मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन चित्रपटांसह अनेक जाहिरातींमध्ये देखील सातत्याने काम करताना गेली अनेक वर्ष दिसत आहेत. नुकतीच त्यांनी केलेली एक जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. व्यापारी संघटना CAIT ने (Confederation of All India Traders) एका जाहिरातीविरोधात ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली असून त्यांच्यामते ही जाहिरात दिशाभूल करणारी आहे. ही जाहिरात फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलशी संबंधित असून त्यात अमिताभ बच्चन आहेत. त्यांच्या एका संवादावर सीएआयटीने नाराजी व्यक्त केली असून त्यांना १० लाखांचा दंड ठोठावण्यात यावा अशी मागणी या संघटनेकडून केली जात आहे.
काय आहे सीएआयटीचे म्हणणे?
ही जाहिरात दिशाभूल करणारी आणि देशातील छोट्या विक्रेत्यांविरुद्ध, दुकानदारांविरूद्ध असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून ही जाहिरात मागे घेण्याचीही मागणी केली आहे. खोट्या किंवा दिशाभूल करणार्या जाहिरातींसाठी ग्राहक संरक्षण कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार फ्लिपकार्टकडून दंड आकारण्यात यावा आणि बच्चन यांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी सीएआयटीने केली आहे. यासंदर्भात फ्लिपकार्टला ईमेल पाठवला होता, पण त्यांच्याकडून आणि प्रतिक्रियेसाठी बच्चन यांच्याकडून देखील काहीच उत्तर आले नसल्याचे सीएआयटीने म्हटले आहे.
काय आहे जाहिरातीत?
फ्लिपकार्टच्या ज्या जाहिरातीवरून वाद झाला आहे, त्यात अमिताभ बच्चन म्हणतात की, बिग बिलियन डे सेलमध्ये फोन ज्या किमतीत मिळतील, त्या किमतीत ते कोणत्याच मोबाईल स्टोअरमध्ये ऑफलाइन मिळणार नाही. बिग बिलियन डेज सेल ८ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.