गुढीपाडवा २०२३ - ढोल-ताशाच्या गजरात दणाणले नाशिक

    22-Mar-2023
Total Views | 74
Gudi Padwa 2023

नाशिक : हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षारंभानिमित्ताने सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण शहर परिसरात पहायला मिळाले. शहरात विविध भागात कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. नववर्ष स्वागत समितीतर्फे शहरभरातून पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर शहरातील विविध भागात स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते.


शहरातील सिडको परिसर, इंदिरानगर परिसर, सातपूर आदी भागात स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. यात सिडको परिसरात सिडको सांस्कृतिक कला मंडळातर्फे गुढी उभारण्यात आली. तर इंदिरानगरमधील सात वेगवेगळ्या ठिकाणाहून स्वागत यात्रा काढण्यात आल्या. सातपूर परिसरात महागुढी उभारण्यात येऊन सायंकाळी १२ बैलगाडी ओढण्याचा पारंपारिक उत्सव देखील साजरा करण्यात आला. तब्बल १३० वर्षांची ही परंपरा अखंडितपणे सुरु असून कोरोना काळात दोन वर्ष या उत्सवात खंड पडल्यानंतर यंदा मात्र उत्साहाचे वातावरण आहे.

 
सकाळी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात व मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते गुढीपूजन पार पडले. यावेळी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे, गिरीश निकम उपस्थित होते. या स्वागत यात्रांच्या नियोजनासाठी वृषाली घोलप, सुचेता भानुवंशे, प्रदीप भानुवंशे, मोहन गायधनी, प्रतिक शुक्ल, अश्विनी चंद्रात्रे, प्रियंका लोहिते, केतकी चंद्रात्रे, मंदार कावळे, केदार शिंगणे, बापू दापसे, शेखर जोशी, कौस्तुभ् अष्टपुत्रे, शिवम बेळे, शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, महेश महांकाळे, प्रसाद गर्भे यांनी विशेष मेहनत घेतली.


Gudi Padwa 2023

लेझीम पथक, मर्दानी खेळांनी वेधले लक्ष

 
दरम्यान, शहरात नववर्ष स्वागत समितीतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. साक्षी गणपती मंदिर, भद्रकाली कारंजा, श्री काळाराम मंदिर, पूर्व दरवाजा आणि कौशल्यानगर रामवाडी या तीन ठिकाणावरून नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या तीनही यात्रांचा समारोप पाडवा पटांगण, दुतोंड्या मारुती शेजारी, गोदाघाट येथे संपन्न झाला. पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढली गेली. यात लेझीम पथक, चित्ररथ, ढोल पथक, मल्लखांब, महिला बाईक सफारी, मंगळागौरीचे खेळ आणि मर्दानी खेळांचे सादर करण्यात आले.


Gudi Padwa 2023 

स्वागत यात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद

दरम्यान, शोभायात्रेत ढोल ताशे, लेझीम पथक, चित्ररथ, मल्लखांब, बाईक रॅली मंगळागौरीचे खेळ आणि मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यावेळी नाशिककरांनी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून ठिकठिकाणी स्वागत यात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 

Gudi Padwa 2023

काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रौत्सवाला सुरुवात


हिंदू नववर्षानिमित्त काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. परिसरात काढलेल्या आकर्षक रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधले. सकाळी काकड आरती करण्यात आली. तर वासंतिक नवरात्रौत्सवाला सुरुवात होऊन स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवळकर रामवताराचे मर्म यावर त्यांनी मार्गदर्शन केले.


Gudi Padwa 2023

ऋृतरुंग येथे शास्रीय संगीताची मैफल

 
ऋृतुरंग येथे पंडित भुवनेश कोमकली यांची शास्त्रीय संगीताची मैफल आयोजित करण्यात आली होती. संवादिनीवर साथ ज्ञानेश्वर सोनवणे, तबला प. नितीन वारे यांनी साथसंगत दिली. या कार्यक्रमास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121