नव्या पिढीस द्या त्वरें समग्र युद्धशिक्षणा

    28-Apr-2023   
Total Views |
 
Santosh Tekale
 
 
डोंबार्‍याचा खेळ करतो म्हणून हेटाळणी झाली. परंतु, तरीही त्यांनी जिद्दीने पेटून मर्दानी खेळांसह मल्लखांबाचे धडे देण्याचे कार्य सुरूच ठेवले. जाणून घेऊया मल्लखांब प्रशिक्षक संतोष टेकाळे यांच्याविषयी...
 
अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील संतोष भीमाशंकर टेकाळे यांचा जन्म. वडील राखीव सैन्य दलात, तर आई गृहिणी. जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण तर ल. ना. होशिंग विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शालेय वयात क्रिकेटची विशेष आवड, तर वार्षिक स्नेहसंमेलनात संतोष लेझीमसह मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करत. अनंता खेत्रे सरांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. दहावीनंतर पुढे विज्ञान शाखेसाठी कृषी विषय घेतला. बारावीनंतर पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले, परंतु यश आले नाही. पुढे ‘आयटीआय’साठी प्रवेश घेऊन डिझेल मेकॅनिकचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नोकरीच्या शोधात त्यांनी पुणे गाठले. मुलाखतीसाठी अनेक रात्री कंपनीबाहेरच झोपून काढल्या. परंतु, नोकरी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा जामखेड गाठले. दोन पैसे कमवावे, यासाठी कापड दुकानात प्रतिदिन 35 रुपये वेतनावर नोकरी करू लागले.
 
तालीम आणि व्यायामाची आवड जोपासत त्यांनी तब्बल सहा वर्ष याठिकाणी नोकरी केली. हळूहळू त्यांनी मित्रांनाच व्यायामाचे मार्गदर्शन करत प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. पुढे मित्रासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू केला. परंतु, त्यात फारसे यश आले नाही. संसाराचा गाडा हाकण्यासाठी कामाची आवश्यकता तर होतीच. परंतु, नऊ महिने काम मिळाले नाही, तेव्हा या कालावधीत त्यांनी टीव्ही, युट्यूबच्या माध्यमातून मर्दानी खेळ आणि व्यायामाचे प्रकार शिकून घेतले. नागेश्वर मंदिर परिसरात त्यांनी मित्रांनाच याचे धडे देण्यास सुरुवात केली. दरम्यान, मित्राच्या मदतीने संतोष यांनी मजूर काम सुरू केले. वाळू उचलण्याचे दिवसाकाठी 150 रुपये हातात मिळायचे. शिवजयंती उत्सवात कोल्हापूरच्या मर्दानी आखाड्याने प्रात्यक्षिके सादर केली. संतोष या गोष्टीत पारंगत असल्याने त्यांच्या मित्रांनी त्यांना प्रोत्साहन दिले. पुढील वर्षी पथक आले नाही, त्यावेळी संतोष आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मिरवणुकीत शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली, ज्याने लोक भारावून गेले. हळूहळू संतोष यांच्याकडे प्रशिक्षणासाठी मुलांचा ओघ सुरू झाला. लोकमान्य शाळेत मर्दानी खेळांच्या जोडीला मल्लखांबाचे मोफत प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. मल्लखांबाच्या प्रशिक्षणामुळे मुलीही प्रशिक्षणासाठी येऊ लागल्या.
 
संभाजी भिडे गुरूजी यांच्या गडकोट मोहिमांनाही संतोष जाऊ लागले. परांडा येथील गणेशोत्सवात संतोष आणि त्यांच्या चमूने प्रथमच सार्वजनिकरित्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यामुळे संतोष यांना खर्‍या अर्थाने ओळख मिळाली. लोकमान्य शाळेत दोन-तीन वर्षं सराव केल्यानंतर मल्लखांब मोडला. एका शेतकर्‍याने दिलेल्या सागवानी लाकडाचा नवा मल्लखांब तयार करण्यात आला. दररोज दोन तास हे मल्लखांब प्रशिक्षण दिले जाते. त्यासोबत मर्दानी खेळांमध्ये योगासने, दांडपट्टा, ढाल-तलवार, योगासने, लाठी-काठी, भारतीय व्यायाम प्रकार, भाला, सूर्यनमस्कार हे प्रकार शिकवले जातात. सध्या नागेश्वर मंदिर पटांगणात संतोष 50 हून अधिक मुला-मुलींना मर्दानी खेळांसह मल्लखांबाचे प्रशिक्षण देतात. संपूर्णत स्पर्धात्मक दृष्टिकोनातून मुलांना प्रशिक्षित करण्यावर संतोष भर देतात. संतोष यांना गावोगावी प्रशिक्षणासाठी तसेच शिबिरासाठी बोलावले जाते. यावेळी ते ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर कार्यक्रम करतात.
 
‘श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था’ या नावाने संस्थेची नोंदणी करून संतोष यांचे कार्य जोमाने सुरू आहे. गणेशोत्सव, शिवजयंती या दरम्यान पथकाला मोठी मागणी असते. संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक दृष्टीनेही मोठे यश मिळवले. सध्या संतोष बँकेशी संबंधित कामे करतात आणि तेच त्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे. त्यांना आई-वडिलांच्या सहकार्यासह लखन जाधव, पितांबर सुभेदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते.
प्रत्येकाला राष्ट्र, धर्माप्रती प्रेम असावे, पूर्वजांच्या ठेव्याचे जतन, संवर्धन आणि प्रचार प्रसार झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून पारंपरिक मर्दानी खेळ, मल्लखांब टिकविण्यासाठी मी धडपडतो. हे कार्य करत असताना पूर्वजांशी नाळ टिकून राहून आत्मिक समाधान लाभत असल्याचे संतोष सांगतात. स्पर्धेसाठी मल्लखांब दीड मिनिटांचा खेळ असला, तरीही अगदी डोक्यापासून ते पायापर्यंतचा व्यायाम अगदी कमी वेळेत होतो. रक्ताभिसरण, स्मरणशक्ती वाढते. स्नायू बळकट होण्यासह चपळता वाढते. मल्लखांब प्रचंड मेहनत व खर्चिक खेळ असल्याचेही ते सांगतात.
 
‘हा डोंबार्‍याचा खेळ असून त्यातून काहीही होणार नाही. माकडासारखे उड्या मारतात खांबावरून. यातून व्यावसाय करून पैसे कमवतात,’ अशी अनेक टीका-टीप्पणी संतोष यांनी झेलली. परंतु, तरीही जिद्द कायम ठेवत ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर व ‘व्हावया स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना, नव्या पिढीस द्या त्वरें समग्र युद्धशिक्षणा’ या ओळी ध्यानी ठेवून संतोष तरुण पिढीला मर्दानी खेळांसह मल्लखांबाचे धडे देत आहेत. संतोष टेकाळे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.