मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ-४ मधील 'पी उत्तर' विभागातील मालाड (पश्चिम) परिसरात प्रभाग ३४ मध्ये चारकोप नाका (अथर्व महाविद्यालय जवळ) येथील भूखंडावर नागरी वन उपक्रमांर्गत (मियावाकी जंगल) वृक्षारोपण व इतर संकीर्ण कामांचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
रविवारी या लोकार्पण सोहळ्यास कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार ॲड. आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, खासदार तथा ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी, स्थानिक आमदार योगेश सागर, अभिनेत्री जुही चावला, उपायुक्त (परिमंडळ -४) विश्वास शंकरवार ,पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित राहणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संतुलनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम पार पडत आहे.
रविवारी उद्यानात २,२०० चौ. मी. वर ८,८०० इतकी ३० विविध प्रकारची देशी जातीची झाडे लावण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने आवळा, हिरडा, बेहडा, शिवण, साग, कडूनिम, जांभूळ, अर्जुन आदी झाडे लावण्यात येत आहेत. तसेच, पारंपरिक पद्धतीने सहा जातीची १० ते १२ फूट उंचीची १२०० झाडे संपूर्ण भूखंडाच्या संरक्षक भिंतीलगत लावण्यात येणार आहेत. त्यात करंज, बेहडा, बहावा, कदंब, सुरु, ताम्हण या झाडांचा समावेश आहे.