"हा माझा पुनर्जन्मच..."; विमान दुर्घटनेतून बचावलेल्या भूमी चौहानने सांगितला अनुभव

    13-Jun-2025   
Total Views |

Ahmedabad plane crash: 10 minutes separated life and death for Gujarat woman heading to London
 
 गांधीनगर : (Bhumi Chauhan) गुजरातमधील भरूचमध्ये राहणारी भूमी चौहान अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातून सुदैवाने वाचली आहे. कारण भूमीला विमानतळावर पोहोचण्यास दहा मिनिटे उशिर झाला होता. त्यामुळे भूमीची फ्लाईट मिस झाली अन् सुदैवाने तिचा जीव वाचला. भूमीने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय, ती अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानाने प्रवास करणार होती. पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे ती सरदार वल्लभभाई इंटरनॅशनल एअरपोर्टवर दहा मिनिटे उशिरा पोहोचली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी विमानतळावर तिला एन्ट्री नाकारली.
 
माध्यमांशी बोलताना भूमी काय म्हणाली?
 
माध्यमांशी बोलताना भूमीने सांगितलं की, "माझ्या फ्लाईटची वेळ दुपारी १ वाजून १० मिनिटांनी होती. त्यामुळे मला १२ वाजून १० मिनिटांपूर्वी विमानतळावर पोहचायचे होते. रस्त्यात खूप ट्रॅफिक असल्यामुळे मी १२ वाजून २० मिनिटांनी विमानतळावर पोहोचले. मी चेक-इन करू शकले नाही आणि सुरक्षा रक्षकांनी मला परत जाण्यास सांगितले. त्यामुळे माझी फ्लाईट चुकली. सुरुवातीला मला वाटलं की, थोडं लवकर आलो असतो, तर फ्लाईट मिळाली असती. पण आता वाटतंय, जे झालं ते चांगलंच झालं. दैव बलवत्तर म्हणून या सगळ्यातून वाचल्यामुळे भूमीने देवाचे आभार मानले.
 
भूमीने अपघाताबाबत म्हटलं, "मी विमानतळाहून घरी जायला निघाली होती. तेव्हा रस्त्यात मला माहित झालं की, मी ज्या विमानात बसणार होते, ते विमान क्रॅश झालं आहे. माझ्या शरीरावर शहारे आले होते. मी बोलू शकत नव्हते. जे काही झालं, ते ऐकल्यानंतर मी सुन्न झाले होते. मी विचार केला की, माझे काहीतरी चांगले कर्म असतील, त्यामुळेच माझी फ्लाईट मिस झाली आणि माझा जीव वाचला. मी याला माझा पुनर्जन्म मानते. पण अन्य लोकांसोबत जे घडलं, ते खूप भयावह आहे. एवढ्या लोकांचा जीव गेला. मे देवाकडे प्राथर्ना करते की, अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांच्या आत्म्यास शांती मिळू दे."
 
या दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी सध्या औपचारिक चौकशी सुरू आहे आणि विमानाचा दुसरा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अपघातस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली.
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\