मुंबई उपनगरात आजपासून रस्ते काँक्रीटीकरण बंद!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

    19-May-2025   
Total Views |
construction of concrete roads to stop in mumbai suburbans

मुंबई : मुंबई उपनगरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे मंगळवार, दि. २० मेपासून कोणतेही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करू नये, तसेच दि. ३१ मेपर्यंत रस्ते वाहतूक योग्य करावेत, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.

शेलार यांनी सोमवार, दि. १९ मे रोजी तिसऱ्यांदा मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी कामे अपूर्णावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. वांद्रे पश्चिम येथील १४ व्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून, रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला आहे. कांदिवली येथील न्यू लिंक रोड आणि डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशन परिसरातील रस्त्यांचे अपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी दिले. मालाड पूर्व येथील गोविंदभाई श्रॉफ रोड ते एस. व्ही. रोडपर्यंतच्या रस्त्यांच्या क्यूरींगचे काम पूर्ण झाले असून, हा रस्ता काही दिवसांत वाहतुकीसाठी खुला होईल असेही त्यांनी सांगितले. दहिसर पश्चिम येथील रंगनाथ केसकर महामार्ग आणि रिव्हर व्हॅली रोडला जोडणाऱ्या दहिसर नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार मनिषा चौधरी यांनी दहिसर परिसरातील अपूर्ण कामांची यादी अधिकाऱ्यांसमोर सादर केली.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, येत्या तीन वर्षांत मुंबईत उत्तम रस्त्यांची सोय नागरिकांसाठी केली जाईल. यावरून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबईतील रस्त्यांची जी दयनीय स्थिती होती, त्याच्या तुलनेत फक्त एका वर्षात आम्ही ६० टक्क्यांहून अधिक रस्त्यांची सुधारणा पूर्ण केली, हे लक्षात येते असेही शेलार यांनी सांगितले.

रस्त्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनिषा चौधरी, माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, माजी नगरसेविका हेतल गाला आणि स्थानिक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

तात्काळ डांबरीकरण होणार


- आता नवीन रस्ता खोदू नका . दि. २० मेनंतर काँक्रीटीकरण करणे थांबावा. कारण पावसाळ्याच्या तोंडावर केलेल्या तात्पुरत्या कामांमुळे रस्ते पुन्हा उखडण्याचा धोका असतो.
- दि. ३१ मे २०२५ पर्यंत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करा, जे रस्ते खोदून ठेवले आहेत, त्याचे डांबरीकरण करून ते वाहतूकीस खूले होतील असे करा. डांबरीकरण करताना ते रस्ते पावसाळ्यात उखडून खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्या.
- तसेच सध्या लावण्यात आलेले दुभाजक हटवा, डेब्रिज, खडी, माती तातडीने हटवण्यात यावेत, गटारांमध्ये गेले डेब्रिज आणि मातीही काढा, अशा सूचना यावेळी पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिल्या.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.