्या दानाची मोठी गरज असल्याचे प्रशांत सांगतात. नेत्रदान हे अगदी दहा दिवसांच्या बाळापासून ते ९९ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही करू शकत असल्याचेही प्रशांत अधोरेखित करतात. एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर जर, नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयाला किंवा नेत्रपेढीला माहिती दिल्यास नेत्रदान करून अन्य गरजू व्यक्तीचे जीवन बदलू शकते. याबाबत जागृती होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. नेत्रदान केल्याने अन्य कोणालाही हे सुंदर जग बघण्याचे भाग्य मिळू शकते.
अवयवदान करतानासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतीक्षायादी असल्याचे सर्वसामान्यांना माहीत नसते. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा पुणे, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई असे चार झोन असून, त्याची एकत्रित माहितीही ‘झेटीसीसी’ (झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर) या संस्थेकडे असते. पुणे विभागाचा विचार करता पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक अशी शहरे त्यात येतात. अवयवानुसार प्रत्येक अवयवाची प्रतीक्षायादी, त्याचप्रमाणे त्यांच्या दानाबाबतचे व वाटपाचे नियमसुद्धा वेगळे असतात. तसेच प्रत्यारोपण केंद्राला ‘रोटेशन’नुसार ’झेटीसीसी’मार्फत अवयव पुरविले जातात.
प्रशांत कुलकर्णी यांचे अवयवदानाबाबतची जनजागृती करताना सध्या हे काम फक्त पुण्यापुरते मर्यादित असले, तरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून त्यांना फोनवर संपर्क साधल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची त्यांची तयारी असते. प्रशांत कुलकर्णी हे काम करीत आहेत, त्याची दखल समाजाने घेणे गरजेचे आहे. प्रशांत यांच्या या समाजोपयोगी कार्यासाठी दै. मुंबई तरुण भारततर्फे शुभेच्छा!
योगेश नाईक