लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांनंतर प्रतीक शाह यांची बायोपिकमधून हकालपट्टी!

    03-Jun-2025   
Total Views | 24


prateik shah removed from biopic after sexual misconduct allegations



मुंबई : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर प्रतीक शाह याच्याविरोधात त्याच्या माजी प्रेयसीने लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराचे गंभीर आरोप पुन्हा एकदा उघड केले आहेत. एका भावनिक आणि ज्वलंत ब्लॉग पोस्टद्वारे तिने आपल्या नात्यातील त्रासदायक अनुभव कथन करत अनेक धक्कादायक बाबी सामोरी आणल्या आहेत.
२०१५ मधील आरोप पुन्हा ऐरणीवर
ही पहिली वेळ नाही की तिने शाहविरोधात आरोप केले आहेत. यापूर्वीही २०१५ साली फेसबुकवर तिने अशाच स्वरूपाचे आरोप करत आपला आवाज उठवला होता. मात्र, या वेळी तिच्या ब्लॉगमध्ये तिने अधिक स्पष्ट आणि गंभीर घटनांचा उल्लेख केला आहे.


नात्यातील नियंत्रण आणि हिंसा
"त्या उन्हाळ्यात त्याने माझे जीमेल आणि फेसबुकचे पासवर्ड मागितले आणि स्वतःचे दिले. जेव्हा त्याने पाहिलं की मी एका मित्राशी थोडसं फ्लर्ट केलं होतं, तेव्हा त्याला भयंकर राग आला. तो माझ्या तोंडासमोर ओरडू लागला की तो स्वतःला मारून टाकेल," असे त्या पोस्टमध्ये तिने नमूद केले.

या नात्यात ती भावनिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत होती, असे तिने लिहिले आहे. "माझ्या वाढदिवसाच्या आठवड्यांत एक प्रसंग घडला, जो आजही मला पोखरत राहतो. मी तपशील देणार नाही, पण तुम्हाला समजेलच. 'नाही' हा पर्यायच नव्हता. जर तो माझा प्रियकर नसता, तर हे बलात्कार ठरलं असतं," अशा शब्दांत तिने आपली वेदना मांडली आहे.


इंडस्ट्रीतील प्रतिक्रिया आणि प्रकल्पातून हकालपट्टी
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रतीक शाह याला आगामी सौरव गांगुली बायोपिकमधून वगळण्यात आल्याचे वृत्त आहे. धर्मा प्रोडक्शन्स, जे या सिनेमाशी संबंधित आहे, त्यांनी वक्तव्य दिलं – "कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाविरोधात आम्ही ठामपणे उभे आहोत. संबंधित व्यक्ती आता आमच्या कोणत्याही प्रकल्पाशी संलग्न नाही."


सोशल मीडियावरून गायब
या आरोपांनंतर प्रतीक शाहने आपले इंस्टाग्राम अकाउंट डिऍक्टिवेट केले असून, या वादावर त्याने कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही. होमबाउंड चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घेवान यांनी त्यांच्या टीमबद्दल कौतुकाची पोस्ट केली, मात्र त्यांनी शाहचे नाव नमूद केले नाही.


पुन्हा #MeToo ची आठवण
२०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये उगम पावलेल्या #MeToo आंदोलनाची आठवण या प्रकरणामुळे पुन्हा ताजी झाली आहे. इंडस्ट्रीमधील स्त्रियांनी पुढे येत अनेक प्रस्थापित व्यक्तींविरोधात आपले अनुभव शेअर केले होते.


प्रतीक शाह प्रकरणाने पुन्हा एकदा हे दाखवून दिलं आहे की प्रसिद्धीच्या झगमगाटामागे लपलेली वास्तव किती वेदनादायक असू शकते. आता या आरोपांवर शाह काय प्रतिक्रिया देतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121