वॉशिंगटन डिसी : अमेरिकायेथील कॅलिफोर्नियात पाम स्प्रिंग्स शहरात शनिवारी १७मे २०२५ रोजी सकाळी एक मोठा स्फोट झाला. फर्टिलिटी क्लिनिकबाहेर झालेल्या या स्फोटात एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पाम स्प्रिंग्स इथल्या पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सदर स्फोट हा क्लिनिकच्या पार्किंगमध्ये एका गाडीत झाला. या स्फोटामुळे काही इमारतींचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात अमेरिकन रिप्रोडक्टिव्ह सेंटर्स या क्लिनिकच्या प्रतिनिधींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यात त्यांनी सांगितले की त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झाली नाही. तसेच, त्यांच्या लॅबमधील साहित्य पूर्णपणे सुरक्षित आहे.
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजॉम यांनी या घटनेविषयी त्यांच्या अधिकृत एक्स हॅंडलवर माहिती दिली. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटात पाच लोक जखमी झाले असून, मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तीचा या स्फोटाशी संबध असण्याची शक्यता आहे. अमेरिकेची तपास यंत्रणा असलेल्या एफबीआयचा या संबंधित तपास सुरू असून, या मागे नेमका कुणाचा हात आहे, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.