शरीरात ज्यावेळी मंद अग्नी कार्यरत असतो, त्यावेळी शरीराची चैतन्यशक्तीसुद्धा मंदावलेली असते. चैतन्यशक्ती कमी झाल्यामुळे सहाजिकच सर्व कार्य मंदावतात. यकृताचे कार्यदेखील मंदावल्यामुळे संपूर्ण चयापचय क्रिया मंदावते. शरीरातील मेदाचे प्रमाण व ‘टॉक्सिन्स’चे प्रमाण वाढू लागते. माणसाला दुर्बल व निराश वाटू लागते. याच दुर्बलपणामुळे व हताशपणामुळे जर कुठलेही व्यसन, जसे तंबाखू, सिगारेट तसेच, अल्कोहोल सेवनाची जर सवय लागली, तर मग चयापचय क्रियेवर अजूनच विपरित परिणाम होत असतो.त्यामुळे जिभेची चव फिक्कट होते. चयापचय मंदावल्यामुळे भूक लागत नाही. माणूस खाण्याच्या वेळेला खायचे म्हणून खात राहतो.
शरीरातील पित्त, तसेच इतर विषारी पदार्थ तर वाढीस लागले, तर मग किडनीवरसुद्धा त्याचा विपरित परिणाम होतो. मूत्र बनण्यामध्ये याचा फरक दिसून येतो. मूत्र अतिशय फिक्कट रंगाचे किंवा अतिशय गडद अशा रंगाचे असते.शरीरात आमवाताचे प्रमाण वाढीस लागल्यामुळे मग शरीरातील स्नायू, हाडे, तसेच सांधे यामध्ये वेदना सुरु होतात. संधीवात होऊ शकतो.शरीरातील सर्व उत्सर्जित गोष्टींनी अतिशय दुर्गंधी येते. या उत्सर्जित गोष्टींमध्ये शरीराला येणार घाम, मल, मूत्र, लाळ इत्यादी स्रावांचा समावेश होतो. स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये अनियमितपणा येतो व मासिक पाळीच्या स्रावालासुद्धा दुर्गंध येतो, तसेच अंगावरुन सफेद स्राव जातो, त्याचाही फार दुर्गंध असतो.मंद जठराग्नीचा माणसाच्या लैंगिक सक्षमतेवरही विपरीत परिणाम होत असतो. शरीराच्या एकूणच ऊर्जा कमी झाल्यामुळे मग लैंगिक दुर्बलतासुद्धा येऊ लागते व त्याचाच परिणाम म्हणून मग वीर्यामध्ये दोष निर्माण होणे, ‘ईडी’ म्हणजे Erectile Dysfunction होणे, स्त्रियांमध्ये योनीस्राव न होणे, तसेच योनीमध्ये सततकोरडेपणा राहून त्याजागी जंतुसंसर्ग होणे, असे आजार उद्भवू लागतात.
तसेच लैंगिक संबंधांची इच्छासुद्धा दुर्बल होऊन जाते. पुरुषांमध्ये लैंगिक शिथिलता दिसून येते. त्याचप्रमाणे ‘प्रोस्टेट’ ग्रंथींचा त्रासदेखील सुरु होतो.स्त्रियांमध्ये योनीमार्गाचा संसर्ग झाल्यामुळे त्याचा त्रास गर्भाशय व अंडाशय यांनाही होतो. अंडाशयाचा त्रास सुरु झाल्यामुळे मग ‘पीसीओडी’ किंवा इतर संप्रेरक संबंधित आजार निर्माण होतात.या सर्व गोष्टी जर टाळायच्या असतील, तर मंद अग्नी रुपांतर समअग्नीत करायला हवे. कफप्रकृती, होमियापॅथीच्या अनुषंगाने सोरीक प्रकृतीचे त्रास कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी सुस्तपणा कमी करण्याचा प्रयत्न करावा व नियमित व्यायाम करावा. रोज ३० ते ४० मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. खाण्यापिण्यातही तेलकट, तुपकट पदार्थ तसेच, जंक फूड व डबाबंद व अन्नजतन करण्यासाठी जी रसायने वापरतात, असे अन्न टाळावे. आता आपण ‘सोरा सिफिलिस’ व ‘सायकोटीक मायाझम’च्या अनुषंगाने शरीरात मंदाग्नीमुळे कसा फरक पडतो, ते पाहूया. (क्रमश:)
-डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)