वास्तविक दहेलवीच्या पारंपरिक दृष्टिकोनाला आधुनिक काळाशी काही प्रमाणात सुसंगत करण्याचा अहमद खान यांनी प्रयत्न केला. वहाबी पंथांचे तत्वज्ञान आधुनिक विचारांच्या वेष्टनात गुंडाळून इतर धर्मीयांच्या शोधक दृष्टीपासून, या हालचाली दूर ठेवण्यासाठी घेतलेला हा एक पवित्रा होता असे म्हणावे लागते.
१८५७च्या आधीपासूनच सुसंघटित असलेल्या वहाबींनी स्वतःला बंडापासून वेगळे ठेवले. कारण, त्यांच्या दृष्टीने भारत मुस्लीम सत्ता नसलेला, अश्रद्धांचा प्रदेश होता. हिंदू सत्ता असलेला ’दारूल-अल-हरब’ होता. परंतु, तेव्हाचा सगळा घटनापट ते डोळे उघडे ठेवून पाहत होते. सगळ्या घटना मुस्लीम नेतृत्वाच्या दृष्टीसमोर घडत होत्या. बंडाचे झालेले परिणाम आणि इंग्रजांनी बंड मोडून काढताना वापरलेले तंत्र, याचे मुस्लीम वहाबी नेतृत्व निरीक्षण करीत होते. १८५७च्या बंडानंतर इंग्रजांनी वापरलेल्या दमननीतीवर, त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड लष्करी ताकदीवर आज तरी कोणतेही उत्तर नाही, हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यात इंग्रजांचा मुस्लीम समाजातील सामान्य माणसाच्या, १८५७च्या बंडातील सहभागामुळे, मुसलमानांवर विश्वास उरला नव्हता. त्याचवेळी या काळात हिंदूंमधील एक वर्ग, तसेच शीख हे इंग्रज लोकांनी सुरू केलेले शिक्षण आणि इंग्रजी भाषा आत्मसात करून इंग्रज प्रशासनात महत्त्वपूर्ण जागा पटकावू लागले होते.
मुस्लीम लोकांनी दुर्लक्ष केलेले इंग्रजी शिक्षण आणि इंग्रजी भाषा यामुळे तो समाज हिंदू समाजाच्या तुलनेत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या माघारला जाऊ लागलेला दिसत होता. हेही तेव्हाच्या मुस्लीम समाजाच्या नेतृत्वाला दिसत होते. या मुस्लीम सामाजिक नेतृत्वापैकी एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणजे सय्यद अहमद खान हे होत. ’मदरसा-ए-रहमियां’ या दहेलवीच्या सेमिनारीचे हे विद्यार्थी होत. अर्थात, दहेलवीच्या सेमिनारीचे विद्यार्थी, म्हणजे वहाबी संस्कारांच्या मुशीतच सय्यद अहमद खान तयार झाले होते.या अहमद खान यांनी १८७५ मध्ये अलीगढ येथे एक मुस्लीम मदरसा स्थापन केली. एकाच वर्षांत त्याचे त्यांनी कॉलेजमध्ये रूपांतर केले. १९२० मध्ये या कॉलेजचेच रूपांतर ‘अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी’मध्ये झाले. उत्तर भारतात उर्दूऐवजी हिंदी भाषा वापरली जावी, असा एक विचारप्रवाह १८६७ मध्ये बनारसला सुरू झाला. इंग्रज सरकारच्या नोकरीत असलेल्या अहमद खान यांनी, हिंदू आणि मुसलमान हे एकत्र येऊ शकणार नाहीत, असा निष्कर्ष त्याचवेळी काढला आणि आपली पुढील दिशा ठरवून टाकली. तेव्हा बनारसच्या आयुक्तांना अहमद खान म्हणाला की, ‘’उर्दू ही भारतातील सुसंस्कृत आणि समाजव्यवस्थेवर प्रभाव असणार्या लोकांची भाषा आहे, तर हिंदी ही असभ्य लोकांची भाषा आहे.” निश्चितपणे अहमद खान यांना कोणत्याही प्रकारे हिंदू वरचढ व्हायला नको होते.
अपवादात्मक स्थिती सोडली तर ते कधीच राष्ट्रीय प्रवाहात नव्हते किंवा काँग्रेसबरोबर नव्हते. अर्थात, दहेलवीच्या वहाबी संस्कारांचाच हा परिणाम होता. परंतु, अहमद खान यांनी त्यांच्या संस्थांमधून मुस्लीम समाजाच्या इंग्रजी शिक्षणावर देखील भर दिलेला आढळतो. वास्तविक दहेलवीच्या पारंपरिक दृष्टिकोनाला आधुनिक काळाशी काही प्रमाणात सुसंगत करण्याचा अहमद खान यांनी प्रयत्न केला. वहाबी पंथांचे तत्वज्ञान आधुनिक विचारांच्या वेष्टनात गुंडाळून इतर धर्मीयांच्या शोधक दृष्टीपासून, या हालचाली दूर ठेवण्यासाठी घेतलेला हा एक पवित्रा होता असे म्हणावे लागते. अहमद खान यांनी वहाबी विचार आधुनिकतेच्या आवरणामध्ये गुंडाळून देशातील इतर धर्मांसमोर ठेवले. त्याच्या मते, जगाला, जर दहेलवी/वहाबी विचारांनी इस्लामिक करायचे असेल, तर इतर धर्मीयांना सतत संभ्रमात ठेवणे, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. तसेच, एका सर्वंकष मुस्लीम वातावरणाची निर्मिती एखाद्या विशिष्ट संस्थेच्या अंतर्गत करावी लागेल, असे वातावरण जे संपूर्ण इस्लामिक असेल, पण ज्यात आधुनिक विज्ञान विचारांच्या आड, इस्लामिक शिकवण देता येईल. आधुनिक विचारांची चौकट दाखवत वहाबी इस्लामिक विचारांचा प्रसार करण्याचे हे तंत्र होते. इस्लामचे धेय्य (सगळं जग दार-अल-इस्लाम करण्याचे) गाठण्यासाठी आपल्या सर्व कृतींवर असा पडदा असणे किंवा टाकणे सोयीस्कर ठरेल. स्वतंत्र भारतात त्याने स्थापन केलेल्या, ‘अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी’ला देण्यात आलेला निधी आणि महत्त्व यावरून त्यांचा हा डाव पूर्ण यशस्वी झाला, हे लक्षात येते. यामुळेच कदाचित मुहम्मद अली जिना अलीगढ मुस्लीम विद्यापीठाला ’भारतातील मुस्लीम दारूगोळा/स्फोटकांचे कोठार’ असे म्हणत असे.
यासाठी हा आधुनिक विचारांचा पडदा इस्लाम आणि वहाबी विचारधारांवर टाकणारे सय्यद अहमद खान फक्त १८५७च्या बंडात मुस्लीम सैनिकांनी दिलेली जिहादची हाक फक्त अयोग्य ठरवतात. आयेशा जलाल या अहमद खान यांच्या भाष्यकार म्हणतात की, ’‘अहमद खान इस्लाममधील ‘जिहाद’ची संकल्पना चुकीची मानत नाहीत किंवा नाकारत नाहीत. ते १८५७ मध्ये सैनिकांनी दिलेल्या जिहादच्या आवाहनाला, जिहादसाठी तेव्हा पुरेशी प्रबळ कारणे नव्हती, असे म्हणत. तेव्हाची ती हाक फक्त चुकीची ठरवतात.” हा सगळा सव्यापसव्य ते फक्त आपल्या इस्लामीकरणाचे ध्येय आणि त्या ध्येयासाठी त्यांनी वापरलेल्या मार्गाचा बचाव करण्यासाठी करतात, अशा बंडांमुळे सगळं जग ‘दार-अल-इस्लाम’ करण्याचे मुस्लीम समाजाचे ध्येय साध्य होणे शक्य नाही, असे त्यांचे मत असल्यामुळे ते म्हणतात, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. पुढे जाऊन अहमद खान आपल्या, ’लॉयल मुसलमान ऑफ इंडिया’, या पुस्तकात मुस्लीम-ख्रिश्चन भाऊ-भाऊ असा पवित्रा घेतात आणि इस्लाम व ख्रिश्चन हे दोन्ही अब्राहमिक धर्म असल्यामुळे तसेच अनेक धार्मिक विश्वास दोन्ही धर्मांमध्ये सारखेच असल्याने, मुसलमान ख्रिश्चनांना क्षती देणारच नाहीत, असेही ठासून सांगतात. त्याचवेळी जर कोणी बंडाच्या काळात झालेल्या कत्तलींसाठी दोषी असतील, तर ते ’रामदीन आणि मातादीन’ म्हणजेच फक्त हिंदूच आहेत, हे प्रतिपादन करण्यास अहमद खान चूकत नाहीत.
अहमद खान खरे, तर दहेलवी किंवा बरेलवी यांच्या इतकेच वहाबी विचारांचे आहेत. यात फरक करायचाच असेल, तर तो इतकाच की, “वहाबी विचार म्हणजे पैगंबरांनी सांगितलेला इस्लाम हाच संपूर्ण जगात स्थापन करावयाचा एकमेव धर्म आहे. तसेच, पैगंबरांनी सांगितला त्याच शुद्ध स्वरूपात हा इस्लाम सगळ्यांनी अनुसरला पाहिजे,” असा आग्रह वहाब, दहेलवी, बरेलवी आणि काही इतर इस्लामिक चळवळी धरतात आणि त्यासाठी इतर धर्मीयांपासून मुसलमानांनी फटकून वागले पाहिजे, असे सांगतात. इतरांशी संवाद साधणे, संबंध बनवणे वा इतर धर्मीयांमध्ये मिसळणे अयोग्य म्हणत, एकटेपणे वाटचाल करावी, या मताचे आहेत, तर सय्यद अहमद खान मात्र हिच उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताला ’दार-अल-इस्लाम’ करण्यासाठी, पाश्चात्त्य विज्ञान विचारांच्या आड इतरांच्या मनात एक संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न करतात. इस्लाममध्ये संशोधन करून आवश्यक त्या सुधारणा करणे, हे भारतात इस्लामला पुन्हा त्याची सन्मान्य जागा मिळण्यासाठी आवश्यक आहे, असा पवित्रा घेतात. या नंतरच्या काळातच ‘ऑल इंडिया मुस्लीम लीग’ची स्थापना झाली, हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. ब्रिटिश सरकारनेदेखील हिंदू समाजातील वाढलेली राजकीय समज आणि आकांक्षा यांना मर्यादित करण्यासाठी, आव्हान देण्यासाठी ‘अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी’ला एक व्यूहरचनात्मक महत्त्व दिले. परंतु, सुधारणावादी, आधुनिक इस्लाम अशी कोणतीही संकल्पना तेव्हाही आणि आजही मुसलमानांना मान्य नव्हती आणि नाही असेच म्हणावे लागते. त्यामुळे दहेलवी, बरेलवी किंवा सय्यद अहमद खान हे विचारांनी वहाबीच होते, असाच निष्कर्ष निघतो.काळाच्या ओघात या इस्लामिक चळवळी आणि त्यांचा मुस्लीम समाजाच्या मानसिकतेवर झालेला परिणाम समजण्यासाठी वहाब, दहेलवी, बरेली आणि अहमद खान हे आधी समजून घेऊन मगच मुस्लीम मानसिकतेचे विश्लेषण करणे योग्य ठरते.
(क्रमशः)
-डॉ. विवेक राजे