नवी दिल्ली : देशातील राजकारणात खळबळ उडवणारी बातमी म्हणजे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणे. या कारवाईनंतर त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत दिसून आले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात काँग्रेस जोरदार आंदोलनाच्या तयारीत आहे.पण खासदारकी नेमकी कशी रद्द होते.
‘लोकप्रतिनिधी कायदा, १९५१’च्या ‘कलम ८(१)’ आणि ’(२)’ अन्वये तरतूद आहे की, जर एखाद्या खासदाराने किंवा आमदाराने धर्म, भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर शत्रुत्व निर्माण केले किंवा कोणतेही दहशतवादी कृत्य केले किंवा राज्यघटनेचा अवमान केल्यासारखा फौजदारी गुन्हा केला अथवा जर त्या कटात सामील असेल, तर त्याचे संसद आणि विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले जाईल. याशिवाय याच कायद्याच्या ‘कलम ८(३)’ मध्ये अशी तरतूद आहे की, वर नमूद केलेल्या गुन्ह्यांव्यतिरिक्त, आमदार किंवा खासदाराला कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवून दोन किंवा दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असल्यास, या संदर्भात, आमदार किंवा खासदाराचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. यासोबतच त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासही बंदी घातली जाऊ शकते. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा सुनावली आणि वरच्या न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यास खासदार किंवा आमदाराचे सदस्यत्व रद्द केले जात नाही.