समय बदलता हैं, तब यूँ बदलता हैं!

Total Views |
Article On KALYANI STRATEGIC SYSTEMS LIMITED

१७७९च्या वडगावच्या विजयानंतर आपलं युद्धतंत्र बदलण्याची नितांत गरज आहे. आगामी काळातल्या लढाया तलवारी-भाले यांच्या नसून, तोफा-बंदुकांच्या असणार आहेत. ही हत्यारं आपण स्वतः निर्माण करण्याची गरज आहे, ही जाणीव फक्त महादजी शिंदेंना झाली होती. पण, ते १७९४ साली मरण पावले. नंतर सगळाच आनंद!

महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात नीळकंठराव कल्याणी हे एक महत्त्वाचं नाव. १९६१ साली पुणे शहराजवळच्या मुंढवा परिसरात त्यांनी ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली. आज ‘कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीज्’मध्ये अनेक कंपन्या असून, त्यातली ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टम्स लिमिटेड’ ही कंपनी संरक्षण क्षेत्रातील विविध वस्तूंचं उत्पादन करते. नुकतीच या कंपनीकडे काही युरोपीय मित्रराष्ट्रांकडून चिलखती गाड्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. ९७.८७ दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे ८५० कोटी रुपयांचा हा व्यवहार असून, साधारण १८ महिन्यांमध्ये चिलखती गाड्यांच्या चॅसीज आणि अन्य भाग यांचा पुरवठा करायचा आहे. भारी तोफा किंवा मध्यम वजनाच्या तोफा वाहून नेणार्‍या, अशा या चिलखती गाड्या आहेत. मुद्दा हा की, अत्याधुनिक शस्त्रास्त्रं, यांचं वहन करणारी वाहनं आणि अर्थातच यांचे सुट्टे भाग, या सर्वांचं उत्पादन आपल्या देशात होऊ लागलं आहे. त्यात वरीलप्रमाणे आपल्या महाराष्ट्र प्रांतातल्या उद्योगांचाही सहभाग आहे. या सर्वांचा दर्जा निश्चितच आंतरराष्ट्रीय पातळीचा आहे. म्हणून तर युरोपीय मित्रराष्ट्र आपल्याकडून त्यांची खरेदी करीत आहेत.

दि. १२ आणि १३ जानेवारी १७७९ या दिवशी मराठ्यांचं सैन्य आणि इंग्रजांचं सैन्य यांच्यात वडगाव या ठिकाणी एक जोरदार लढाई झाली होती. यावेळी कलकत्याच्या (आता कोलकाता) इंग्रजांच्या मुख्यालयात वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल होता, तर विल्यम हॉर्नबी हा मुंबई इलाख्याचा गव्हर्नर होता. जानेवारी १७७९ मध्ये इंग्रजी सेना मुंबईहून पनवेल- खोपोली मार्गाने घाट चढून थेट पुण्यावर चाल करून निघाल्या. इंग्रजांची हिंमत एवढी वाढण्याचं कारणही तसंच मोठं होतं. १७७२ साली माधवराव पेशवा मरण पावला. त्याचा धाकटा भाऊ नारायणराव हा पेशवा बनला. परंतु, पेशवेपदाचा अनिवार लोभ सुटलेला त्याचा सख्खा काका रघुनाथराव उर्फ राघोबादादा याने त्याचा खून पाडला. या धक्क्याने मराठे सरदार खडबडून जागे झाले. १२ प्रमुख सरदार आणि मुत्सद्दी एकत्र आले. म्हणून त्यांना म्हणतात ‘बारभाई.‘ यात नाना फडणीस, महादजी शिंदे, तुकोजीराव होळकर आणि नागपूरकर भोसले प्रमुख होते. त्यांनी राघोबाला हुसकावून लावलं आणि नारायणरावाचा नवजात मुलगा सवाई माधवराव याला पेशवा बनवलं, पेशवेपदासाठी वेडा झालेला राघोबादादा थेट मुंबईला गेला. त्याने इंग्रजांशी बोलणी केली की, बारभाईंचा पराभव करून तुम्ही जर मला पुन्हा पेशवा बनवलंत; तर साष्टी, वसईसह बराच मोठा भूभाग तुम्हाला देईन.

यावेळी मुंबईकर इंग्रजांकडे फक्त मुंबईची सात बेटं म्हणजे आजच्या कुलाब्यापासून माहीमपर्यंत आणि शीवपर्यंत (सायन) एवढाच भूभाग होता. वांद्य्रापासून भाईंदरपर्यंत आणि कुर्ल्यापासून ठाण्यापर्यंतचा भूभाग म्हणले साष्टी बेट किंवा साष्टी प्रांत आणि यापलीकडचा वसई प्रांत हा भाग १७३९ साली चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. तेव्हापासून तो मराठ्यांच्याच ताब्यात होता आणि मुंबईकर इंग्रजांचा एकंदर व्यापार खूपच वाढल्यामुळे त्यांना भूभागाची नितांत आवश्यकता होती. साहजिकच मुंबईच्या सात बेटांच्या लगतच असणारा साष्टी प्रांत मिळतो. म्हटल्यावर इंग्रजांच्या तोंडाला पाणी सुटलं. मुंबईत ’भूखंडांचं श्रीखंड’ होण्याची परंपरा इतकी जुनी आहे!
 
इंग्रजांनी राघोबादादाला मुंबईत ’राजकीय आश्रय’ दिला. मात्र, त्याला मुख्य मुंबई बेटात म्हणजे फोर्टमध्ये न ठेवता वरळी बेटाच्या टोकावर समुद्र किनार्‍यानजीक एक बंगला बांधून तिथे त्याची आणि त्याच्या बरोबरच्या लोकांची व्यवस्था केली. मग गव्हर्नर विल्यम हॉर्नबीने टॉमस गोडार्ड या सेनापतीच्या हाताखाली एक नामवंत फौज दिली. यात उत्कृष्ट तोफखाना आणि अद्ययावत बंदूकधारी पथकं होती. इंग्रजी सैन्याला साहाय्यक म्हणून राघोबादादाची थोडी मराठी फौजही होती. आपल्या अद्ययावत तोफा, बंदुका, कवायती सैन्य आणि खुद्द राघोबाच आपल्या बाजूला म्हणजे आपण पुणं जिंकणारच, अशा आवेशात मुंबई बंदरातून पनवेल बंदर आणि तिथून पुढे इंग्रजी सेना निघाली. पुण्यात या बातम्या पोहोचल्या. महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांनी ठरवलं की, इंग्रजांना खंडाळ्याचा घाट चढून वर येऊ द्यायचं आणि वडगाव-तळेगाव परिसरात कोंडायचं. मराठ्यांकडेही तोफा-बंदुका होत्याच. पण, त्यांचा मुख्य भर अर्थातच भालाईतांवर होता.

त्याप्रमाणे दि. १२-१३ जानेवारी १७७९ रोजी वडगावावर जबरदस्त लढाई झाली. मराठ्यांच्या तलवारी-भाले आणि हलक्या तोफा-बंदुका इंग्रजांच्या कवायती सैन्याला नि अद्ययावत तोफा-बंदुकांना भारी पडल्या. इंग्रजांचा दणकून पराभव झाला. कॅप्टन जेम्स स्टुअर्ट ठार झाला. हा स्टुअर्ट मोठा गंमत्या आणि आनंदी स्वभावाचा होता. म्हणून इंग्रजांच्या सैन्यातले मराठी सैनिक त्याला म्हणायचे ’फाकडा.’ ‘स्टुअर्ट’ हा शब्द त्यावेळी कुणालाच म्हणता येत नसे. त्यामुळे याचा उच्चार केला जात असे ’ईष्ट्रर.’ जसं आजही ’स्कूल’चं ’ईस्कूल’ होतं तसंच. त्यामुळे पुण्यात विजयाची खबर गेली, त्यात असं म्हटलं गेलं की, पाटीलबावा (म्हणजे महादजी शिंदे) आणि होळकरांच्या नेतृत्वाखाली आपण टोपीकराला घाटाखाली हाकलून दिला.ईष्ट्रर फाकडा ठार केला, इत्यादी.

इंग्रजांच्या या पराभवामुळे साष्टी-वसई प्रांत मुंबईत मिळवून घेण्याने यांचे मनसुबे हवेतच राहिले आणि वाढता व्यापार, वाढती लोकवस्ती यांमुळे जागेची मागणी तर अतोनात वाढलेली. यातूनच गव्हर्नर विल्यम हॉर्नबीला मुख्य मुंबई बेट हे वरळी बेटाला जोडून घेण्याची कल्पना सूचली. त्यातूनच आजचा हाजीअली चौक ते नेहरू तारांगण इथपर्यंतचा ’हॉर्नबी वेलार्ड’ हा बांध बांधून मुंबई बेट वरळी बेटाला जोडलं गेलं. समुद्राचं पाणी अडवलं गेल्यामुळे निर्माण झालेल्या दलदलयुक्त जमिनीत भराव टाकून अनेक छोट्या-मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. आज त्या भागात अपंग पुनर्वसन संस्था, लाला लजपतराय कॉलेज, वल्लभभाई पटेल स्टेडियम, गोल्फ क्लब, रेस कोर्स, महालक्ष्मी रेल्वे स्थानक, सात रस्ता इत्यादी असंख्य ख्यातनाम वास्तू उभ्या आहेत. मराठ्यांकडून मार खाल्ल्यामुळे हॉर्नबीने हा बांध बांधण्याचं काम मनावर घेतलं.

पण, खरा मुद्दा वेगळाच आहे. वडगावच्या या पराभवामुळे इंग्रजांच्या मुंबई कौन्सिलात भयंकर गरमा-गरमी झाली. अनेक कौन्सिलरांनी आपला कडक अहवाल कलकत्त्याला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जकडे पाठवला. गव्हर्नर जनरलने मुंबईच्या गव्हर्नरकडे खुलासा मागणारा ’मेमो’ पाठवला. ऑफिसमधल्या टारगट भाषेत याला ’वरून बांबू आला,’ असे म्हटलं जातं. गव्हर्नर जनरलने विचारलं होतं की, मराठ्यांनी तुमचा दणकून पराभव तर केलाच. पण, आम्हाला अशी पक्की बातमी मिळालेली आहे की, तुम्हीच काही काळापूर्वी त्यांना ज्या तोफा-बंदुका विकल्या होत्यात, त्यांचाच वापर या लढाईत त्यांनी केला आणि तुम्हाला हरवलं. ही बाब अत्यंत गंभीर आहे. हे नस्ते धंदे तुम्ही कुणाला विचारून केलेत, याचा ताबडतोब नि तपशीलवार खुलासा करा.

आता या मेमोला जे उत्तर मुंबईकरांनी पाठवलं, ते फारफार महत्त्वाचं आहे. मुंबईकर लिहितात- “आम्ही शिवाजीच्या काळापासून मराठ्यांना तोफा-बंदुका विकत आहोत. आम्ही नाही म्हटले, तर ते पोर्तुगीजांकडून ही शस्त्रास्त्रं घेतात. आता फ्रेंचांकडूनही घेतात. मग आम्ही नाही का म्हणावं? मात्र होता होईल, तो आम्ही त्यांना जुनी-पानी, मोडकी, भंगारात काढायला झालेली, अशीच शस्त्रास्त्रं विकतो. पण, हे मराठे इतके बुद्धिमान आहेत की, ती जुनी-पानी हत्यारं ते स्वतःचं डोकं वापरून जवळपास अद्ययावत अवस्थेला आणतात, वडगावच्या लढाईत अशाच तोफा-बंदुका वापरून त्यांनी आमचा पराभव केला. पण, काळजी करू नका, असं वारंवार होणार नाही. आम्ही जर त्यांना शस्त्रास्त्रं दिली नाहीत, तर ते इतरांकडून घेतील, याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे ते स्वतः ही शस्त्रास्त्रं बनवायला शिकतील आणि जर का तसं घडलं, तर आपल्याला या देशात राहणं अशक्य होईल.”

मुंबईकरांच्या मुखाने जणू नियती बोलत होती. वडगावच्या लढाईत, ज्याला ’पहिले इंग्रज-मराठे युद्ध’ म्हणतात, त्यात भले इंग्रजांनी मार खाल्ला. पण, १८०३ ते १८०५च्या ‘दुसर्‍या इंग्रज-मराठे युद्धात’ मराठ्यांनी गुजरात आणि दिल्ली गमावली, तर १८१७ ते १८१९च्या ’तिसर्‍या इंग्रज-मराठे युद्धात’ इंग्रजांनी संपूर्ण भारतावर प्रभुत्व मिळवले.

असं का घडलं? तर १७७९च्या वडगावच्या विजयानंतर आपलं युद्धतंत्र बदलण्याची नितांत गरज आहे. आगामी काळातल्या लढाया तलवारी-भाले यांच्या नसून, तोफा-बंदुकांच्या असणार आहेत. ही हत्यारं आपण स्वतः निर्माण करण्याची गरज आहे, ही जाणीव फक्त महादजी शिंदेंना झाली होती. पण, ते १७९४ साली मरण पावले. नंतर सगळाच आनंद!

एक तो काळ होता, जेव्हा युरोपीय सत्ता यांच्या देशात बनलेली हत्यारं इकडे आणून आमचाच पराभव करत होत्या. एक आजचा काळ आहे, जेव्हा आमचे कारखानदार इतकी उत्तम हत्यारं बनवतायत की, युरोपीय देश ती आमच्याकडून खरेदी करतायत. भारत बदल रहा हैं!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.