पश्चिम बंगाल सरकारने घुसखोर रोहिंग्यांना दिला मुस्लिम ओबीसींचा दर्जा : चित्रा वाघ

    14-Jun-2023
Total Views | 56
BJP Mahila Morcha State President Chitra Wagh

मुंबई
: पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बांगला देशमधील भाटिया मुस्लिम आणि रोहिंग्यांना मुस्लिम ओबीसींचा दर्जा दिल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले यावेळी उपस्थित होते. रोहिंग्यांना आरक्षण देऊन ममता बॅनर्जींना दहशतवादाला उत्तेजन द्यावयाचे आहे का , असा सवालही त्यांनी केला.

चित्रा वाघ यांनी सांगितले की, राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी अलिकडेच पश्चिम बंगाल, बिहार राजस्थान आणि पंजाब या चार राज्यांचा दौरा केला असून या दौऱ्यात अहिर यांना अनेक धक्कादायक गोष्टी आढळून आल्या. पश्चिम बंगालमध्ये २०११ पर्यंत हिंदु अन्य मागासवर्गीयांच्या (ओबीसी) ५५ जाती होत्या. तर मुस्लिम ओबीसींच्या ५३ जाती होत्या. २०२३ मध्ये या प्रमाणात मोठे बदल होऊन प. बंगालमध्ये एकूण ओबीसींच्या जाती १७९ असून त्यापैकी मुस्लिम ओबीसींच्या ११८ जाती तर हिंदु ओबीसींच्या ६१ जाती असल्याचे दिसून आले आहे. म्हणजे गेल्या १२ वर्षात मुस्लिम ओबीसींच्या जाती ५३ वरून ११८ तर हिंदु ओबीसींच्या जाती ५५ वरून अवघ्या सहाने वाढून ६१ झाल्याचे समोर आले.

दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने मुस्लिमांमधील ज्या जातींना ओबीसींचा दर्जा दिला त्यामध्ये बांगला देशातील भाटिया मुस्लिम आणि रोहिंग्यांचा समावेश असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला आढळून आले आहे. तसेच, राष्ट्रीय आयोगाने याबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाकडे विचारणा केली होती. पश्चिम बंगालमध्ये अनधिकृतपणे वास्तव्य करणारे रोहिंगे मुस्लिम आणि बांगला देशमधील भाटिया मुस्लिम यांना ओबीसीचा दर्जा देताना राज्य शासनाच्या संबंधीत यंत्रणेने (कल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट) आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नसल्याचे दिसून आले, असेही चित्रा वाघ यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे, रोहिंग्यांचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसले असून अशा घुसखोरांना ओबीसींचा दर्जा देण्याचे पाप ममता सरकारने केल्याचे त्यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121