शर्मिष्ठा पानोलीविरोधात तक्रार करणारा वजाहत खान बेपत्ता!

    03-Jun-2025   
Total Views |

wajahat khan the complainant in a case against social media influencer sharmistha panoli has reportedly gone missing 
 
नवी दिल्ली : (Sharmistha Panoli) सोशल मीडियावर इस्लामिक दहशतवादाचा निषेध करताना केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.परंतु, आता ज्या वजाहत खानने तिच्याविरोधात तक्रार केली होती, तोच बेपत्ता असल्याचा दावा तक्रारदार वजाहत खानच्या वडिलांनी केला आहे. गेल्या रविवारपासून तो बेपत्ता असून शर्मिष्ठाला अटक झाल्यापासून कुटुंबाला धमकीचे फोन येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली ३० मे रोजी कोलकाता पोलिसांनी गुरुग्रामच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. शर्मिष्ठा पानोलीला कोलकाता पोलिसांनी अटक केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला आणि अनेक राजकीय नेत्यांनी तिच्या सुटकेची मागणी केली. शर्मिष्ठा पानोलीविरोधात तक्रार करणाऱ्या वजाहत खानला पानोलीच्या अटकेनंतर धमकीचे फोन आले, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला. "माझा मुलगा निर्दोष आणि धर्मनिरपेक्ष आहे. तो हिंदू धर्माचा अपमान करू शकत नाही. शर्मिष्ठाच्या अटकेपासून आम्हाला धमक्या येत आहेत", असं त्याचे वडील सआदत खान यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
 
दरम्यान, वजाहत खानने हिंदू धर्माविरुद्ध वारंवार निंदनीय, चिथावणीखोर टिप्पण्या करणाऱ्या अनेक सोशल मीडिया पोस्ट केल्या आहेत. श्री राम स्वाभिमान परिषदेने दाखल केलेल्या तक्रारीत वजाहत खानवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंदू समुदायाविरुद्ध अपमानजनक आणि भडकाऊ टिप्पणी केल्याचा आरोप आहे. गार्डन रीच पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या आणि २ जून रोजीच्या या पत्रात, पोलिसांनी खानविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या १९६ (१) (अ), २९९, ३५२, ३५३(१) (क) आणि आयटी कायद्याच्या कलम ६६अ आणि ६७ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची विनंती केली आहे.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\