गुण घेईन आवडी

    03-Dec-2023   
Total Views |
Article on Arvind Paranjpe

संगीत, गायन, लेखन आणि पक्षी निरीक्षण अशा चहू अंगांनी कालवेध घेणारे अरविंद परांजपे यांचा संक्षिप्त परिचय करुन देणारा हा लेख...

माणसाने कलावंत असावं. कला माणसाला केवळ प्रसन्नच करत नाहीत, तर समृद्धसुद्धा करते. कलाकार हा मुळात रसिक असतो. सृजनाचे नवे धुमारे त्याला तेव्हाच फुटतात, जेव्हा रसिक मनाने आपल्या संवेदनशील पटलावर तो कलाविष्कार टिपत असतो आणि मग पुढे त्याच्या सृजनाचे सोहळे होतात. अरविंद यांचे शिक्षण सुरुवातीला विज्ञान शाखेतून झाले. पुढे त्यांनी ‘सीएस’ केले व काही काळ कंपनी सेक्रेटरी म्हणून काम केले. हे सर्व करताना कलांची आवड त्यांना होतीच. आपल्या मामांसोबत राहून, त्यांना संगीताची ओळख झाली. ते तबला घेऊन त्यांच्यासोबत साथसंगत करत, त्यांनी अनेक कार्यक्रम केले.

तळेगाव येथील एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आईवडील दोघेही पेशाने डॉक्टर. दोघांचाही सराव सुरू होता. त्यामुळे शाळेसाठी तळेगावहून पुणे रोजची ये-जा ठरलेली. तिसरीनंतर मात्र त्यांनी पुण्यातच राहायला सुरुवात केली. एक वडील बंधू आणि धाकटी बहीण असे तिघे असल्याने वडिलांनी पुण्यात घर घेतले. शाळेतच प्रवेश प्रक्रिया होती-ज्ञानप्रबोधिनीची. आज आपण ज्या शाळेचे कौतुक ऐकतो, पुण्यात ज्या संस्थेने अनेक विद्यार्थी घडवले, त्या शाळेची पहिली तुकडी सुरू होणार, त्यासाठी ही प्रवेश परीक्षा इतर शाळांमध्ये घेण्यात आली. ज्या मुलांना उत्तम गुण प्राप्त झाले, अशांची निवड यासाठी करण्यात आली. ज्ञानप्रबोधिनीच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांपैकी एक म्हणजे अरविंद परांजपे.

सर्वच यशस्वी माणसांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना संघर्ष करावा लागतो. अरविंदसुद्धा सुरुवातीच्या काळात कधी काकूकडे कधी मावशीकडे तर कधी आत्याकडे राहिले आहेत. कुणाकडे जेवायला, तर कुणाकडे झोपायला असे त्यांचे वार लावलेले असत. अशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला. त्याचवेळी संगीत वादन अविश्रांत सुरूच होते. आज त्यांनी संगीत क्षेत्रात जे कार्य केले आहे, त्याची घडण या काळात होत होती.

मानच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०१० पासून त्यांनी एक दिवसीय सांगीतिक कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली. त्यावेळी मोठ्या संगीत कलाकारांना बोलावून, त्यांच्या मुलाखती त्यांनी आयोजित केल्या. सुरुवातीपासूनच त्यांची लेखनाची सवय त्यांनी जोपासली होती. कंपनी सेक्रेटरी असताना मिळवलेल्या ज्ञानाचा आणि अनेक आर्थिक संबंधित योजनांबद्दल ते साप्ताहिकांतून लिहीत. तेथूनच त्यांचे लेखन सुधारत गेले व त्यांचा लेखनप्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी आपले लेख लिहिले आहेत. ज्ञानप्रबोधिनीसाठी आपले अनुभवकथन करणारा लेख त्यांनी लिहिला आहे. त्यांचे ब्लॉग्स वाचनीय आहेत.

त्यांना पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रणाचीसुद्धा आवड आहे. संगीतकारांच्या मुलाखती घेताना, सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याचे एडिटिंग वगैरे ते स्वतः पाहत. एडिटिंगचीसुद्धा आवड होतीच. त्यातूनच पक्षी बघायचे ठरले. कावळा, चिमणी, पोपट, कबुतर यांच्या पलीकडे पक्षी कोणते याची कल्पना त्यांना अलीकडे पाच वर्षांपूर्वीपर्यंत नव्हती. मात्र, हातात कॅमेरा असल्याने सुंदर पक्षी पाहण्यासोबत त्यांना कॅमेरात टिपता येऊ लागले आणि आवड वृद्धिंगत होऊ लागली. अशातच २०१९ उजाडले आणि स्मृतिदिनानिमित्त होणार्‍या मुलाखतींचा नेम खंडित झाला.

कोरोना महामारीमुळे सर्वच बंद होते. अशावेळी हातावर हात ठेवून स्वस्थ बसण्यापेक्षा त्यांनी या मुलाखतीचे शब्दांकन करायचे ठरवले. त्या मुलाखतीचे शब्दांकन, पुढे संकलन आणि पुस्तकाचे संपादन त्यांनी केले. या कामात आपल्या मामाच्या मुलीची मोठी मदत झाल्याचे ते सांगतात. आपल्या जडणघडणीत आपल्या शाळेचा वाट मोठा असल्याचे ते सांगतात. ज्ञानप्रबोधिनीबाबत बोलताना ते म्हणतात की, ”अनुभव शिक्षण हा प्रबोधिनीच्या शिक्षण पद्धतीमधील महत्त्वाचा घटक आहे. जबाबदारी घेऊन काम करण्याचा अनुभव इतरत्र कमी मिळतो.

दलावर दादा म्हणून जबाबदारी घेतल्यावर तुम्ही जे शिकता, ते बाहेर शिकता येत नाही. भारतात कितीतरी सेवाभावी संस्था कित्येक वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या कामामुळे समाजात अपेक्षित बदल घडला आहे का? जर नसेल तर त्याची कारणे काय आणि असा बदल कशामुळे घडू शकेल? असा आढावा जरूर घ्यावा. आपण मोठी स्वप्ने जरूर पाहावीत आणि ती साकार करण्याचे प्रयत्नही करू या. पण तसे करताना, छोट्या पातळीवरून एकदम देशपातळीवर जाण्याचा अट्टाहास करतोय का याचाही विचार करावा.“ संगीत, गायन, लेखन आणि पक्षी निरीक्षण अशा चौफेर गुणांनी संपन्न असलेलय या व्यक्तिमत्वास पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.