पणती...कंदील... आणि दिवाळीचं संपूर्ण साहित्य... जाणून घ्या किंमत किती?
02-Nov-2023
Total Views | 58
मुंबई : सण-उत्सवांचा राजा अशी ओळख असलेला दिव्याचा सण दिवाळी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असून सर्वच बाजारापेठा ग्राहकांनी गजबजू लागल्या आहेत. व्यावसायिकांनी विविध प्रकारच्या सवलतींच्या घोषणा करत ग्राहकांना आकर्षित करण्यावर भर दिला असून बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईतील घाऊक बाजारपेठा असलेल्या भुलेश्वर, धारावी कुंभारवाडा आणि दादर येथे ग्राहकांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मातीच्या पणत्या, आकाशकंदील, रोषणाईचे साहित्य, रांगोळीचे स्टिकर आणि रंग, विविध रांगोळी साचे, लक्ष्मी पूजनसाठी केरसूण, काव या गोष्टी घाऊक तसेच किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध असून ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.
दरम्यान, या प्रमुख बाजारपेठांमध्ये काही विक्रेते केवळ सण-उत्सवादरम्यानच व्यवसायासाठी येत असतात. त्यात घरगुती वस्तु, हस्तकलेचे कारागिरी यांनी सण-उत्सवासाठी तयार केलेल्या विविध साहित्याचा समावेश असतो. यात प्रामुख्याने परंपरागत पध्दतीचे आकाशकंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात.
तसेच मातीच्या पणत्यांवर रंगकाम आणि खडे लावून आकर्षक दिसणार्या पणत्या अनेक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. या मातीच्या पणत्यांची खरेदी विक्री सद्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. स्थानिक धारावी कुंभारवाडा येथून तसेच राजस्थानातील पणत्याही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. राजस्थानी पणत्या काहीशा महाग असल्यातरी त्यावर असलेली कलाकुसर ग्राहकांना आकर्षित करत आहे.
गेल्या २ महिन्यांपासून सण-उत्सवांची मालिकाच सुरु आहे. त्यात गणेशोत्सव, घटस्थापना, नवरात्री दसा आणि आता दिवाळीचे आगमन होत आहे. त्यानंतर ख्रिसमस तसेच नववर्षाचे स्वागत असे पुढील दोन महिने सण-उत्सवांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
पारंपारिक आकाश कंदिलचा उजेड
दादरमध्ये दरवर्षी पारंपरिक पध्दतीने तयार केलेल्या आकाश कंदिलचे स्टॉल लागतात. हे विक्रेते वर्षातून एकदाच येथे व्यवसायास येतात. त्यांनी हाताने आकाशकंदिल तयार करण्याची कला जतन केली असून दरवर्षी ठरलेले ग्राहक त्यांच्याकडे येतातच यातील काही विक्रेत्यांची दुसरी पिढी या व्यवसायात आहे. आकाशकंदिल तयार करण्यासाठीचा कच्चा माल मस्जिद येथून खरेदी करतात तसेच दिवाळीच्या दोन महिने आधीपासूनच आकाशकंदिल तयार करण्यास सुरुवात केली जाते. आवड तसेच लहानपणीची आठवण म्हणून आम्ही ही कला जोपासत असल्याचे येथील एका कलावंताने सांगितले.
असा आहे दिवाळीचा झगमगाट
कागदी आकाशकंदील - ३०० ते ६५० रुपये
कापडाचे आकाशकंदील - २५० ते ५०० रुपये
मातीच्या साध्या पणत्या - ५ रुपयांपासून सुरुवात
मातीच्या रंगीत पणत्या - २० रुपयांपासून सुरुवात
रांगोळीचे रंग - १० रुपये एक ग्लास
रांगोळीचे साचे (आकारानुसार) - २० रुपयांपासून सुरुवात