देशात ज्या-ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ती-ती ठिकाणे दर १२ वर्षांनी विकसित होत असतात. परंतु, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते तीर्थस्थळ असल्याने वर्षभर दर दिवशी भाविकांची गर्दी असते. त्यामुळे तेथे लोकांना सोईसुविधा देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा गरजेची आहे. तसेच, त्या भागाचा लोकप्रतिनिधी स्वतंत्र हवा, अशी मागणी आता जोर धरत आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरलाही तीर्थक्षेत्र दर्जा असल्याने आणि कुंभमेळा भरत असल्याने स्वतंत्र लोकप्रतिनिधी हवा, अशी मागणी त्र्यंबक भागातील जनतेची आहे. त्र्यंबकेश्वर स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करावा, अशी मागणी आगामी २०२७च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुढे आली आहे. त्र्यंबकेश्वर येथे आगामी तीन-चार वर्षांत कुंभमेळा भरणार आहे. त्या अनुषंगाने अर्थसंकल्पात त्र्यंबकेश्वरसाठी निधीची तरतूद केली गेली नाही. राज्यसभेवर साधूंना घ्यावे, अशी सूचना भक्त भाविकांची होती. तीही पूर्ण झालेली नाही. या मागण्या नागरिकांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे पूर्वीच केलेल्या आहेत, मागील फेब्रुवारी महिन्यात एका कार्यक्रमातील भाषणात पंतप्रधानांनी त्र्यंबकचा उल्लेख केला होता. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुंबईत वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करताना भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्र्यंबकेश्वरला विकसित करण्याची गरज बोलून दाखवल्याने त्र्यंबकवासीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यानंतर मात्र प्रत्यक्षात काही झाले नाही. आगामी कुंभमेळ्यासाठी केंद्र शासनाने विकासासाठी जास्तीची तरतूद करावी. विकासासाठी योजना आखाव्यात, त्र्यंबकेश्वरपासून ‘नमामि गोदावरी’ प्रकल्प राबवावा, त्र्यंबकेश्वर-डहाणू रेल्वे मार्ग व्हावा, त्र्यंबकेश्वर कसारा रेल्वे व्हावी, केदारनाथसारखा विकास त्र्यंबकेश्वरचा करावा, अशा मागण्या जनतेने केल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुका ग्रामीण आदिवासी भागात असून ११८ गावे पेसा अंतर्गत मोडतात. हे लक्षात घेऊन ग्रामीण भागात विकासाची गंगा वाहण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्याचा विकास केंद्रीय निधीतून व्हावा, अशी मागणी आहे. त्र्यंबकेश्वर तालुका आजपर्यंत विकासासाठी कोणत्याही नेत्यांनी दत्तक घेतलेला नाही. त्यातूनच या क्षेत्रासाठी स्वतंत्र आमदार असावा अशी मागणी, होत आहे.
मोकाट कुत्रे गंभीर समस्या!
शहरातील अनेक भागात सध्या रस्त्यावर व जागोजागी मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणावर दहशत करत असल्याने प्रवासी, वाहनधारकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचे करायचे काय? असा प्रश्न नागरिकांसमोर ’आ’वासून उभा राहिला आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी, चौकात, मुख्य रस्त्यावर, शाळेच्या आवारात, बस थांबा आदी जागेवर कमीत कमी २० ते ३० कुत्र्यांची मोठी टोळी आपली दहशत निर्माण करीत असल्यामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांनी या मोकाट कुत्र्यांचा चांगलाच धसका घेतला आहे. या भटक्या कुत्र्यांचा भली मोठी टोळी येणार्या-जाणाच्या प्रत्येकांच्या मनाला भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. अलीकडे अनेक ठिकाणी या मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांना, वृद्धांना चावा घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व मोकाट कुत्रे अगदी सकाळी शहरातील प्रमुख रस्त्यावर आपले ठाण मांडून बसत असल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी, कामगार वर्ग, सायकलस्वार, मोटारसायकल आदीच्या पाठीमागे ही मोकाट कुत्रे धावत सुटतात. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक झळ मोठ्या प्रमाणावर सोसावी लागत आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. सोशल मीडियावर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे व्हिडिओ पाहायला मिळतात अशात जर लहान बालक या मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडले, तर काय गत होईल! याची कल्पना करणेही मुश्किल होऊन बसेल, असा संतापजनक सूर सध्या नागरिकांमधून उमटत आहे. यासाठी उपाययोजना म्हणून मोकाट कुत्रे बंदिस्त करून त्यांची नसबंदी करून त्यांना अन्य ठिकाणी सोडले जावे, जेणेकरून कुत्र्यांच्या हल्ल्यापासून नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल. महापालिकेने अशा मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. शहरात आज जवळजवळ ९० टक्के कुत्र्यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचा पट्टा दिसत नाही. त्यामुळे अशा अनेक मोकाट कुत्र्यांचा मालक कोण? हा प्रश्न डोकेदुखी बनली आहे.