हैद्राबादच्या चार मिनार परीसरात भीषण आग; १७ जणांचा आगीत होरपळून मृत्यु

    18-May-2025
Total Views |
 
Massive fire in Hyderabad 17 people die
 
 
हैद्राबाद: ( Massive fire in Hyderabad 17 people die ) रविवारी सकाळी हैदराबादयेथील ऐतिहासिक चारमिनार परीसरातील गुलजार हाऊसमधील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत आठ लहान मुलांसह १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. हैदराबादमधील या आगीच्या घटनेत झालेल्या जीवीत आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये देण्याची घोषणा केली.
 
पंतप्रधानांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "तेलंगणातील हैदराबाद येथील आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. दरम्यान मृतांच्या परीवाराला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून त्यांनी प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये मदत दिली जाईल." असे स्पष्ट केले.
 
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ह्या आगीची माहिती सकाळी ६.३० वाजता मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, अनेक लोक बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती. तेलंगणा अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, आग तळमजल्यापासून सुरू झाली आणि वरच्या मजल्यांवर पसरली. शोध आणि बचावकार्य दरम्यान पहिल्या मजल्यावर अडकलेल्या १७ जणांना बाहेर काढण्यात आले. व तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, माञ उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.