नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महादेव ॲपबाबत एक नवीन खुलासा समोर आला आहे. काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी महादेव ॲप प्रवर्तकांकडून ५०८ कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ईडीच्या तपासात याबद्दलची माहिती पुढे आली आहे. भूपेश बघेल यांना महादेव ॲप प्रवर्तकांकडून नियमित पैसे पुरवण्यात आले असून ही रक्कम आता ५०८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे ईडीने म्हटले आहे. तसेच २ नोव्हेंबर रोजी ईडीच्या छापेमारीत छत्तीसगडमध्ये ५.३९ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
७ आणि १७ नोव्हेंबर रोजी असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव ॲपच्या प्रवर्तकांकडून छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड पोहोचवली जात असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्यानंतर ईडीने हॉटेल ट्रायटन आणि भिलाई येथील अन्य ठिकाणी झडती घेतली आणि कॅश कुरिअर असीम दास याला पकडले.
विशेष म्हणजे, काँग्रेस पक्षाच्या निवडणूक खर्चासाठी छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड पाठवण्यासाठी असीम दास याला संयुक्त अरब अमिरातीवरुन पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ईडीने असीमच्या कारमधून आणि घरातून ५.३९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
ही रक्कम महादेव ॲप प्रवर्तकांनी छत्तीसगडमधील आगामी निवडणुकीच्या खर्चासाठी ‘बघेल’ यांना देण्याची व्यवस्था केली असल्याचे असीम दासने कबूल केले आहे. ईडीने छत्तीसगडमधील छापेमारीबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. "महादेव अॅपशी जोडलेल्या मनी लाँड्रिंग नेटवर्कच्या विरोधात छत्तीसगडमध्ये शोध मोहीम राबवली आहे. यामध्ये ५.३९ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून १५.५९ कोटी रुपयांची बँक खाती गोठवण्यात आली आहे," अशी माहिती ईडीने आपल्या ट्विटमध्ये दिली आहे.