तरुणांना साहित्य संमेलनाचं वावडं का ?

    22-Dec-2023   
Total Views |
Youth on sahitya sammelan

वर्षअखेर म्हणजे विविध साहित्य संमेलनांची पर्वणी. ’अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ची तयारीसुद्धा झोकात सुरू असते. मराठी ही समृद्ध साहित्य संस्कृती लाभलेल्या विशेष पाच भाषांमध्ये मोडते. आजवर या अभिजात मराठीचा प्रवास पाहिला तर तो एकसुरी नाही, विविध वळण घेत, समृद्ध होत जाणारा आहे. या साहित्याचा जल्लोष करणारी ही साहित्य संमेलने. पण, या संमेलनांमध्ये तरूण फारसे दिसत नाहीत, ही नेहमीचीच रसिकांची खंत. महाविद्यालयीन संमेलनांमध्येही थोरांचीच मांदियाळी आपल्याला दिसते. त्यानिमित्ताने साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांच्या प्रतिक्रिया..

...तर तरुण साहित्य संमेलनाला हजेरी का लावतील?

तरुणांचा साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या वैयक्तिक वेळा, साहित्यातल्या कथित प्रस्थापितांबद्दल त्यांचं मत, अशा अनेक घटकांचा विचार करायला हवा. मुळात तरूण म्हणजे कोण? हा विषय महत्त्वाचा. वेगवेगळ्या वयोगटांतील तरुणांच्या आवडीनिवडी, वाचन, जगाकडे बघायचा दृष्टिकोन हे सगळं सारखं नसतं. जो मजकूर खरोखरच दर्जेदार आहे, तो तरूण वाचतात का? त्यांच्यापर्यंत तो पोहोचतो का? मला आजचे तरूण ’नो नॉनसेन्स’ वाटतात. एका मराठी रिआलिटी शोमधील परीक्षक मुलाखतीत म्हणाले की, ते म्हणे ’रिआलिटी शो’ला येणार्‍या स्पर्धकाची गरिबी हा त्याचा (USP) आता राहिलेला नाहीय. लोकांना चॅनेलचं मार्केटिंग तंत्र आता समजलं आहे. त्यांना गाणं ऐकायचं असतं, मग तो स्पर्धक कोणत्याही परिस्थितीतून आलेला का असेना. हा दृष्टिकोन आजकाल तरुणांमध्ये दिसून येतो. हाच साहित्यालाही लागू पडतो. उद्या प्रत्येक लेखकाला आपलं राजकीय मत असेल आणि तो संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर साहित्य सोडून इतर सर्व राजकीय विषयांवर भाष्य करण्यासाठी करत असेल, तर तरूण त्या संमेलनाला हजेरी लावतील, ही अपेक्षा करणेच अवाजवी. दुसरं, असा कोणता विचार साहित्य परिषद मांडते? लेखन आणि वाचन चळवळीला पाठिंबा मिळेल, असे कोणते मुद्दे साहित्य चळवळीने मांडून त्यावर काम केलं आहे? जे तरुणांना दाखवले, तर ते आकर्षित होऊ शकतील? पूर्वीच्या काळी वाचन हा मनोरंजनाचा आणि ज्ञानवर्धनाचा महत्त्वाचा स्रोत होता. आता जग किती बदललं आहे, त्यात तरुणांना खिळवून ठेवेल, असं काय लेखक देऊ शकतील? आमच्या ग्रंथालयात मी शासन मान्यता पुस्तकं निवडायला जातो, इतकी वाईट दर्जाची पुस्तकं असतात की, विचारता सोय नाही. कोण वाचेल अशी पुस्तकं? काय मजकूर देतोय आपण तरुणांना? मराठी साहित्य संमेलनाचे वर्षानुवर्षे चालणारे गोंधळ आणि त्यात होणार्‍या लाथाळ्या बघितल्या, तर त्यात तरुणांनी सहभागी होऊ नये, हेच योग्य वाटतं. साहित्य, वाचन, वाचन चळवळ यांखेरीज सर्व विषयांना तिकडे वाव असतो. तरूण पिढी फार लॉजिकल आणि (to the point) विचार करणारी आहे.
-सारंग लेले, तरूण कलाकार आणि वाचनालय कार्यकारिणी सदस्य

तरुणांच्या आवडीनिवडींचा शोध घेतला पाहिजे

रुणांचा साहित्यातील सहभाग हा पूर्वीइतका जरी दिसत नसला, तरी परिस्थिती तितकीशी चिंताजनक नाही. त्यांना गोडी आजही, आताही लागू शकते; मात्र तसे प्रयत्न साहित्य क्षेत्रात होताना दिसत नाहीत. वाचक आस्वादक म्हणून तरुणांना काय ऐकायला, वाचायला आवडेल, याचा शोध आज घेतला पाहिजे. कवितांच्या कार्यक्रमांना आजही गर्दी होते; मात्र तेच साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनात ती दिसत नाही; कारण आजचा तरूण साहित्य आस्वादक हा चोखंदळ आहे, त्याला संख्यात्मकतेपेक्षा गुणवत्तेची आस आहे. आज लिहिणारे हातही तरुणांच्यामध्ये मुबलक आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ते सकस लिहितायत, त्यांना जोपासण्याची गरज निर्माण होताना, आजच्या ज्येष्ठ पिढीने त्यादृष्टीने प्रयत्न केले, तर येणारा काळ हा साहित्याच्या दृष्टीने सुवर्णकाळ असेल, यात शंका नाही.
-आदित्य दवणे, युवा कवी आणि प्राध्यापक
 
दर्जेदार कार्यक्रम झाले, तर मराठी कवितेलाही पुन्हा ‘ग्लॅमर’ येईल...

ज्या पद्धतीत सध्या उर्दूत ’जश्न-ए-रेखता’, ’साहित्य आजतक’ असे कार्यक्रम गेल्या दशकापासून सुरू आहेत, तसे कार्यक्रम मराठीत आपल्याला अजून उभे करता आले नाही, ही खंत आहे. असे कार्यक्रम मराठीत झाले, तर मराठी कवितेला पुन्हा ‘ग्लॅमर’ आल्याशिवाय राहणार नाही आणि तरूण कवी याकडे एक व्यावसायिक संधी म्हणून बघायला लागतील. गेल्या दहा वर्षांपासून वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा आणि पुढे विविध कविसंमेलन, गझल मुशायरे या माध्यमांतून मराठी साहित्य क्षेत्रात मी प्रत्यक्ष कार्यरत आहे. सध्या काव्य मैफिलींचे व्यावसायिक प्रयोग करतोय. या आधारावर मला आलेल्या वैयक्तिक अनुभवातून काही मुद्दे कवितेच्या व्यावसायिकतेचा विचार करताना नमूद करावेसे वाटतात. स्वर्गीय कवी ना. धों. महानोर यांच्या पिढीपर्यंत अनेक कवींनी कवितेतून व्यावसायिक, सामाजिक आणि राजकीय उन्नती मिळवली. त्यांच्या कवितेला जागतिक व्यासपीठ मिळाले. पण, त्यानंतरचा काळ आणि आता समकालीन कवींना ते ‘ग्लॅमर’ अनुभवता आलेले नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. तरीही समकालीन कवींमध्ये काही कवी त्या वाटेवर आहेत-ज्यात संदीप खरे, वैभव जोशी, प्रशांत मोरे, अनंत राऊत यांची नावे प्रकर्षाने नमूद करावीशी वाटतात. माझ्यासारखे अनेक तरूण कवी या कवींकडून प्रेरणा घेत असतात. या प्रवासात काही अडचणीसुद्धा आहेत. मराठी कवितेत कवितेच्या प्रकारावरून, प्रदेशावरून, अनेक गट पडलेले दिसतात. यात नवीन कवी भरडला जात आहे. त्यात विविध साहित्यिक संस्थांचे राजकारण, एकमेकांत असणारे हेवेदावे यामुळे तरूण कवींना संधी मिळत नाही. संधी मिळाली तरी योग्य ते मानधन आणि सन्मान मिळत नाही. म्हणून आता कवींचा कल हा स्वतःचे कार्यक्रम तिकीट लावून करण्याकडे वाढला आहे. त्यातही जे कवी प्रसिद्ध आहेत, त्यांनाच ते शक्य होते.
-अपूर्व राजपूत, युवा कवी आणि साहित्यिक

तरुण का सहभागी होत नाही, ते समजून घ्यायला हवे

याबाबतीत माझा अनुभव थोडा वेगळा आहे. मी संमेलनासाठी तरूण शोधतेय; पण ते इतके व्यस्त आहेत की, सगळ्याला ते अगदी ‘नाही’ म्हणतात. कोणताही कार्यक्रम घेतला, तरी त्यांचे प्राधान्यक्रम निराळे असतात. त्यामुळे मला तरुणांसाठी कार्यक्रम करताना, अनेक अडचणी येतात, जे ज्येष्ठ आणि लहान मुलांसाठी करताना येत नाहीत. यात मला तरुणांना अजिबात दोष द्यायचा नाही; पण यामागची कारणं समजून घ्यायची आहेत. जेणेकरून मला त्यांच्याबरोबर काही उपक्रम व्यवस्थित राबविता येतील. लहान मुलांच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. आपला संमेलनातला एक अख्खा दिवस लहान मुलं स्टेजवर असतात आणि मोठे खाली बसून कार्यक्रम एन्जॉय करत असतात.
-अर्चना कुडतरकर, कार्यकारी संपादक, शिक्षण विवेक

तरुणांना साहित्य संमेलनासाठी ओढून आणायला हवे!

तरुणांचा साहित्य संमेलनामध्ये सहभाग नाही, याबाबत मला खेद वाटतो. आपण त्यांना समाविष्ट करून घ्यायला हवे. ते नाही आले तर त्यांना ओढून आणायला हवे, तरच ही वाचन परंपरा टिकेल. आज जे कार्यकर्ते साहित्य क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत, त्यांना असेच तत्कालीन मोठ्यांनी खेचून आणले होते. एक उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र पाठक. त्यावेळी त्यांना या क्षेत्राची ओळख झाली आणि आज ते साहित्य क्षेत्र गाजवतायेत!
-विश्वास पाटील, सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि ज्येष्ठ साहित्यिक


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.