प्रकाश पाटील हे मूळचे धुळ्याच्या तरवाडेचे. त्यांचे सर्व शिक्षण गावीच झाले. त्यानंतर सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. काही दिवस मुंबईत काम केल्यानंतर पुण्यात एका कंपनीत मुलाखतीसाठी आले आणि मग नोकरी मिळाल्यानंतर पुण्यातच स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
२८ वर्षे गरज म्हणून वापरलेल्या सायकलची कालांतराने त्यांना गोडीही लागली अन् मनस्वी छंदही जडला. कामानिमित्त पुण्यात आल्यानंतर काही दिवस प्रकाश यांनी पायी प्रवासदेखील केला. मात्र, त्यानंतर एका जुन्या सायकलवरच त्यांनी कसेबसे निभावून नेले. त्याकाळी केवळ गरज म्हणून ते सायकल चालवत होते. मात्र, तेव्हापासून सायकल आणि प्रकाश यांचे एक घनिष्ट नाते फुलत गेले. अगदी सुट्टीच्या दिवशीही प्रकाशकाका सायकलवरून परिसरात हमखास एकतरी फेरफटका मारायचे. पुढे तर कामानिमित्त फारसा वेळ न मिळाल्याने त्यांना सायकल चालवायलाही सवड मिळत नसे.’पीएमपी’मध्ये रुजू झाल्यानंतर साधारण २०१३ साली लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वप्रथम सायकलवरून भटकंती करण्याचा प्रकाशकाकांनी विचार केला. आता सायकलवरून आणि तोही एवढा लांबवरचा प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने त्यांच्या मनात थोडी धाकधूक होतीच. पण, रोज सायकल चालवण्याचा सराव असल्याने तेवढाच धीर आणि हिंमतही होती. अखेर कर्नाटक, हम्पी, तिरुपती बालाजी असा दीर्घ प्रवास त्यांनी सायकलवरून पूर्ण केला. या अनुभवामुळे त्यांच्या मनात आत्मविश्वास जागृत झाला. त्यानंतर मात्र दरवर्षी लांब पल्ल्याचा प्रवास करण्याचा प्रकाशकाकांनी संकल्पच सोडला.
एवढेच नाही तर नोकरी सांभाळत, त्यांनी सायकलिंगचा छंदही तितक्याच आपुलकीने जोपासला. आज सलग २५ वर्षांहून अधिक काळ प्रकाशकाका अविरतपणे सायकल चालवत आहेत. कामावर असताना किंवा प्रसंगी सुट्टी घेऊन दक्षिण भारताची सायकल सफर प्रकाशकाकांनी केली. २०१५ साली सेवानिवृत्तीनंतर सायकलिंगसाठी त्यांना भरपूर वेळ मिळू लागला. अशा या ‘सायकलमित्र’ प्रकाशकाकांनी आतापर्यंत तब्बल अडीच लाख किमींहून अधिक अंतर सायकलवर आक्रमिले आहे. आजवर त्यांनी दीडशे छोटे-मोठे प्रवास केले. त्यामध्ये ५० लांबपल्ल्याच्या ठिकाणांचाही समावेश आहे. अष्टविनायक दर्शन, हिमालय डोंगररांगांपासून ते कन्याकुमारी, पुणे ते नेपाळ, पुणे ते कन्याकुमारी, पुणे ते शिर्डी, खान्देश, मराठवाडा असे अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापासून ते देशाच्या दुर्गम भागांतही प्रकाशकाकांनी सायकलवरून देशाटनाचा आनंद लुटला.
सायकलवीर प्रकाशकाकांनी पुणे व परिसरातील सर्व गडकिल्लेदेखील सायकलवारीतून अक्षरशः पालथे घातले. प्रकाशकाकांचा रोजचा २० ते ३० किमींचा सायकलप्रवास तसा ठरललेचा. मग हिवाळा असो अथवा पावसाळा. पुढे दर महिन्याच्या एकादशीला पंढरपूरचाही दौराही सायकलवरूनच. नुसती सायकलस्वारीच नाही, तर उनाड रस्त्यांवर रोपटे लागवडीचा हरित छंदही त्यांना जडला. कुटुंबीयांच्या नावाने, तर कधी मित्रांनी एकत्र येऊन दरवर्षी वृक्षारोपण मोहीमदेखील राबविली. दिघी, दत्तगडावर ’अविरत श्रमदान संस्थे’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याची आठवण प्रकाशकाका आवर्जून नमूद करतात.“सायकल चालवल्यामुळे आरोग्य चांगले राहते. शिवाय सायकलवरून प्रवास केल्यास बहुतांशी दुर्घटना टाळताही येतात. सायकलमुळे कधीही पोटाच्या तक्रारी जाणवत नाहीत. माणूस कायम उत्साही राहतो, हा माझा अनुभव आहे. सायकल चालवणारा सायकलस्वार कधीही छोट्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जात नाही. पुणे, पिपरींत सायकल संबंधित कोणातीही स्पर्धा, कार्यक्रम अथवा माहितीपर कार्यक्रम असल्यास मी प्राधान्याने हजेरी लावतोच,” असे प्रकाशकाका विशेषत्वाने अधोरेखित करतात.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या भेटीचा अनुभव सांगताना, प्रकाशकाका सांगतात की, ”नेपाळला जाताना गोरखपूर येथे गोरक्षनाथ मंदिर आहे. तेथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अनपेक्षित भेट झाली. त्यांची भेट घेऊन मी भारावूनच गेलो.” अशाप्रकारे विविध जिल्ह्यांत फिरस्ती करताना ‘सायकलमित्र (प्रकाश) पाटील काका’ म्हणून त्यांना ओळखत असल्याचेही ते सांगतात. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशकाका सायकलप्रवास व पर्यावरण संरक्षण-संवर्धनाबाबत सक्रियपणे जनजागृती करतात. नुकतेच ३६ जिल्हे सायकलवरून पालथे घातल्यानंतर ’३६ जिल्हेवाले काका’ असेही काहीजण आपुलकीने हाक मारत असल्याचे ते सांगतात.
घरातील किरकोळ काम सायकलवर करणे आवश्यक असल्याचे मत प्रकाशकाका व्यक्त करतात. त्यामुळे प्रत्येक घरातून किमान अर्धा लीटर जरी पेट्रोलची बचत होईल. जिल्ह्यात, राज्यात व एकूणच देशात कितीतरी लीटर पेट्रोलची बचत होईल. परदेशी जाणारे चलन मोठ्या प्रमाणात वाचविण्यास हातभार लागू शकतो, असा मोलाचा सल्ला ते देतात. गेल्या वर्षी पत्नीसमवेत तीन हजार किमी पायी जाऊन नर्मदा परिक्रमाही प्रकाशकाकांनी पूर्ण केली. दि. ३ डिसेंबर रोजी पुन्हा नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण करणार असल्याचे ते सांगतात. पुढील वर्षी देशातील २७ राज्ये सायकलवरून फिरण्याचे लक्ष्य प्रकाशकाकांनी निर्धारित केले आहे, अशा या आगळ्यावेगळ्या ‘सायकलमित्र’ प्रकाशकाकांना दै. ’मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
पंकज खोले
(अधिक माहितीसाठी संपर्क ः ८६६८६८७५९९)