फिलीपीन्सच्या पायघड्या!

    16-Feb-2023   
Total Views |
A treaty between America and the Philippines

अमेरिका आणि चीनमधील संघर्ष हा जगाला काही नवीन नाही. कधी सुरक्षेचे कारण तर कधी आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन अन्य देशांना आपल्या गटात वळवण्यासाठी दोन्ही देशांकडून चांगलाच जोर लावला जातो. नुकताच अमेरिकेने फिलीपीन्ससोबत एक करार केला, ज्यामुळे अमेरिकन सैन्य फिलीपीन्सच्या आणखी चार सैन्यतळांचा वापर करू शकणार आहे. या करारामुळे फिलीपीन्समध्ये मानवी आणि प्राकृतिक संकटकाळात जलदगतीने मदतकार्य पोहोचवणे शक्य होईल आणि अन्य संकटांवेळीही मदतीसाठी हा करार उपयुक्त ठरणार असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. परंतु, जाणकारांच्या मते या कराराच्या माध्यमातून अमेरिका चीनला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. चीनने मात्र या करारावर नाराजी व्यक्त करत, हा करार शांतताभंग करणारा आणि तणावाला प्रोत्साहन देणारा असल्याचे म्हटले आहे.

तीन दशकांपूर्वी उत्तर फिलीपीन्समधील सुबिक खाडीमध्ये संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या नौसेनेचे परदेशातील सर्वांत मोठे तळ होते. १९६०-७०च्या दशकात व्हिएतनामवर कारवाईसाठी या नौसेना तळाचा वापर करण्यात आला होता. १९९० मध्ये या तळाला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव फिलीपीन्सच्या सिनेटने रद्द केला आणि यानंतर हे तळ १९९२ साली बंद करण्यात आले होते. त्यानंतर ३० वर्षांनंतर पुन्हा अमेरिका फिलीपीन्समध्ये आपली सैन्य ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहे. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये संवर्धित संरक्षण सहकार्य करार करण्यात आला, ज्यानुसार अमेरिकेला फिलीपीन्सच्या पाच सैन्य तळांचा वापर करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा झालेल्या करारामुळे अमेरिकेला व्यापक फायदा होणार असून आणखी चार सैन्य तळ वापरण्यास मिळतील. हा करार २०१४ साली करण्यात आला. परंतु, २०१६ ते २०२२ दरम्यान फिलीपीन्सचे माजी राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी या कराराला स्थगिती दिली.

परंतु, त्यांनी राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर फर्डिनेंड मार्कोस ज्युनियर नवे राष्ट्रपती बनले आणि त्यांनी अमेरिकेशी पुन्हा जवळीक वाढवली. याचा फायदा उचलत अमेरिकेने नुकताच हा करार केला आहे. या करारामुळे अमेरिकेला तैवान आणि दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या हालचालींवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. दरम्यान, ही चार ठिकाणे नेमकी कुठे असतील, याविषयी कुठलीही माहिती देण्यात आली नसली तरीही तैवानजवळस्थित फिलीपीन्सच्या लुझोन बेटावर तीन सैन्य ठिकाणे असणार आहे. पूर्व आशियाच्या नकाशावर नजर टाकली, तर अमेरिका आणि सहयोगी देशांची अनेक सैन्य ठिकाणे आढळून येतात. ही ठिकाणे उत्तरेला दक्षिण कोरिया आणि जपानसह दक्षिणेला अगदी ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलेली आहेत.

चीनच्या आक्षेपानंतरही अमेरिकेने हा करार केला. आधी वैर नसलेले फिलीपीन्स आणि चीन यांच्यामध्येही आता संघर्षाची ठिणगी पडलेली आहे. २०१२ साली चीनने फिलीपीन्सच्या स्कारबोरो शोल या प्रांतावर कब्जा करण्याचा आणि कृत्रिम बेटं तयार करण्याचा प्रयत्न केला. २०१४ पासून चीनने या परिसरात दहा कृत्रिम बेटे तयार केली असून मिसचिफ रिफ हे त्यापैकीच एक द्वीप आहे, जे फिलीपीन्सच्या ‘एक्सक्लुझिव्ह इकोनॉमिक झोन’मध्ये असून ते फिलीपीन्सच्या सैन्यतळाजवळच आहे. फिलीपीन्सला दक्षिण चीन समुद्राच्या नावावरही आक्षेप असून फिलीपीन्स त्याला ‘पश्चिम फिलीपीन्स समुद्र’म्हणून ओळखतो. चीन दक्षिण चीन समुद्राचा नकाशाही नव्याने बनवण्याच्या तयारीत आहे. चीनशी थेट पंगा घेणे फिलीपीन्ससारख्या छोट्या देशाला शक्य नसल्याने फिलीपीन्सने शेजारी देशांशी सहकार आणि मजबूत संबंध बनवण्यावर भर दिला आहे.त्याचप्रमाणे, पुढील धोका ओळखून चीनला थोपवण्यासाठी फिलीपीन्सने अमेरिकेला आपल्या सैन्य तळांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.
 
दरम्यान, फिलीपीन्समध्येही या कराराला विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. तरीही, चीनच्या चालींना लगाम घालण्यासाठी फिलीपीन्सने अमेरिकेला आपल्या अंगणात वावरण्याची संधी देण्याचे धाडस केले आहे. अफगाणिस्तानातही अमेरिकेने आपले बस्तान बसवले खरे, परंतु सुधारणेऐवजी बर्बादीच झाली. चीनला थोपवण्याच्या नादात अमेरिकेला दिलेल्या आवताणाची फिलीपीन्सला काय किंमत मोजावी लागेल, हे येणारा काळच ठरवेल.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.