मुंबई : हार्बर मार्गावर लोकलचा वेग वाढवण्याची तयारी सुरू आहे. पुढच्यावर्षीपासून हार्बर लाईनवरील ट्रेनचा वेग वाढणार आहे. गाड्यांचा वेग ताशी 80 किमीवरून 100 च्या पुढे वाढण्याची शक्यता आहे. नियोजनानुसार सर्व कामे वेळेत झाल्यास मार्चपर्यंत परिणाम दिसून येईल. ट्रॅकभोवतीचे तात्पुरते अतिक्रमण हटवून हे काम सुरू झाले आहे.
रेल्वेवर अतिक्रमणाची सर्वात मोठी समस्या हार्बर मार्गावर आहे. वडाळा, मानखुर्द, चुनाभट्टी आणि जीटीबी नगर हे अतिक्रमणामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. ट्रॅकभोवती तात्पुरती बांधकामे करण्यात आली आहेत. लोक ट्रॅकवर कचरा टाकतात. त्यांच्या घरातील पाणीही रुळावर वाहते. एकंदरीत, ट्रॅक खराब झाल्याने येथील सरासरी वेगही कमी झाला आहे.
सोमवारी चुनाभट्टी ते जीटीबी नगर दरम्यान 165 अवैध अतिक्रमणे हटवली. यामध्ये 140 छोटी दुकाने आणि 25 तात्पुरत्या झोपड्यांचा समावेश होता. चुनाभट्टी ते जीटीबी नगर दरम्यान आरपीएफ आणि इतर कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे. या दोन स्थानकांदरम्यान अप मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यांना आधीच तिथुन जाण्याची नोटीस देण्यात आली होती.
अतिक्रमण काढण्याची कारवाई काही दिवस सुरू राहणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. अतिक्रमण हटवल्यानंतर रेल्वेकडून अभियांत्रिकीचे काम सुरू केले जाणार आहे. यामध्ये मुख्य काम हे ट्रॅक मजबूत करण्याचे असेल. ट्रॅकच्या खाली असलेली गिट्टी बदलली जाईल. अनेक ठिकाणी सिग्नल केबल्स बदलण्यात येणार आहेत. हे सर्व काम झाल्यानंतर गाड्यांचा सरासरी वेग वाढवता येईल.