नवी दिल्ली, आसाममधील धुबरीमध्ये वाढत्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी तणाव रोखण्यासाठी दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. हनुमान मंदिरात गायीचे अवशेष सापडल्यानंतर झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सर्मा यांनी हा निर्णय घेतला आहे.
धुबरी येथील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्री सर्मा शुक्रवारी सकाळी ११ वाजता धुबरी येथे पोहोचले. सर्किट हाऊसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सर्मा यांनी धुबरी शहरात दिसताच क्षण गोळीबार करण्याचे आदेश जारी केल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे दगडफेकीच्या घटनांसह बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर अधिकारी तात्काळ कारवाई करतील असे सांगितले. हे निर्देश शुक्रवारी रात्रीपासून लागू झाले आहेत.