कान फेस्टिवलच्या मार्केट विभागात मराठी चित्रपटांची चर्चा

- "महाराष्ट्र फिल्मसिटी स्टॉल"ला जगभरातील मान्यवरांची भेट

    18-May-2025
Total Views |
 
Marathi films in Cannes Festival
 
मुंबई : ( Marathi films in Cannes Festival ) मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय कान फिल्म फेस्टिव्हलचे बिगूल वाजले आहे. देशोदेशीचे चित्रपट, कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत कान फिल्म फेस्टिव्हलचे वातावरण भारले आहे.
 
 
जगभरातील चित्रपटकर्मींच्या गर्दीत दिमाखात उभ्या असलेल्या महाराष्ट्राच्या फिल्मसिटी स्टॉलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 
जगभरातील मान्यवरांनी दिली भेट
 
मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी चार मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीने कान महोत्सवामध्ये पाठवण्यात आले आहेत. 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' या तीन मराठी चित्रपटांबरोबर 'जुनं फर्निचर' हा मराठी चित्रपटही कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवण्यात आले आहेत. या चारही चित्रपटांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकारी यांचे शिष्टमंडळ महोत्सवात सहभागी झाले असून मराठी चित्रपट आणि चित्रनगरीच्या प्रचार प्रसारा करता आकर्षक स्टॉल तयार करण्यात आला आहे.
 
वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधी - चित्रकर्मी या स्टॉलला भेट देत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शिष्टमंडळातर्फे या अभ्यागतांचे स्वागत करण्यात येत असून सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव महेश वाव्हळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे आदी मान्यवर येथे उपस्थित आहेत.