मुंबई : पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडीवरील व्याजदर १ ऑक्टोबरपासून वाढवण्यात आले आहेत. हे व्याजदर ६.५% वरून ६.७% पर्यंत वाढवले आहेत. दरमहा २ हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला ५ वर्षांनंतर जवळपास १.४२ लाख रुपये मिळतील. त्यामुळे आरडीच्या माध्यमातून आता सहजपणे मोठा फंड तयार होऊ शकतो.
पोस्ट ऑफिसचे आरडी खाते पिगी बँकेप्रमाणे वापरता येते. म्हणजेच, नागरिकांनी आपल्या खात्यात दर महिन्याला एक ठराविक रक्कम ठेवायची आणि ५ वर्षानंतर ही रक्कम व्याजदारासहित मिळणार. घरातील पिगी बँकेत पैसे जमा केल्यावर तुम्हाला व्याज मिळत नाही, पण आरडी खात्यामुळे तुम्हाला व्याज मिळते.
हे आरडी खाते कोणतीही व्यक्ती उघडू शकते. लहान मुलांच्या नावानेही हे खाते उघडता येते. तुमचे वय १० वर्षे किंवा त्याहून अधिक असल्यास तुम्ही ते स्वतः वापरू शकता. ३ लोक एकत्रितपणे संयुक्त खाते देखील उघडू शकतात. यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता.
आरडीमधून मिळणारे व्याज उत्पन्न ४०००० रुपये (ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ५० हजार रुपये) पर्यंत असल्यास, तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास १०% टिडीएस कापला जातो. परंतु तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न (व्याज उत्पन्नासह) करपात्र असलेल्या मर्यादेपर्यंत नसेल, तर बँक असे करत नाही. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म 15H आणि इतरांना फॉर्म 15G बँकेत जमा करावा लागेल. फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H हा स्व-घोषणा फॉर्म आहे. यामध्ये तुम्ही तुमचे उत्पन्न कर मर्यादेच्या पलीकडे असल्याचे नमूद करता.
पोस्ट ऑफिसच्या आरडीशी संबंधित खास गोष्टी -
इंडिया पोस्टच्या आरडीवर ६.७% व्याज मिळणार आहे.
तुम्ही दरमहा किमान १०० रुपये गुंतवू शकता.
दहाच्या पटीत यापेक्षा मोठी कोणतीही रक्कम तुम्ही गुंतवू शकता.