मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Abu Saifullah Death News) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी राजुल्ला निजामानी उर्फ अबू सैफुल्ला (खालिद) याची पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. माटली शहरातील फलकरा चौकाजवळ दिवसाढवळ्या त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस येते आहे.
भारतात घडलेल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा सैफुल्लाह हा सूत्रधार होता. २००६ मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर, २००१ मध्ये रामपूर येथील सीआरपीएफ कॅम्पवर आणि २००५ मध्ये बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेवर झालेल्या हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता. या हल्ल्यांमध्ये अनेक निष्पाप लोक मारले गेले होते.
सैफुल्लाह हा लष्करचा ऑपरेशनल कमांडर आझम चीमाच्या जवळचा होता. तो विनोद कुमार या बनावट नावाने नेपाळमध्ये दहशतवादी कारवाया करायचा. याचठिकाणी त्याने एरा महिलेशी लग्न केल्याचीही माहिती होती. नेपाळमधून पळून गेल्यानंतर तो पाकिस्तानात लपून बसला होता. भारताने त्यास मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केले होते. सैफुल्लाहच्या मृत्यूने दहशतवादी गटांना चांगलाच धक्का बसल्याचे दिसतेय.