भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्राला अटक
17-May-2025
Total Views | 82
मुंबई : भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या करणाऱ्या ज्योती मल्होत्रा हिला पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असताना ज्योती मल्होत्राचे हे कृत्य उघडकीस आले आहे.
ज्योती मल्होत्रा ही भारतातील एक लोकप्रिय युट्यूबर असून ती हरियाणा येथील रहिवाशी आहे. 'ट्रॅव्हल विथ जो' या नावाने तिचे यूट्यूब चॅनल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये ज्योती मल्होत्रा हिने कमिशनद्वारे व्हिसा मिळवला आणि पाकिस्तानला भेट दिली. यावेळी पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी अहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशी तिची ओळख झाली. दरम्यान, तिने दानिशचा मोबाईल नंबर घेतला आणि नंतर त्याच्याशी संपर्कात राहिली. १३ मे २०२५ रोजी भारत सरकारने दानिशला हेरगिरीत सहभागी असल्याबद्दल पर्सोना नॉन ग्राटा घोषित केल्याचीही माहिती आहे.
पुढे ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या इतर एजंट्सच्यासुद्धा संपर्कात आली. भारतात परतल्यानंतर ती व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, स्नॅपचॅट यासारख्या सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे या एजंट्सच्या संपर्कात राहिली. याच काळात तिने पाकिस्तानला संवेदनशील माहितीदेखील शेअर केली. त्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थांनी तिच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवली आणि अखेर आता तिला अटक करण्यात आली आहे.
आयएसआयशी संबंधित ६ जणांना अटक!
यासोबतच हरियाणा पोलिसांनी आतापर्यंत आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागात राहणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. अधिक तपासानंतर याबाबत आणखी कोणते धागेदोरे पुढे येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.