उत्तरकाशीतील निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला! ३० ते ३५ मजूर अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
12-Nov-2023
Total Views | 92
देहरादून : संपुर्ण देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात असताना उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील सिलक्यारा ते डंडालगावपर्यंत निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला आहे.
ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ मजूर अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. बोगद्याच्या आत पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
तसेच बोगदा लवकरात लवकर खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी काम सुरु असताना अचानक बोगदा कोसळण्यास सुरुवात झाली. तिथे काम करत असलेले ३० ते ३५ कामगार आत अडकले होते. दरम्यान, अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी वेगाने काम सुरु आहे.
बोगद्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे ३०० मीटर वरच्या भागातून ढिगारा खाली पडल्याने बोगदा बंद झाला. इथून सुमारे २७०० मीटर परिसरात ४० ते ५० मजूर काम करत होते. या प्रकल्पातील हा सर्वात लांब बोगदा असून तो साडेचार किलोमीटर एवढा आहे.